Common Causes Of Blood Sugar Spikes : मधुमेहाच्या रुग्णांना आहाराबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते. ज्या पदार्थांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते असेच आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत; त्यामुळे जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा डोळ्यासमोर आपण काय खाल्लं हेच समोर येतं. पण, कधी कधी पदार्थांशिवायही तुमच्या रक्तातील पातळी अचानक वाढू शकते. तर आज आपण या बातमीतून असा बदल होण्यामागची आश्चर्यकारक कारणे आणि त्याबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे, याबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत…
द इंडियन एक्स्प्रेसने मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव घोडी (Dr Pranav Ghody) यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, ताण , कमी झोप, व्यायाम, संसर्ग आणि हार्मोनल बदल यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
१. ताण – शरीरात कॉर्टिसोल नावाचे हॉर्मोन तयार होते, जे तुमच्या यकृतात ऊर्जा देण्यासाठी साठवलेली साखर रक्तात सोडायला सांगते. हा पर्याय आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतो. पण, दैनंदिन ताणतणावात त्याचा तेवढा उपयोग होत नाही.
२. झोप – एक रात्र जरी तुम्हाला नीट झोप लागली नाही तर शरीर काही वेळेसाठी इन्सुलिनला प्रतिसाद देतो आणि रक्तातील साखर जास्त वेळ तशीच राहते.
३. व्यायाम – जास्त मेहनत घेऊन केलेला व्यायाम किंवा स्नायू बळकट करणारा व्यायाम करताना तुमचे शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज सोडत असते आणि त्यामुळे तात्पुरते का होईना रक्तातील साखर वाढू शकते.
४. आजार – आजार किंवा संसर्ग तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला जास्त त्रास देतात, ज्यामुळे ग्लुकोजच्या स्वरूपात अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच असते.
५. हार्मोनल बदल – मासिक पाळी, पेरीमेनोपॉज आणि रजोनिवृत्तीच्या आसपास, शरीर इन्सुलिनसाठी कमी संवेदनशील बनवू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होतात असे डॉक्टर म्हणाले आहेत.
तर तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे ?
रक्तातील साखरेची पातळी वाढणे नेहमीच वाईट नसते. उदाहरणार्थ – व्यायामानंतर किंवा रोगप्रतिकारक प्रतिसादादरम्यान तात्पुरतं रक्तातील साखरेत वाढ होणे नैसर्गिक आणि आवश्यकसुद्धा आहे. पण, दीर्घकालीन ताण, नियमित कमी झोप किंवा सततचे हार्मोनल असंतुलन यामुळे दीर्घकाळ साखरेशी संबंधित रक्तातील समस्या उद्भवू शकतात, ज्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ४० आणि ५० च्या वयोगटातील महिलांना हार्मोन्समुळे रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामांमुळे वजन, ऊर्जा किंवा मूड बाबतीत बदल जाणवू शकतात; असे डॉक्टर घोडी म्हणाले आहेत…
तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट उपयुक्त आहे?
सगळ्यात पहिली पायरी म्हणजे विश्रांती. तुमच्या पद्धतीने तुमचा ताण व्यवस्थापित करा, चांगल्या झोपेला प्राधान्य द्या, नियमित व्यायाम करा. हार्मोनल किंवा दीर्घकालीन चिंतेसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या, त्यामुळे खूप फरक पडू शकतो. जर तुम्हाला असामान्य रक्तातील साखरेची वाढ दिसली, विशेषतः आहारात कोणताही बदल न करता, तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणेच योग्य ठरेल असे डॉक्टर म्हणाले आहेत.
तर रक्तातील साखरेतील बदल नेहमीच तुम्ही काय खाता यावर अवलंबून नसतात; तर काही अंतर्गत कारणे (हिडन ट्रिगर्स) जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्यावर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते…