Tulsi For Weight Loss: तुळस शतकानुशतके आयुर्वेदिक उपचारांमध्ये एक प्रमुख घटक आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या, ताण कमी करण्याच्या आणि पचनास मदत करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. पण, तुळस पोटाची चरबी जाळण्यास मदत करू शकते का? अनेकांना असा विश्वास आहे की, तुळशीचे चयापचय वाढवणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करू शकतात, विशेषतः जेव्हा संतुलित आहार आणि व्यायामासह ते एकत्रित केले जाते.

तुळशीसारखे नैसर्गिक उपाय बहुतेकदा सुरक्षित मानले जातात, परंतु त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे.

तुळशीचा चयापचय प्रक्रियेवर कसा परिणाम होतो आणि ते पोटाची चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे?

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा इंडियन एक्स्प्रेसला सांगतात की, “तुळस ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी लिपिड प्रोफाइल सुधारून आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून चयापचय वाढवू शकते; ज्यामुळे ती कोणत्याही वजन व्यवस्थापन योजनेत एक मौल्यवान भर टाकते. तिचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म डिटॉक्सिफिकेशन आणि ताण कमी करण्यास मदत करतात, अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत करतात. तुळस थेट पोटाच्या चरबीला लक्ष्य करत नसली तरी तिचे चयापचय फायदे संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह जोडल्यास पोटाभोवतीच्या चरबीसह एकूण वजन कमी करण्यास मदत करू शकतात.”

त्या पुढे म्हणातात की, वजन कमी करण्याच्या धोरणात तुळशीचा समावेश करू इच्छिणाऱ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, पोटाच्या चरबीवर होणाऱ्या थेट परिणामाबद्दल मर्यादित संशोधन आहे, म्हणूनच व्यापक वजन व्यवस्थापन दृष्टिकोनाचा भाग म्हणून तुळशीचा वापर करण्याची शिफारस केली जाते. तुळशीच्या पानांचा फायदा घेऊन, व्यक्ती त्यांचे चयापचय वाढवू शकतात, पचन सुधारू शकतात, ताण कमी करू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित करू शकतात, जे सर्व निरोगी वजन साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

वजन व्यवस्थापनासाठी तुळशीचे सेवन करण्याचे सर्वोत्तम मार्ग मल्होत्रा यांनी नमूद केले आहेत.

तुळशीचा चहा

८-१० ताजी पाने किंवा १ चमचा सुकलेली पाने १० मिनिटे उकळत्या पाण्यात भिजवून ठेवल्याने चयापचय प्रभावीपणे वाढते आणि पचनास मदत होते. दिवसातून एकदा किंवा दोनदा, शक्यतो रिकाम्या पोटी, ते प्यायल्याने भूक कमी होण्यास आणि चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

कच्ची पाने

सॅलेडमध्ये ताजी तुळशीची पाने घालल्याने अँटिऑक्सिडंट फायदे मिळू शकतात आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते.

पूरक आहार

तुळशीच्या कॅप्सूल हा एक सोयीस्कर पर्याय असू शकतो, विशेषतः ज्यांना त्यांच्या आहारात या औषधी वनस्पतींचा समावेश करणे कठीण वाटते त्यांच्यासाठी हा चांगला उपाय आहे. सामान्य डोस दररोज १-२ कॅप्सूल (५००-१००० मिग्रॅ) असतो, परंतु कोणताही पूरक आहार सुरू करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

“वजन व्यवस्थापनासाठी तुळशीचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुळशीचा चहा पिणे. ही पद्धत प्रभावी आहे, कारण ते चयापचय वाढवू शकते, पचन वाढवू शकते आणि तणाव पातळी कमी करू शकते, जे सर्व वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देतात,” असे मल्होत्रा सांगतात.

नियमित तुळशीच्या सेवनाचे संभाव्य दुष्परिणाम

तुळस सुरक्षित असली तरी मल्होत्रा यावर भर देतात की, तुळशीमुळे खालील गोष्टी होऊ शकतात :

पचनाच्या समस्या : जास्त तुळशीचे सेवन केल्याने मळमळ आणि जुलाब होऊ शकतात.

रक्तातील साखरेची पातळी : तुळस रक्तातील साखर कमी करू शकते, म्हणून मधुमेही रुग्णांनी त्यांच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करावे.

रक्त पातळ होणे : यामुळे रक्त पातळ होऊ शकते, जे अँटीकोआगुलंट औषधे घेत असल्यास धोकादायक ठरू शकते.

गर्भधारणा : गर्भाशयावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे गर्भवती महिलांनी तुळस टाळावी.

प्रजनन क्षमता आणि थायरॉईड समस्या : तुळशीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते आणि थायरॉक्सिनची पातळी कमी करून हायपोथायरॉईडिझम आणखी बिघडू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल, तर तुमच्या आहारात तुळशीचा समावेश करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे,” असे तज्ज्ञ म्हणतात.