तुम्ही ऑफिस, हॉटेल किंवा मॉलमध्ये असताना हात धुतल्यानंतर हँड ड्रायरचा वापर करता का? जर होय, तर सावध राहा! सार्वजनिक शौचालयामधील हँड ड्रायर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे ड्रायर शौचालयामधीलच हवा खेचतात — म्हणजेच त्यात असलेले जंतू, धूळीचे कण आणि मल-जन्य जीवाणू पुन्हा तुमच्या हातावर सोडले जातात.
शौचालयात हँड ड्रायर वापरू नका!
दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरूच्या ॲस्टर CMI हॉस्पिटल कन्सल्टंट – इन्फेक्शस डिसीज आणि ट्रॅव्हल मेडिसिन, डॉ. स्वाती राजगोपाल सांगतात की, “हँड ड्रायरचा वापर केल्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो. शौचालयामध्ये अनेक लोकांचा वापर असल्यामुळे आणि टॉयलेट फ्लशमुळे हवेत अनेक प्रकारचे जंतू पसरतात. ड्रायर जेव्हा जोरात हवा फेकतो, तेव्हा ते हे जंतू पुन्हा हवेत आणि तुमच्या हातांवर सोडतो.”
स्वच्छतेच्या नावाखाली धोका! हँड ड्रायरमुळे पसरतात हे घातक जंतू
याबाबत बंगळुरूचे नारायणा हेल्थ सिटी, इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. निधान मोहन दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात,”ड्रायरच्या पृष्ठभागाला हात लागणे ही आणखी एक धोकादायक बाब आहे. “वॉशरूममधील हवा सामान्यतः E.coli सारख्या जीवाणूंनी भरलेली असते आणि फ्लश केल्यावर हे जीवाणू पाण्यातून हवेत येतात.”
अनेक अभ्यासांनुसार, जेट एअर ड्रायर हे साध्या वॉर्म एअर ड्रायरपेक्षा जास्त प्रमाणात जंतू पसरवतात, त्यामुळे हात वाळवताना तुम्ही नकळत चेहरा किंवा अन्नाला स्पर्श केल्यास सर्दी, फ्लू किंवा पोटाचे आजार होऊ शकतात.
यावर उपाय काय?
तज्ज्ञ सांगतात की, ड्रायरमधील उबदार हवा सर्व जीवाणू नष्ट करत नाहीत, त्यामुळे पारंपरिक पद्धती वापरणे सुरक्षित ठरू शकतात.
“पेपर टॉवेल वापरणे हा उत्तम पर्याय आहे,” डॉ. राजगोपाल सांगतात. “पेपर टॉवेल हात पटकन वाळवतात आणि काही जंतू पुसून टाकतात. जर पेपर टॉवेल उपलब्ध नसतील, तर स्वतःचा स्वच्छ रुमाल किंवा छोटा टॉवेल वापरा. काही लोक नेहमी पिशवीत टिश्यू ठेवतात. काहीच नसेल तर नैसर्गिकरित्या हवा लागून हात वाळवणंही हँड ड्रायरपेक्षा सुरक्षित आहे.”
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात नीट धुतला पाहिजे. साबण आणि पाण्याने किमान २० सेकंद हात धुवा. स्वच्छ हात आणि योग्य पद्धतीने वाळवणं, या दोन्ही गोष्टी केल्यास संसर्गाचा धोका कमी होतो,” असेही त्या सांगतात.