3 Ways To Reduce Tea Addiction : सकाळचा नाश्ता, आळस दूर करण्यासाठी, तर कधी टेन्शन तर कधी आनंदात अनेक जण चहा पिणे पसंत करतात. चहा घेणार का म्हटल्यावर कधीच नाही न म्हणणारी मंडळी खरी चहाप्रेमी असतात. पण, चहाप्रेमींनो दिवसातून तुम्ही किती वेळा चहाचे सेवन केले पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही…, तर चला मग या बातमीतून जाणून घेऊयात…

अनेक लोकांच्या दिवसाची खरी सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा त्यांच्या स्वयंपाकघरातून चहाचा सुंगंध दरवळतो. पण, जर चहा दिवसातून तीन ते चार कपपेक्षा जास्त होऊ लागला, तर थोडा विचार करणं गरजेचं आहे की, कदाचित आपण जरा जास्तच चहाचे सेवन तर नाही करत आहोत ना?

पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर तुम्ही दररोज एखादी दिनचर्या (रूटीन) पाळत असाल तर तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन कपपेक्षा जास्त चहाचे सेवन नाही केले पाहिजे. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि कॉफीचे सेवन करणे टाळा आणि भरपूर नाश्ता करायला जमत नसेल तर फळं खाऊन दिवसाची सुरुवात करा. तसेच फळं ताजी खा; त्यात कोणतीही साखर, मीठ, चाट मसाला किंवा अगदी फळांचा रस करूनसुद्धा त्याचे सेवन करू नका. तसेच जेवण वगळून चहा पिणे आणि झोप न येण्यासाठी दुपारी ४ नंतर चहा घेणे या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत,कारण यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.

पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी यादरम्यान विनोद करत एका वृद्ध महिलेची गोष्टसुद्धा सांगितली. ऋजुता दिवेकर जेव्हा हिमालयात ८० ते ८५ वयोवर्ष असलेल्या एका वृद्ध महिलेला भेटल्या होत्या; त्यांच्या म्हणण्यानुसार दिवसातून त्यांनी ५० कप चहा प्यायला तरी तिला ॲसिडीटीचा त्रास होत नव्हता; जर तुम्हीही या वृद्ध महिलेपैकी एक असाल तर तुम्ही दिवसाला कितीही चहा पिऊ शकता; असे त्यांनी आवर्जून म्हटले आहे

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होईल?

टोन ३० पिलेट्सच्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ आश्लेषा जोशी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जेव्हा पौष्टिक नाश्त्याऐवजी आपण सकाळी फक्त चहा पितो, तेव्हा शरीरात आम्लता वाढते. सकाळी पोट रिकामे असते आणि टॅनिन, कॅफिनसाठी अधिक संवेदनशील असल्याने पचनक्रियेत त्रास होऊ शकतो. यामुळे चहाचे सेवन केल्यानंतर थोड्या काळासाठी फ्रेश वाटते आणि त्यानंतर ऊर्जेची कमतरता निर्माण होऊ शकते, कारण शरीराला टिकवून ठेवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोज चहामध्ये नसल्यामुळे लगेच थकवा येऊ शकतो.

कालांतराने सकाळी चहा पिण्याची सवय शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरू शकते. विशेषतः लोह शोषणात अडथळा येऊ शकतो, कारण चहामधील काही संयुगे शरीराच्या अन्नातून खनिजे शोषण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणू शकतात.

दुपारी ४ नंतर चहा प्यायल्याने झोपेच्या चक्रात अडथळा येतो का?

चहामध्ये कॅफिन असते, जे मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि मेलाटोनिनच्या प्रकाशनास विलंब करू शकते. शरीराला झोपेची वेळ झाली आहे हे सूचित करणारा हा संप्रेरक असतो. संध्याकाळी चहा प्यायल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटतं नसले तरीही ४ नंतर चहाचे सेवन केल्यामुळे झोपेच्या चक्रावर परिणाम होतो, यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा, गोष्टी लक्षात ठेवण्यात अडथळे आणि ताण जास्त जाणवू शकतो.

चहा पिण्याची सवय कशी सोडवायची?

तुमच्या सकाळच्या चहाऐवजी,

  • हर्बल इन्फ्युजन किंवा कोमट लिंबू पाणी पिण्यास सुरुवात करा; ज्यामुळे कॅफिन न मिळता गरम पेय तुम्हाला आराम देईल.
  • चहाबरोबर निरोगी चरबी आणि प्रथिने असलेल्या लहान नाश्त्याचे सेवन करावे, ज्यामुळे चहा पिण्याची इच्छा कमी होते आणि ऊर्जेची पातळी स्थिर राहते.
  • चहा पूर्णपणे सोडून देण्याऐवजी त्यात जास्त दूध किंवा पाणी टाका; ज्यामुळे शरीराला डोकेदुखी किंवा थकवा कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेता येते.