Drinking Empty Stomach: सोशल मीडियावर दारूशी संबंधित पोस्ट पाहिल्या तर तुम्हाला कळेल की किती लोकांनी उपाशी पोटी दारू प्यायलाचा अनुभव शेअर केला आहे.

काहीजणांसाठी दारू पिणं हे सुट्टीतल्या खास नाश्‍त्यासारखं असतं, तर काहींसाठी कमी दारू पिऊनही पटकन नशा येण्यासाठीचा स्वस्त उपाय. पण, अशा वेळी लोकांना काही मिनिटांतच नशा का होते आणि शरीरात नेमकं काय घडतं ते जाणून घेऊया…

शरीराच्या आत काय घडतं?

साधारणपणे आपण काही खाल्लं किंवा प्यायलं की ते अन्ननलिकेतून पोटात जातं, थोडा वेळ तिथे राहतं आणि मग लहान आतड्यात जातं, जिथून ते रक्तात शोषलं जातं. पण, पोटात अन्न नसेल तर द्रव पटकन लहान आतड्यात पोहोचतो.

लहान आतड्याचा पृष्ठभाग खूप मोठा असतो आणि ते पटकन दारू रक्तात शोषून घेतं, त्यामुळे रक्तात दारूचं प्रमाण (BAC) पटकन वाढतं, जेवण केल्यावर जसं होतं त्यापेक्षा जास्त वेगाने.

दारू मेंदूपर्यंत लवकर पोहोचल्यामुळे मेंदूचे सामान्य कार्य विस्कळीत होतात आणि नशा जास्त जाणवते, त्यामुळे व्यक्तीला भोवळ येणे, चालण्यात-उभं राहण्यात अडचण येणे आणि विचार करण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम दिसतात.

धोके काय आहेत?

डॉ. भूषण भोले सांगतात की, उपाशीपोटी दारू प्यायल्यावर काही मिनिटांतच परिणाम जाणवतो, पण त्याचबरोबर ब्लॅकआऊट (स्मृती हरपणे), मळमळ, उलटी आणि धोकादायक नशेचा जास्त धोका असतो. शरीरासाठी हे सुरक्षित नाही आणि अपघात व दीर्घकालीन नुकसानाची शक्यता वाढवते. व्यक्तीला फारशी नशा झालीय असं वाटत नसतानाही ब्लॅकआऊट होऊ शकतो.

लक्षात ठेवायच्या गोष्टी

दारू प्यायच्या आधी शरीराची तयारी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रथिने, चांगले फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असलेलं संतुलित जेवण करणं.

अंडी, कमी चरबीचं मांस, चीज, सुका मेवा आणि एव्होकॅडो हे उत्तम पर्याय आहेत. हे अन्नपदार्थ पोटात जास्त वेळ राहतात, त्यामुळे पचन हळू होतं आणि दारू शोषले जाण्याचा वेग कमी होतो. कार्बोहायड्रेट्स उपयोगी असले तरी ते पटकन पचतात आणि पोट लवकर रिकामं करतात.

दारू पिताना थोडेफार स्नॅक्स खाल्ले तरी दारू शोषण्याचा वेग कमी होतो आणि पटकन नशा होण्याचा धोका कमी होतो.

शेवटी डॉ. भोले सल्ला देतात की, दारू प्यायच्या आधी आणि पिताना भरपूर पाणी प्यावं. दारू डाययुरेटिक असते, म्हणजे ती शरीरातून लघवीचं प्रमाण वाढवते आणि शरीरातून जास्त पाणी बाहेर टाकते, म्हणूनच दारू पिताना वारंवार लघवीला जावं लागतं. म्हणून उपाशीपोटी दारू पिणं आनंदासारखं वाटलं तरी शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.