Pooja Chopra Diet secrets : नेटफ्लिक्सवरील ‘खाकी- द बंगाल चॅप्टर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाबरोबर २००९ साली मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या पूजा चोप्राच्या अभिनयाचीसुद्धा चांगलीच चर्चा होत आहे. अलीकडेच तिने तिच्या फिटनेस व डाएटचे सिक्रेट सांगितले आहे. तिने सांगितले की, तिला फॅड डाएट आवडत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॅड डाएट म्हणजे काय? तर फॅड डाएट म्हणजे वजन कमी करण्यासाठी झटपट आणि लोकप्रिय होणारे डाएट. हे डाएट तात्पुरते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, पण तितकेच आरोग्यासाठी हानिकारक आहे; पण तरीसुद्धा अनेक लोक वजन कमी करण्यासाठी फॅड डाएट करतात.
पूजा सांगते, “मी फॅड डाएट कधीही करत नाही, कारण मला माहीत आहे की माझ्यासाठी काय चांगले आहे आणि काय नाही. मग मी का फॅड डाएट करावा? मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी कधीही कोणत्याही गोष्टीला बळी पडली नाही, मग ते फॅड डाएट असो किंवा इतर काहीही.”
द इंडियन एक्स्प्रेसनी फॅड डाएट्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फिटेलो येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा (Umang Malhotra) यांच्याशी संवाद साधला. उमंग मल्होत्रा सांगतात, “असे डाएट अनेकदा खूप लवकर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात, पण याचे अनेक तोटे असतात, ज्याविषयी आपल्याला माहिती नसते. ते आवश्यक अन्न पदार्थांना कमी करतात, ज्यामुळे शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता जाणवते आणि चयापचय मंदावते.”
मल्होत्रा पुढे सांगतात की, फॅड डाएटमुळे परिणाम लवकर दिसू शकतात पण ते तात्पुरते असतात. “लवकर वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या अन्नपदार्थांचे सेवन टाळल्याने तुमचे चयापचय आणि प्रतिकारशक्ती खराब होऊ शकते. विविध पोषक तत्त्वांनी भरलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, जो दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरतो.”
पूजा चोप्राचे डाएट सिक्रेट
अभिनेत्री पूजा चोप्रा सर्व काही खाते, पण ती ते मर्यादित प्रमाणात सेवन करते. ती सांगते, “मी कोणत्याही पदार्थांचे सेवन करताना अतिरेक करत नाही. मी दर दोन-तीन तासांनी खाते. मग ते केळी, काकडी, चॉकलेट किंवा इतर काहीही असू शकते. मला पोटभरेपर्यंत खायला आवडते, पण मी जास्त खात नाही.”
पूजाला कोणत्याही गोष्टीची सवय करून घ्यायला आवडत नाही, त्यामुळे ती एक दिवसाआड चहा पिते आणि सुट्टीच्या दिवशी अधूनमधून गोड खाते.
ती पुढे सांगते, ” जेव्हा मी सुट्टीवर असते, तेव्हा मी स्वतःला थांबवत नाही. गुलाबजाम असो किंवा रसमलाई, मी सर्व काही खाऊ शकते, पण मी घरी तयार केलेले पौष्टिक जेवण करते.”
पूजा तिच्या दैनंदिन आहाराविषयी बोलताना सांगते की, ती दिवसाची सुरुवात नारळाच्या पाण्याने करते. ती सांगते, “नारळाचे पाणी मला हायड्रेट करते आणि ते आरोग्यासाठी चांगले असते. माझा नाश्ता खूप हेल्दी असतो. ती नाश्त्यामध्ये रताळ्याचा पराठा, उपमा, अॅव्हेकॅडो टोस्ट किंवा इडली-डोसा खाते.”
तिला ग्लुटेनची अॅलर्जी असल्याने ती गहू खात नाही. पूजा पुढे सांगते, “मी दुपारच्या जेवणात फक्त डाळ किंवा भाजीबरोबर रागी रोटी किंवा ब्राऊन राईस खाते. रात्रीच्या जेवणात संध्याकाळी ७.३० च्या सुमारास चणे, ब्रोकोली किंवा कोणत्याही भाज्यांचे सॅलेड किंवा बीटरूट आणि टोमॅटो किंवा पालकाचे सूप पिते. माझ्या वर्कआउट्स आणि जेवणाच्यादरम्यान भाज्यांचा रससुद्धा पिते. हा रस सहसा काकडी, बीटरूट आणि गाजरापासून तयार केला जातो. मी वर्कआउटनंतर प्रोटीन शेकसुद्धा घेते.”
मल्होत्रा यांच्या मते, पूजा चोप्राचा आहार ताजा संतुलित आहे, कारण ती फॅड डाएट टाळते आणि तिला भूक लागली तेव्हा दर काही तासांनी खाते, जे चयापचय क्रियेसाठी उत्तम आहे. रात्री सॅलेड किंवा भाज्यांच्या रसावर जास्त अवलंबून राहिल्याने कदाचित प्रोटिनमध्ये विविधता असल्याने तिला भूक लागत नाही. आहाराबाबतीत तिचा संयम आणि नियमित हायड्रेशन एक वेगळा आणि आरोग्यदायी दृष्टिकोन दर्शवतो, पण आणखी विविध प्रकारचे प्रोटिन्स स्त्रोत जोडल्याने तिचा आहार निरोगी ठरू शकतो.
फिटनेस रूटीन
पूजाने सांगितले की, ती आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करते आणि तिच्या शरीराला दोन दिवस आराम देते. “मी जिममध्ये व्यायाम करते, पण मला कंटाळा येतो, म्हणून माझा ट्रेनर मला वेगवेगळ्या प्रकारचे रूटीन सांगतो. कधी पोहणे किंवा किकबॉक्सिंग असते तर कधी वेट ट्रेनिंग किंवा मिक्स्ड मार्शल आर्ट्स असते,” असे पूजा सांगते.
“मला स्पिनिंग आवडते, पण त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्या पोट, कंबर, नितंबांचे स्नायू आणि माझ्या संपूर्ण शरीराच्या खालील अवयवांना वेदना जाणवतात,” असे ती पुढे सांगते.