Heatstroke: निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी पार पडला. मात्र, चार-पाच तास उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघातामुळं जीव गमवावा लागला. ४२ अंश सेल्सिअस तापमानात व रखरखत्या उन्हात बसल्यामुळं श्री सदस्यांना उन्हाचा त्रास जाणवू लागला. उष्माघातामुळं अनेक जण बेशुद्ध पडत होते. दरम्यान हवामानाचे स्वरूप पाहता आरोग्यतज्ज्ञ लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे. उष्माघात झाल्यास काय करावे आणि उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय उपाय कराल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात आणि उष्मापात असे दोन प्रकार आहेत. सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघातशरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हणून शकता. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यामुळं किंवा जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळं शारिरातील उष्णता संतूलन संस्था काम करायची बंद होत.

उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?

  • चक्कर येणे
  • डोकं दुखणे
  • सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे
  • गरम होत असूनही घाम न येणे
  • त्वचा लालसर होणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • मळमळ होणे, उलट्या होणे
  • जोरात श्वास घेणे
  • हृदयाचे ठोके वाढणे

उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल –

पुरेसे पाणी प्या-

सरासरी दोन लीटर पाणी दररोज शरीरात जाणं गरजेचं असतं. बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. साध्या पाण्याव्यतिरिक्त, नारळाचं पाणी, भाज्या आणि फळांचे रस दररोज प्यायले तरी हरकत नाही.

योग्य सन प्रोटेक्शन वापरा –

एसपीएफ ३० किंवा त्याहून अधिक असलेले, यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून सुरक्षित ठेवणारे सनस्क्रीन लोशन वापरा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी किमान १५ मिनीटे ते सर्व उघड्या त्वचेवर ते व्यवस्थित लावा. रुंद जाड टोपी घाला आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा गॉगलचा वापर करा.

मद्यपान टाळा –

उन्हाळ्याच्या दिवसात अल्कोहोल किंवा सोडा या प्येयांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं व उष्माघात किंवा डिहायड्रेशनची शक्यता दुणावते. मद्यपानाऐवजी अन्य थंड पेये पिण्याचा पर्याय निवडा.

दुपारी उन्हात जाणं टाळा –

दुपारी १२ ते ३ ही वेळ सर्वाधिक उकाड्याची असते. त्यामुळे या वेळेत बाहेर न पडता घरात किंवा अन्य सावलीच्या ठिकाणी राहून आराम करा. या वेळेत तापमान जास्त असल्याने तुमच्या शरीरातली सर्व ऊर्जा काही मिनीटांतच खेचली जाते. या वेळेत बाहेर काम करणं टाळावं.

हेही वाचा – उष्माघातापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ‘या’ खास टिप्स; उन्हाळ्यात असा घ्या आहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उष्माघात झाल्यास काय कराल?

उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. तसंच, त्या व्यक्तीचे शरीर ओल्या कापडाने पुसून घ्यावे.