मखाना ज्यांना कमळाच्या बिया किंवा फॉक्सनट्सदेखील म्हणतात. मखाना हा आपल्यापैकी अनेकांसाठी एक आवडता नाश्ता बनले आहे, कारण त्यांचा वापर खासकरून कॅलरी न वाढवता तृप्तता मिळवण्यासाठी होतो. पण, बहुतेक तज्ज्ञ मखानाच्या फायद्यांची पुष्टी करतात. पण, भारतीय पदार्थ आणि चयापचय प्रक्रियेवर त्यांचा परिणाम तपासणारे चयापचय आरोग्य प्रशिक्षक (metabolic health coach) करण सरीन सांगतात, “३० ग्रॅम मखाना खाल्ल्यानंतर दोन तासांनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ दिसून आली.” या दाव्यामुळे मखाना खाणे योग्य आहे की अयोग्य, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सरीनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले, “मला आशा आहे की, तुम्ही माझा याबद्दल द्वेष करणार नाही, पण मखाना खाल्ल्यानंतर माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण ७६ अंकांनी वाढले आहे, ही एक मोठी वाढ आहे. ही वाढ होण्याचे कारण म्हणजे मखान्यातील सुमारे ७८ टक्के कॅलरीज कार्बोहायड्रेट्सपासून येतात, म्हणजेच ३० ग्रॅम सर्व्हिंगमध्ये ५ ग्रॅम प्रथिने असतात, परंतु २३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यापैकी ४.५ ग्रॅम फायबर होते,” असे सरीनने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरीन यांनी नमूद केले की, “चांगली गोष्ट” म्हणजे त्यांच्यात फॅट्सचे प्रमाण कमी असते. पण, जर मी वस्तुनिष्ठपणे पाहिले तर मखान्यांबाबत केला जाणारा प्रचार मला समजत नाही. मी मीठ न लावलेले शेंगदाणे खाणे किंवा डाळ खाणे पसंत करेन, कारण त्यात जास्त प्रथिने, कमी कार्ब्स आणि थोडे जास्त फॅट असते.” पण, सरीन यांनी केलेल्या दाव्यात काही तथ्य आहे का?
मखाना खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, या दाव्यात काही तथ्य आहे का?
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना अपोलो स्पेक्ट्रा मुंबई येथील आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी मान्य केले की, “मखान्यांना त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. “ज्यांना त्यांच्या कॅलरीजची काळजी आहे, त्यांच्यासाठी ते एक आदर्श स्नॅकिंग पर्याय मानले जातात. ते अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्रोत आहेत आणि त्यात काही प्रथिने असतात.”
मखाना खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते पण…
सर्व आरोग्यदायी फायदे असूनही अन्सारी यांनी सहमती दर्शवली की, “मखाना खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होणे” शक्य आहे, कारण ते कार्बोहायड्रेटयुक्त अन्न आहे. “जर मखाना थोड्या थोड्या वेळाने न खाता सातत्याने खाल्ला तर तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते,” असे अन्सारी सांगतात.
अन्सारी यांच्या मते, मखाना कसा तयार केला जातो याचा त्यांच्या ग्लायसेमिक आरोग्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
“जर तुम्ही तुमचा मखाना तूप किंवा तेलात तळला तर त्यात फॅट्सचे प्रमाण वाढू शकते आणि तुमचे शरीर अन्न कसे पचवते यानुसार ते नकारात्मक परिणाम करू शकते,” असेही अन्सारी सांगतात.
रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून मखाना कसा आणि किती खावा?
अन्सारी सांगतात, खाल्लेल्या प्रत्येक अन्नाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो, म्हणून साखरेची पातळी स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे ते कमी प्रमाणात खाणे. “तूप किंवा तेलात तळणे टाळा; त्याऐवजी तुमच्या आरोग्यासाठी हलके भाजलेले किंवा एअर फ्राय केलेले मखाने निवडा. जर तुम्हाला मखाना खाण्याबद्दल काही चिंता असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी पोषणतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.”