Are Eggs Healthy, Eggs Can Reduce Risk of Cardiovascular Disease: हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असतं. हृदय बंद पडलं, तर जीव जातो. आजकाल हृदयाशी संबंधित समस्या हे जगभरातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. आजकाल बदलती जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार यांमुळे हृदयाशी संबंधित आजार झपाट्यानं वाढत आहेत. काही लोकांना जिम करताना, काहींना नाचताना, गाताना, काहींना चालताना हृदयविकाराचा झटका येतो. जे लोक मजबूत, तंदुरुस्त व निरोगी दिसतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. अगदी तरुण मंडळीही या मृत्यूला बळी पडत आहेत. सध्याच्या परिस्थितीत हृदय निरोगी राखण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप जास्त महत्त्वाचे बनले आहे. नवी दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. निशीथ चंद्रा यांनी हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी सुपरफूडविषयी सांगितले असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…
अनेकांच्या आहारात अंड्यांचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे आम्लेट खाणे हा आपल्यातील कित्येकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. अंड्याच्या सेवनाने शरीराचे योग्य पोषण होण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराची वाढ आणि मानसिक विकास यांसाठी महत्त्वाचे ठरतात. अंड्यातील प्रथिने, जीवनसत्त्वे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स हे घटक असतात, जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२, ब ५ व ब २ ही जीवनसत्त्वे असतात. त्याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.
अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असते; परंतु त्यामध्ये विविध आवश्यक पोषक घटकदेखील असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी अंडी चांगली आहेत की वाईट यावर परस्परविरोधी संशोधन सुरू असताना, एका नवीन ग्रीक अभ्यासात असे म्हटले आहे की, आठवड्यातून एक ते तीन अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका निम्म्याहून अधिक कमी होऊ शकतो.
या अभ्यासात वयाच्या १० व्या वर्षापासून अंडी खाणाऱ्या लोकांच्या हृदयावरील परिणामांचे वर्णन केले गेले. त्यात आठवड्यातून चार ते सात अंडी खाणाऱ्यांना हृदयरोग होण्याचा धोका आणखी कमी म्हणजेच ७५ टक्के आढळून आला आहे. अंडी सेवन आणि हृदयाचे आरोग्य यांमधील परस्परसंबंधांवरील अभ्यासातून मिश्र परिणाम समोर आले आहेत. त्या आधारे अंडी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहेत की वाईट यावर वादविवाद सुरू आहे. काही अभ्यास असे सूचित करतात की, अंड्यांचे सेवन मध्यम प्रमाणात करण्याने निरोगी व्यक्तींमध्ये हृदयाची जोखीम पत्करावा लागू शकणारा लक्षणीय परिणाम होऊ शकत नाही; तर काही अभ्यास असे सूचित करतात की, मधुमेह असलेल्या किंवा हृदयरोगाचा इतिहास असलेल्या लोकांमध्ये जास्त अंड्यांचे सेवन हृदयरोगाचा धोका वाढवू शकते.
या विषयावर अनेक अभ्यास आहेत; परंतु निश्चित काहीतरी सांगण्यासाठी आपल्याला भौगोलिक क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन आणि अधिक डेटाची आवश्यकता आहे. “पण अलीकडच्याच एका मेटा-विश्लेषणात असे आढळून आले आहे की, दररोज एका अंड्याचे सेवन केल्याने आशियाई लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका थोडा कमी होतो.”
अंडी प्रथिने, खनिजे, चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे व लोह यांसारखे उच्च दर्जाचे पोषक घटक पुरवण्यासाठीदेखील ओळखले जातात. अंडी हे व्हिटॅमिन बी२, बी१२ व सेलेनियमचे समृद्ध स्रोत आहेत, जे हृदयरोग प्रतिबंधक आहेत. अंड्यातील सेलेनियम हृदयरोगाचा मुख्य घटक असलेल्या ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्यास मदत करतो. काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, अंडी एकूण कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत आणि खरं तर, एचडीएल [कोलेस्ट्रॉल] कणांची प्रवाह क्षमता सुधारू शकतात. “अंडी खाल्ल्याने स्नायूंची वाढ होण्यास मदत होते, वजन व्यवस्थापनात मदत होते आणि मेंदूच्या कार्याला चालना मिळते, यासह इतर फायदेही होतात,” असे डॉ. चंद्रा म्हणतात.
दिवसातून किती अंडी खावीत याचे कोणतेही एकच उत्तर नाही. हृदयरोगाच्या जोखीम घटक असलेल्या लोकांसाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनने दररोज एक संपूर्ण अंडे किंवा दोन अंड्याचा पांढरा भाग मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे डॉ. चंद्रा यांना वाटते की, संयम हा महत्त्वाचा आहे.