Health Benefits of Milk : व्यक्ती लहान असो वा मोठी; प्रत्येकाच्या आरोग्यासाठी दूध चांगले मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, प्रोटीन, आवश्यक जीवनसत्त्वे, आरोग्यदायी चरबी यांसह बहुपोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, रिकाम्या पोटी दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक यावर अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे याच प्रश्नावर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आणि तीच आपण जाणून घेऊ…

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजीच्या सल्लागार डॉ. सोनाली गौतम यांनी दुधातील पौष्टिक मूल्यांवर भर दिला आहे. त्या म्हणाल्या की, हाडांच्या आरोग्याला चालना देणे आणि एकंदरच आरोग्याचे संतुलन राखणे यांसाठी आहारात दुधाचा समावेश करणे फायद्याचे आहे.

दूध पिण्याचे काय फायदे आहेत?

डॉ. गौतम पुढे म्हणाल्या की, दूध हा कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो हाडे मजबूत ठेवण्यास आणि दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहे, दुधाच्या सेवनाने कर्बोदके आणि चरबीचे चांगले संतुलन राखता येते. त्यामुळे आहारात दुधाचा समावेश करणे म्हणजे एक प्रकारे संतुलित आहाराचे सेवन करण्यासारखे आहे.

दुधामध्ये ड व बी-१२ ही जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियमसह अनेक आवश्यक खनिजे असतात; जी विविध शारीरिक कार्यांमध्ये मदत करतात.

रिकाम्या पोटी दूध प्यावे का?

डॉ. गौतम यांच्या मते, रिकाम्या पोटी दूध पिणे हानिकारक ठरू शकते हा समजच मुळात निराधार आहे. त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.

लॅक्टोज इनटॉलरन्समुळे काही व्यक्तींना पचनाशी संबंधित समस्या असू शकतात. परंतु, वैद्यकीय अभ्यासात सामान्य लोकांसाठी रिकाम्या पोटी दूध पिण्याचे कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसून आलेले नाहीत. किंबहुना डॉ. गौतम यांनीही असे नमूद केले की, सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असलेल्या दुधाचा समावेश केला पाहिजे. कारण- त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

लॅक्टोज इनटॉलरन्समुळे तुम्हाला पचनासंबंधीच्या समस्या जाणवू शकतात. पोट फुगणे, गॅस व अतिसार यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. विशेषत: बऱ्याच भारतीय लोकांना याचा त्रास जाणवतो; पण ते याकडे लक्ष देत नाहीत.

जर तुम्हालाही लॅक्टोज इनटॉलरन्सचा त्रास जाणवत असल्यास, तुमच्या आहारात कोणते बदल केले पाहिजेत याविषयी सल्ला घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे डॉक्टर गौतम यांनी सांगितले. अशा परिस्थितीत बदाम दूध, सोया दूध किंवा नारळाचे दूध यांसारखे वनस्पती-आधारित दुधाचे पर्याय फायदेशीर ठरू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूध हा संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. लॅक्टोज इनटॉलरन्स हा त्रास विचारात घेण्यासारखा असला तरी बहुतेक लोकांच्या आरोग्यासाठी रिकाम्या पोटी दुधाचे सेवन करणे सामान्यतः सुरक्षित असते.