Cold Shower Health Risks : बहुतांश जण उन्हाळा असो किंवा पावसाळा गरम पाण्याने अंघोळ करून दिवसाची सुरुवात करतात, यामुळे आळसपणा कमी होतो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते असा समज आहे. मात्र, काही जणांना थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. ऋतू कोणताही असो ते बारा महिने अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करतात. थंड पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शरीराची होणारी जळजळ, त्वचेवरील खाज कमी होते, शरीरास चांगली ऊर्जा मिळते; पण थंड पाण्याने अंघोळ करणं प्रत्येकासाठीच फायदेशीर नाही. काही लोकांना थंड पाण्याने अंघोळ केल्याने विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच आधीच कोणत्याही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना तर त्याचे वेगळे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पण, नेमक्या कोणत्या लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करणं टाळलं पाहिजे जाणून घ्या.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन सीनियर कन्सल्टेंट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी म्हटले की, दीर्घकाळापासून मधुमेह किंवा श्वसनासंबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी दररोज थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकूवत असलेल्या किंवा दीर्घकाळापासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी थंड पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्यस्थिती गंभीर होऊ शकते. तसेच बरं होण्याची प्रक्रिया मंदावू शकते, त्यामुळे नियमितपणे थंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘या’ लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

१) हृदयविकार असलेले लोक

थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची गती वाढते. कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट फेल्युअरसारख्या हृदयरोग असलेल्या लोकांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनमधील प्रमुख सल्लागार डॉ. नरेंद्र सिंघला यांनी भर दिला की, या जीवघेण्या गुंतागुंती टाळण्यासाठी हृदयरोग असलेल्यांनी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

२) उच्च रक्तदाब असलेले लोक

डॉ. सिंघला यांनी अधोरेखित केले की, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी थंड पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढू शकतो, तसेच आधीच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना याचा अधिक धोका आहे. रक्तदाब अचानक वाढल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होऊ शकतात.

४) स्ट्रोकचा धोका असलेले लोक

डॉ. सिंघला म्हणाले की, ज्या लोकांना स्ट्रोक किंवा सेरेब्रोव्हस्कुलर आजारांचा इतिहास आहे, अशा लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. अचानक शरीराच्या तापमानात बदल झाल्याने रक्तदाबात तीव्र वाढ होऊ शकते, यामुळे वारंवार स्ट्रोक येण्याचा धोका वाढू शकतो. याच कारणास्तव स्ट्रोकचा धोका असलेल्या लोकांनी रोज थंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) रेनॉड रोग असलेल्या व्यक्ती

रेनॉड रोग हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये थंडीमुळे हाता-पायांच्या बोटांमधील रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात आकुंचन पावतात. रेनॉड रोग असलेल्यांना थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने तीव्र वेदना, सुन्नपणा आणि अत्यंत अस्वस्थता येऊ शकते. डॉ. सिंघला यांनी सांगितल्याप्रमाणे, थंड पाण्याने अंघोळ केल्याने ही लक्षणे आणखी वाढू शकतात, त्यामुळे रेनॉड रोग असलेल्या लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करणं टाळावं.