वजनाबाबत अनेक जण चिंतेत असतात. वजन कमी असणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे; पण ते योग्य पद्धतीने कमी करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अभिनय आणि मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात काम करताना वजन कमी राखण्यासाठी प्रत्येकावर नकळत एक दबाव असतो. त्यामुळे काही अभिनेत्री वजन कमी करण्याच्या औषधांचा वापर करतात, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणामदेखील होऊ शकतो. याच विषयावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे मांडले, ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने अलीकडेच अभिनय क्षेत्रात वजन कमी करण्याच्या पद्धती आणि त्याचा लोकांवर होणारा विपरीत परिणाम, तसेच त्यांच्या जवळच्या लोकांशी असलेल्या नातेसंबंधांवर होणारा परिणाम याबद्दल तिचे विचार मांडले.

५० वर्षीय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा असा ठाम विश्वास आहे, “बारीक असणे यात काही गैर नाही; पण ते आरोग्य धोक्यात टाकून करू नये. मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मी स्वत:च्या पायावर उभी आहे. मी स्वत:ला सांगते की, मी अद्वितीय आहे आणि मी मा‍झ्या शरीराच्या आकाराबाबत आनंदी आहे.”

‘एचटी हेल्थ शॉट्स’ला माहिती देताना अभिनेत्री कुलकर्णी सांगते, “माझे आरोग्य धोक्यात टाकून मी बारीक राहण्याचा प्रयत्न करrत नाही. आजकाल बारीक होणे ही एक फॅशन आहे. मला समजते की, आजच्या काळात त्याची मागणी आहे. कारण- मी पडद्यावर काम करते. तुम्ही जितके बारीक असाल, तितके तुम्ही पडद्यावर चांगले दिसाल. अशा स्थितीमध्ये तुम्हाला असे मित्र असणे खूप सामान्य आहे; ते जे अन्न खातात आणि उलटी करतात. (या स्थितीला बुलिमिया नर्वोसा/ bulimia nervosa म्हणतात) आणि ते वजन कमी करण्याची औषधेदेखील घेत असतात.”

दिल चाहता है’फेम अभिनेत्री सोनालीने तिच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींच्या वजन कमी करण्याची औषधे घेतल्याबद्दल आणि त्यांचे दुष्परिणाम जाणवत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सोनाली सांगते, “ते ज्या पद्धतीने ‘चिड-चिड’ करतात, त्यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांशी ज्या पद्धतीने वागतात, सहकलाकारांना ज्या पद्धतीने ते प्रतिक्रिया देतात. ते पाहून मला खूप काळजी वाटते. मेकअपशिवाय अनेक लोकांना पाहणेदेखील एक वेगळाच अनुभव आहे. आपण हे जे घेत आहोत, ही त्याची किंमत आहे, असे मला वाटते. जर तुमच्या डॉक्टरांनी ते औषध लिहून दिलेले नाही तर तुम्ही ते का घेत आहात?”

वजन कमी करण्याची औषधे कोणती आहेत?(What are weight loss drugs?)

वजन कमी करण्याच्या औषधांबाबत माहिती देताना चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी सांगतात, “वैद्यकीय सल्ल्यानुसार वजन कमी करण्यासाठी दिले जाणारे ओझेम्पिक मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. विशेषत: लठ्ठपणा किंवा इन्सुलिन प्रतिरोधकतेशी झुंजणाऱ्या लोकांमध्ये या औषधाचा लक्षणीय परिणाम दिसून येतात. ओझेम्पिक हे हे सेमाग्लुटाइड आहे, जे मूलतः टाईप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी विकसित केलेले एक प्रीस्क्रिप्शन औषध आहे.

“हे GLP-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे, जे ग्लुकागॉनसारख्या पेप्टाइड-1 (GLP-1) नावाच्या संप्रेरकाच्या (हार्मोन्सच्या) कृतीची नक्कल करते. हे संप्रेरक (हार्मोन) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावते (ज्यामुळे अन्न तुमच्या पोटात जास्त काळ राहते) व मेंदूला पोट भरल्याचा संकेत देऊन भूक कमी केली जाते,” असे दीपलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.

वजन कमी करण्याच्या औषधांचे वाईट परिणाम होतात का?(Can they come with side effects?)

इंदूर येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन सल्लागार डॉ. योगेश शाह सांगतात, “वजन कमी करणारी औषधे, विशेषतः सेमॅग्लुटाइड (semaglutide) सामान्यतः वेगोवी किंवा ओझेम्पिक (Wegovy or Ozempic) म्हणून ओळखले जाते आणि लिराग्लुटाइड (liraglutide)सारखे नवीन पर्याय, मळमळ व उलट्या, अतिसार किंवा बद्धकोष्ठ, पोटात सौम्य अस्वस्थता आणि भूक न लागणे, असे दुष्परिणाम दर्शविते. त्यांच्या मते, चिडचिडेपणा, राग किंवा मूड बदलणे हे या औषधांचे सामान्यत: दिसणारे दुष्परिणाम नाहीत.

पण, डॉ. शाह म्हणाले की, या औषधांचे मूडशी संबंधित दुष्परिणाम जरी दुर्मीळ असले तरी ते पूर्णपणे नाकारता येत नाहीत. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती जलद वजन कमी करणे किंवा आहारातील बदल यांसारख्या महत्त्वपूर्ण शारीरिक बदलांमधून जात असते. तेव्हा हे बदल कधी कधी बदललेली ऊर्जेची पातळी, शरीराच्या आकाराबाबतच्या धारणा किंवा फॅट्स कमी होण्याशी संबंधित हार्मोनल बदल यांमुळे अप्रत्यक्षपणे मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात.

शहा यांनी असेही स्पष्ट केले, “ज्या व्यक्तींना मूड डिसऑर्डरचा इतिहास आहे, त्यांनी वजन कमी करण्याचे कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करावी.”

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

डॉ. शाह यांच्या मते, ही औषधे नेहमीच वैद्यकीय देखरेखीखाली वापरणे आवश्यक आहे, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, रक्तातील साखरेच्या पातळीवरही त्यांचा परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्याव्यतिरिक्त, ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची जोखीम आणि मूत्रपिंडाच्या कार्याचे संरक्षण करणे असे अतिरिक्त फायदेदेखील देऊ शकतात, जी योग्यरीत्या लिहून दिली गेल्यास ते एक मौल्यवान साधन ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी यावर भर दिला की, राग किंवा चिडचिडेपणासारखे मूडबदल हे वजन कमी करण्याच्या औषधांचे मानक दुष्परिणाम नसले तरी कोणत्याही असामान्य लक्षणांची त्वरित डॉक्टरांकडे तक्रार करावी. सुरक्षित आणि शाश्वत परिणामांसाठी प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक गरजेनुसार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.