Fatty liver and liver health: तुमचे लिव्हर म्हणजेच यकृत हे तुमच्या शरीरातील सर्वात मेहनती अवयवांपैकी एक आहे. ते विषारी पदार्थ फिल्टर करण्यास, पचनास मदत करण्यासाठी आणि तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतात. फंक्शनल मेडिसिनचे डॉ. एड्रियन यांनी यासंदर्भा काही टिप्स शेअर केल्या आहेत.
तज्ज्ञांनी लिव्हरसाठी सर्वात जास्त हानिकारक असलेल्या पदार्थांबद्दल सांगितले आहे. त्यांचे सेवन नियमित केले तर ते कल्पनेपलिकडे जात लिव्हरला धोका निर्माण करू शकतात.
सर्व चरबी लिव्हरसाठी हानिकारक नसते
मांस, देशी तूप किंवा लोणी यांसारखे संतृप्त चरबी असलेले पदार्थ लिव्हरसाठी हानिकारक आहेत असं वाटत असेल तर तसं नाहीये. संशोधनातून असे दिसून आले की, उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप लिव्हरसाठी खूपच हानिकारक आहे आणि ते नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजशी जवळून संबंधित आहेत.
डॉ. एड्रियन यांनी स्पष्ट केले की, बरेच लोक लिव्हरच्या समस्यांसाठी तूप आणि तेल यासारख्या पारंपरिक फॅटला दोष देतात, तरी जास्त साखर, फ्रुक्टोज, प्रत्यक्षात अधिक धोकादायक आहे. ग्लुकोजच्या विपरीत, फ्रुक्टोजचे लिव्रमध्ये सहजपणे चरबीत रूपांतर होते. त्यामुळे लिव्हरचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. कालांतराने या चरबीच्या संचयनामुळे इन्सुलिन प्रतिरोध, लिव्हरची जळजळ आणि अगदी लिव्हर सिरॉयसिस असे गंभीर आरोग्य संकटं उद्भवू शकतात.
दैनंदिन आहारातील घटकांमध्ये दडलेला धोका
फ्रुक्टोज कॉर्न सिरप (HFCS) कुकीज, कँडी, नाश्त्याचे धान्य, कोल्ड्रिंक्स आणि अगदी सॉस तसंच मसाल्यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आढळते. हे पदार्थ साधारण वाटू शकतात मात्र यामध्ये अनेकदा साखरेचे प्रमाण जास्त असते, जे हळूहळू तुमच्या लिव्हरवर ताण आणू शकते.
साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करून आणि पोषक तत्वांनी समृद्ध अन्नाचे सेवन वाढवून तुम्ही लिव्हर निरोगी ठेवू शकता. फ्रुक्टोज कॉर्न सिरप (HFCS) टाळण्याचा अर्थ आवडणार्या पदार्थांचा त्याग करा असे नाही, मात्र तुम्ही काय खाता याची जाणीव ठेवल्याने या महत्त्वाच्या अवयवाचे रक्षण होण्यास खूप मदत होऊ शकते.