Pain Relief Hacks : शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात आता सोशल मीडियावर तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाची बाटली पायाखाली फिरवण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे तळपायांमधील वेदना कमी होतात, असे म्हटले जाते. पण, खरेच हा उपाय वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का यावर आम्ही डॉक्टरांची मते जाणून घेतली.

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन व स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. सैकत जेना म्हणाले की, ज्यांना शरीरातील एखाद्या अवयवात जाणवणाऱ्या तीव्र वेदनांपासून त्वरित आराम मिळवायचा असेल, तर बर्फाच्या बाटलीचा वापर करणे हा एक उत्तम उपाय असू शकतो. पाय मुरगळणे, फ्रॅक्चर, स्नायू दुखणे, सूज येणे, मुका मार यांसारखी तीव्र वेदनादायी दुखापत झाली असेल, तर त्यांच्यासाठीही बर्फाच्या बाटलीचा शेक हा उपाय फायदेशीर आहे. दुखापत झालेल्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी बर्फाचा शेक दिला जातो.

असा बर्फाचा शेक दिल्यामुळे ती दुखापतग्रस्त जागा सुन्न होण्यास आणि वेदनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. रोलिंग मोशन म्हणजे तुम्ही बर्फाची बाटली जेव्हा दुखापत झालेल्या ठिकाणी फिरवता तेव्हा स्नायूंवरील ताण कमी करण्यास मदत होते, असेही डॉ. जेना म्हणाले.

विशेष म्हणजे बर्फामुळे जखमी ऊतींमधील पेशींची क्रिया कमी होते, ज्यामुळे ऊतींचे नुकसान व जळजळ कमी होते. बर्फातील थंडाव्यामुळे मज्जातंतूंच्या सिग्नलची गती कमी होते, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या वेदना कमी झाल्यासारखे वाटते, असे मेट्रो हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सल्लागार डॉ. उदित कपूर म्हणाले.

विशेषत: खेळाडूंना खेळताना अनेकदा दुखापत होत असते. खेळताना त्यांना अधिक शारीरिक ताण असतो. पण हाच ताण दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाच्या बाटलीने रोलिंग मोशन करणे उपयुक्त ठरू शकते.

डॉ. कपूर यांनी सल्ला दिला की, तीव्र दुखापतीनंतर किंवा जुनाट वेदना वाढल्यास त्या कमी करण्यासाठी पहिल्या ४८ तासांत बर्फाच्या बाटलीने शेक द्या, एखादी दुखापत झाल्यानंतर कधीही गरम पाण्याने शेक देण्याचा किंवा कोणत्या हॉट पॅकचा वापर करू नका. कारण- दुखापतीमुळे आधीच सूज आलेली असते, त्यात तुम्ही गरम पाण्याचा शेक दिल्यास जळजळ वाढू शकते. अशा वेळी बर्फाच्या बाटलीने शेक दिल्यास आराम मिळू शकतो.

बर्फाच्या बाटलीचा शेक कशा प्रकारे द्यायचा?

१) एक प्लास्टिकची पाण्याची बाटली तीन-चतुर्थांश पाणी भरा.
२) झाकण न लावता ती बाटली फ्रिजरमध्ये ठेवा.
३) पाण्याची बाटली बर्फाने गोठताच बाहेर काढा. आता बाटलीला झाकण लावा.
४) त्यानंतर बाटली तळपायाखाली ठेवा आणि पायाने हळुवारपणे फिरवा. पायाने ती रोलिंग करा.

पण, हा उपाय प्रत्येकासाठीच प्रभावी ठरू शकत नाही. विशेषतः दीर्घकालीन वेदना किंवा आजारांच्या बाबतीत हा उपाय प्रभावी ठरेलच, असे नाही. पण, हा उपाय ठरावीक वेळाने सतत केल्यास फायदेशीर वाटू शकतो; पण याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असे डॉ. जेना म्हणाल्या.

बर्फाची बाटली त्वचेवर थेट जास्त काळ ठेवल्याने नसांमध्ये जळजळ जाणवू शकते. अशाने त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि आईस बर्न होऊ शकते. बर्फाच्या बाटलीचा शेक देणे कितीही चांगले वाटत असले तरी ठरावीक वेळ करणेच योग्य ठरू शकते. १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ याचा पद्धतीचा वापरू नका किंवा करीत असल्यास मधे मधे ब्रेक घ्या, असे डॉ. जेना म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्वचेला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी बर्फाची बाटली थेट त्वचेवर फिरविण्यासाठी तुम्ही कापड किंवा टॉवेलचा वापर करू शकता. पण, वेदना अधिक जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे डॉ. जेना म्हणाल्या.