Dal Cooking Tips For Digestion : बहुतेक भारतीय घरांमध्ये डाळ हा एक महत्त्वाचा पदार्थ असतो. तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ या डाळी रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग असतात. या डाळींची टेस्ट तर उत्तम असतेच आणि आरोग्यासाठीही त्या उपयुक्त असतात. अशा या डाळी सहज शिजतात आणि लज्जतदारही लागतात. याचबाबतीत आरोग्य आणि आहार सल्लागार खुशी छाब्रा यांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले की, डाळ हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, वनस्पती प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे एक पॉवरहाऊस आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, त्यामुळे तुम्ही डाळ कशी शिजवता, कशाप्रकारे त्याचे सेवन करता, या गोष्टींमुळे त्याच्या पौष्टिकतेवर परिणाम होत असतो.
कोणती डाळ कशी खाल्ली तर जास्त पौष्टिक ठरते, कोणी डाळ खावी कोणी टाळावी, योग्य वेळ आणि प्रमाण काय असते आदी गोष्टींकडे आपल्यातील बरेच लोक दुर्लक्ष करतात, असे आरोग्य आणि आहार सल्लागार खुशी छाब्रा यांनी सांगितले आहे; त्यामुळे त्यांनी प्रत्येक डाळीसाठी काही टिप्सदेखील शेअर केल्या आहेत. त्यात सेवनाची चुकीची पद्धत, पचण्याजोग्या आणि आतड्यांना अनुकूल बनवण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.
जसे की,
- अरहर डाळ (Arhar dal) सुरक्षित, संतुलित आणि दुपारच्या जेवणासाठी किंवा (सांबार/रस्समसाठी) सर्वोत्तम आहे.
- अंकुरित झाल्यावर हिरवा अख्खा मूग वजन कमी करण्यासाठी, मधुमेहासाठी आणि वृद्धांसाठी चांगला पर्याय असू शकतो.
- उडीद डाळ हाडे आणि सांधे मजबूत करण्यास मदत करते. डाळ जड असते, पण पचनास मदत करण्यासाठी आले किंवा हिंगासह मध्यम प्रमाणात खाल्ल्यावर चांगले परिणाम देऊ शकते.
- चणा डाळ फायबरने समृद्ध आहे आणि मधुमेहींसाठी उत्तम आहे. पण, ही डाळ कमी शिजवल्यास पोटफुगी होऊ शकते.
- पिवळी मूग डाळ सर्वात हलकी, सुरक्षित आणि आतड्यांसाठी चांगला पर्याय आहे; अगदी मुलांसाठी, आजारी लोकांसाठीदेखील ती उपयोगी आहे.
- मसूर डाळ पचायला हलकी असून लोहाने समृद्ध असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही डाळ उत्तम आहे. पण, ज्यांच्या मूत्रपिंडात खडे आहेत त्यांनी शक्यतो ती टाळावी.
- काळी उडीद डाळ तुमची सहनशक्ती वाढवते. पण, पचायला खूप जड असते; त्यामुळे कमी प्रमाणात खावी.
त्यानंतर खुशी छाब्रा यांनी सगळ्यांना होणारी एक गैरसमजूतदेखील दूर केली, ती म्हणजे डाळीच्या सेवनाने पोटफुगी होते; तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डाळीमुळे पोटफुगी होत नाही, तर स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळे होते. डाळ योग्यरीत्या भिजवून, त्यात मसाले आणि योग्य वेळ शिजवल्यास एक आरोग्यदायी, आरामदायी अन्न ठरू शकते. ही मार्गदर्शक तत्त्वे दैनंदिन खाण्याच्या सवयींमध्ये कशी रूपांतरित होतात हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही एका तज्ज्ञांशी बोललो.
डाळ पचायला सोपी आणि आतड्यांसाठी अनुकूल बनवणारे तंत्र
द इंडियन एक्स्प्रेसने न्यूट्रोडायनॅमिक्सच्या पोषणतज्ज्ञ आणि संस्थापक आदिती प्रभू यांच्याशी चर्चा केली. डाळी पोटफुगी निर्माण करू शकतात. विशेषतः जर तुम्हाला आधीच आतड्यांसंबंधी समस्या किंवा संवेदनशीलता असेल किंवा जर त्या योग्यरित्या तयार किंवा शिजवल्या जात नसतील तरच…
डाळ पचण्यास सोपी आणि आतड्यांसाठी अनुकूल बनवण्यासाठी पुढील पद्धती फॉलो करा…
- शिजवण्यापूर्वी डाळ स्वच्छ धुवून घेणे.
- फायटेट्ससारखे पौष्टिक घटक कमी करण्यासाठी आणि पचनक्षमता सुधारण्यासाठी डाळ ४ ते ६ तास भिजवून ठेवणे.
- आतड्यांना पचायला सोपे जाण्यासाठी चांगले शिजवा.
- जेवण बनवताना जिरे, हिंग, आलं यांसारखे मसाले योग्य प्रमाणात टाकल्यास गॅस कमी होतो.
- स्वयंपाक करताना फॅट्स म्हणजे तूप किंवा तेल मर्यादित प्रमाणात वापरा.
डाळ खाण्याची वेळ पण असते का?
“हो, आणि नाही…” डाळ खाण्याची वेळ प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, कारण पोटात ती कशी जाते यावर अवलंबून असते. पण, वेळ बदलल्यानं शरीरात डाळीतील पोषक तत्त्वांचा शोषणावर फरक पडत नाही. उदाहरणार्थ तूर डाळ पचण्यास जड असते आणि त्यामुळे गॅस होऊ शकतो; त्यामुळे ती शक्यतो दुपारी खावी. तर मूग डाळ पचायला हलकी असते त्यामुळे रात्री खावी. त्याचसोबत डाळ कशी बनवली आहे, किती खाल्ली आणि कोणत्या पदार्थांबरोबर सेवन केले जाते हे देखील महत्त्वाचे आहे.
कोणत्या डाळी मर्यादित खाव्या आणि टाळाव्या?
होय, प्रत्येक डाळीचे पोषण प्रोफाइल वेगवेगळे असतात. आपल्याला कोणती डाळ रोजच्या आहारात घ्यायची हे ठरवताना आपली पचनशक्ती, पोटाचे प्रश्न, वैद्यकीय इतिहास आणि आरोग्याची गरज लक्षात घ्यावी. नवीन डाळीचे सेवन सुरू करण्यापूर्वी थोड्यापासून सुरुवात करा, नंतर हळूहळू प्रमाण वाढवा.