Morning Habits to Help You Lose Weight: वाढते वजन ही एक सामान्य समस्या झाली आहे. सगळे जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लोक नानाविध घरगुती उपायसुद्धा वापरताना दिसतात. तुम्हाला माहीत आहेच की, वजनवाढीच्या समस्येला चुकीची आहारशैली, झोपेची चुकीची वेळ आणि आपल्याच काही वाईट व अनारोग्यकारक सवयी कारणीभूत असतात. लठ्ठपणा कमी करणे ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात कठीण समस्या बनली आहे. यासाठी अनेकवेळा आरोग्यदायी आहार घ्यावा लागतो आणि जिममध्ये घाम गाळावा लागतो, तरीदेखील लठ्ठपणापासून सुटका होत नसल्याची तक्रार होत असते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, यासाठी आहारासह जीवनशैलीच्या काही महत्त्वाच्या सवयी लावाव्या लागतील. सकाळी उठल्या उठल्या या सवयी लावल्यास वजन कमी होण्यास मदत होते, असे बंगळुरू येथील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या पोषणप्रमुख शोभा यांनी याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

पोषणप्रमुख शोभा यांनी सांगितल्यानुसार, “वजन कमी करणे ही एक लांब प्रक्रिया आहे, ज्यासाठी संयम आवश्यक आहे. व्यायामाबरोबरच वजन कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. सकाळी काही सवयी अंगीकारल्यास वजन कमी होण्यास मदत होते.” त्या सवयी कोणत्या जाणून घेऊया..

झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ गोष्टी

१. दररोज एक ग्लास पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर रोज एक ग्लास पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

२. दररोज व्यायाम करा

व्यायाम करणे हे फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही तर व्यायाम केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी लवकर उठणे आणि नियमित व्यायाम केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.

३. उपाशीपोटी चालणे किंवा हलके कार्डिओ व्यायाम करा

सकाळच्या वेळी उपाशीपोटी चालण्याने शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. केवळ २० मिनिटं चालल्यानं किंवा कार्डिओ व्यायाम केल्यानंही वजन कमी होण्यास मदत होते. रिकाम्यापोटी व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

४. पोषण असणारा नाश्ता करणे

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाचा. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असलेले पदार्थ असावेत. अंडी, दही, स्मूदी, केळी आणि नट्स हे उत्तम पर्याय आहेत.

५. खाल्ल्यानंतर सरळ उभे राहा

शेवटी, नाश्त्यानंतर सोफ्यावर झोपू नका. पचनास मदत करण्यासाठी आणि पोटाची सूज कमी करण्यासाठी १०-१५ मिनिटे उभे राहण्याचा किंवा हळू चालण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.