Hair Grown Inside Throat: एका ५२ वर्षांच्या व्यक्तीच्या घशात अचानक एक केस वाढल्याची अत्यंत दुर्मिळ घटना सध्या वैद्यकीय अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे. याला एंडोट्रॅकियल केस असेही म्हणतात. अमेरिकन जर्नल ऑफ केस रिपोर्ट्समध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे. ही व्यक्ती ऑस्ट्रियन असून मागील ३० वर्षे रोज धूम्रपान करत आहे. दररोज किमान एक संपूर्ण सिगारेटचे पाकीट तो वापरायचा, यानंतर त्याला खोकला, श्वसननलिकेत जळजळ असे त्रास सुद्धा होत होते. परिस्थीती आणखी वाईट होत असताना त्याला घशातून कर्कश्श आवाज येणे, श्वास न घेता येणे व खोकला एकदा सुरु झाला की न थांबणे असे त्रास जाणवू लागले. २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्याच्या घशात होणारी जळजळ ही वाढलेल्या केसांमुळे होत असल्याचे निदान झाले. त्याच्या घशात चक्क ५ सेमी लांब एवढा केस वाढला होता. प्राप्त माहितीनुसार तो १९९० पासून रोज सिगारेट ओढायचा व २००६ पासून त्याला होणारा त्रास वाढू लागला होता.

इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा रुग्ण १० वर्षांचा असताना त्याच्या श्वासनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याची श्वासनलिका कापून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत करण्यासाठी हवा नळी ठेवली गेली. नंतर त्याच्या कानाची त्वचा आणि उपास्थि वापरून नळी बंद करण्यात आली होती. आता याच भागात केस वाढला आहे. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, १४ वर्षे हा माणूस केस काढण्यासाठी दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जात असे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केसांची वाढ सिगारेट ओढण्याच्या त्याच्या सवयीमुळे झाली होती.

अहवालात पुढे नमूद केले आहे की २०२२ मध्ये त्याने धूम्रपान सोडल्यानंतरच ही स्थिती आटोक्यात आली. डॉक्टरांनी एंडोस्कोपिक आर्गॉन प्लाझ्मा कोग्युलेशन करून त्याच्या घशातील केसांच्या पेशी जाळल्या होत्या. उपचार झाल्याने त्याला आराम मिळाला असला तरी ही स्थिती समजून घेणे आता महत्त्वाचे ठरत आहे.

डॉ. चंद्रवीर सिंग, सल्लागार ओटोरिनोलॅरिन्गोलॉजिस्ट, (डोके आणि मान) ऑन्को सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की एंडोट्रॅचियल केसांच्या वाढीचे नेमके कारण पूर्णपणे समजलेले नाही. सिंग सांगतात की, “एंडोट्रॅचियल केसांची वाढ ही एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीच्या घशात केसांची असामान्य वाढ होते. सिगारेटच्या धुराच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने घशातील ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि त्यांना त्रास होऊ शकतो. हे स्टेम पेशींना केसांच्या कूपांमध्ये बदलू शकते, ज्यामुळे घशाच्या संवेदनशील भागात केसांची असामान्य वाढ होऊ शकते.”

डॉ. सिंग यांनी पुढे सांगितले की, “एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, खोकला बरा न होणे, घोरणे, आवाज कर्कश्श होणे आणि जळजळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. घशातील केसांच्या असामान्य वाढीमुळे अस्वस्थता आणि सतत निराशा जाणवू शकते. तसेच यामुळे वायुमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.”

एंडोट्रॅचियल केसांच्या वाढीसाठी उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणजे या घटनेतील रुग्णावर वापरण्यात आलेली ‘ एंडोस्कोपिक आर्गॉन प्लाझ्मा कोग्युलेशन’ प्रक्रिया. यामध्ये अँटीबायोटिक्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल उपचारांचा समावेश असतो. घशातील केस बॅक्टेरियाने झाकलेले असल्यास, डॉक्टर प्रतिजैविक घेण्याचा सल्ला देऊ शकतात. एंडोस्कोपिक आर्गॉन प्लाझ्मा कोग्युलेशन ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी केसांची मुळे जाळते, पुढील वाढ थांबवते. एंडोट्रॅचियल केसांची वारंवार होणारी वाढ टाळण्यासाठी रुग्णाला एका वर्षाच्या अंतराने उपचारांचा प्रत्येक टप्पा पूर्ण करायचा असतो.

हे ही वाचा<< २१ दिवसांत १३ किलो वजन घटवणारा ‘मिलर’ आला चर्चेत! वजन कमी करण्यासाठी वापरलेला ‘हा’ फंडा तुम्हाला साजेसा आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सिंग सांगतात की, जर एंडोट्रॅचियल केसांची वाढ धूम्रपानाशी संबंधित असेल तर धूम्रपान सोडणेच फायद्याचे ठरेल. अशा केसांची वाढ रोखण्यासाठी एंडोट्रॅकियल ट्यूबची नियमितपणे तपासणी करा. जर तुम्हाला केसांच्या वाढीचा संशय आला किंवा काही लक्षणे जाणवली तर त्वरित निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.