Jamun Benefits: जर तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करण्यासह पचनक्रियेसंबंधी फायदे शोधत असाल, तर जांभूळ हे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर फळ आहे. भुवनेश्वर येथील केअर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी जांभळाच्या पौष्टिकतेचे एक संक्षिप्त वर्णन आमच्यासह शेअर केले आहे.
१. कमी कॅलरीज : हे कमी कॅलरीज असलेले फळ आहे, एक कप कच्च्या जांभळात फक्त ६० कॅलरीज असतात, त्यामुळे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे एक चांगला पर्याय आहे.
२. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : जांभूळ हे अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे, जे शरीराला फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक रेणूंमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
३. मधुमेहाचे व्यवस्थापन करा : जांभळात अशी संयुगे असतात, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, इन्सुलिन स्राव वाढवतात आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त ठरू शकते.
४. पचन सुधारते : जांभळातील फायबर घटक पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकतात.
५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : जांभळात व्हिटॅमिन-सी असते, जे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते. जांभूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.
६. हृदयाचे आरोग्य सुधारते : जांभळातील अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.
मधुमेह व्यवस्थापनासाठी जांभळाच्या बियांच्या पावडरचे चमत्कार
बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. पूजा पिल्लई यांनी सांगितले की, जांभळाच्या बियांची पावडर हा एक पारंपरिक उपाय आहे, जो मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
“यामध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन संयुगे भरपूर प्रमाणात असतात, जे स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर कमी करण्यास मदत करतात. ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासदेखील मदत करते,” असे त्या म्हणाल्या.
मधुमेहाव्यतिरिक्त डॉ. पिल्लई यांनी नमूद केले की, जांभूळ पचनासदेखील मदत करते, यकृताचे कार्य सुधारते आणि त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. “मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह दररोज एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर घेतल्याने फायदा होऊ शकतो, ते स्मूदी, ताक किंवा सॅलेड किंवा ओट्सवर टाकून पौष्टिकता वाढवता येते,” असे तज्ज्ञ म्हणाले.
तसेच तज्ज्ञांनी सांगितले की, जांभळाच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होऊ शकते, विशेषतः जर मधुमेहाच्या औषधांसोबत घेतले तर. डॉ. पिल्लई यांनी गर्भवती, स्तनपान देणाऱ्या महिला आणि इन्सुलिन घेणाऱ्या महिलांना ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा इशारा दिला आहे.