Nia Sharma Skincare Tips : अभिनेत्री निया शर्माने पिवळ्या दातांवर सांगितलेल्या घरगुती उपायानंतर, अभिनेत्रीने आता तिच्या स्किनकेअर रूटीनची झलक दाखवली आहे; ज्यामध्ये पौष्टिक भाज्यांचा रस पिणे समाविष्ट आहे. भाज्यांच्या रसामध्ये आवळा, पालक, कडीपत्ता व लिंबू यांचा समावेश आहे. यापूर्वी एकदा तिने यूट्यूबवरील शॉर्ट व्हिडीओमध्ये कॉफी, बेसन, हळद व मध घालून फेस मास्क लावल्याचेही दाखवले होते. तर आवळा, पालक, कडीपत्ता व लिंबू यांच्यापासून बनवलेला हा भाज्यांचा रस तुमच्यासाठी फायदेशीर आहे का? चला, जाणून घेऊयात…
याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर अमरीन शेख यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे निया शर्माने दाखवल्याप्रमाणे भाज्यांचा रस निश्चितच पौष्टिकतेसह बळ देऊ शकतो.
कारण –
- आवळा आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते; जे कोलेजन वाढवते. त्याचबरोबर त्वचेच्या दुरुस्तीलाही मदत होते.
- पालकामध्ये लोह, फोलेट व अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात.
- तर कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढणारी संयुगे असतात.
- त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखले जाऊन, केस आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्यात चांगली वाढ होऊ शकते, असे डॉक्टर अमरीन शेख म्हणतात .
पण, भाज्यांचा रस त्वचेसाठी चांगला असला तरी त्याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येकाच्या त्वचेसाठी तो गुणकारी असेल. आम्लपित्त, मूत्रपिंडाच्या समस्या, मूत्रपिंडात स्टोन होण्याची शक्यता असलेल्या लोकांनी आवळा आणि लिंबूचे सेवन करताना काळजी घ्यावी लागेल.
भाज्यांचा रसाचा कसा फायदा होईल?
कोलेजन वाढवते – व्हिटॅमिन सीमुळे चेहऱ्याचा निस्तेजपणा कमी होतो.
ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतो – आवळा, पालक आणि कडीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती – लिंबू आणि कडीपत्त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे त्वचेची चमक वाढते.
केसांसाठी फायदेशीर – पालकातील लोह व फोलेट आणि कडीपत्त्यातील सूक्ष्म पोषक घटकांमुळे केसगळती कमी करण्यास मदत होते.
किती कालावधीत बदल अपेक्षित ?
त्वचेचे आरोग्य एका रात्रीत बदलत नाही. जर तुम्ही संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमध्ये पालेभाज्यांचा रस समाविष्ट केला, तर सुमारे सहा ते आठ आठवड्यांमध्ये बदल दिसू शकतो. पण, लक्षात ठेवा की, कोणताही एक ज्यूस किंवा कोणतेही चमत्कारिक मिश्रण पोषण, पुरेसे पाणी पिणे (हायड्रेशन), चांगली झोप आणि सूर्य किरणांची जागा घेऊ शकत नाही.