Period delaying pills effects on the body: पुढच्याच आठवड्यात बीचवर वेकेशन एन्जॉय करायचंय? महत्त्वाची पूजासुद्धा पुढच्याच काही दिवसांत येतेय! आणि मासिक पाळीदेखील त्याच दिवसांमध्ये आहे. पण, आता तर यावर एक उपायही आहे. तो म्हणजे मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या.

मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्या महिलांसाठी गेमचेंजर ठरल्या आहेत यात शंका नाही. पण, या गोळ्यांचा परिणाम/दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. या गोळ्यांमुळे त्वचेवर मुरूम येणं तसेच अनेक आजार ओढावू शकतात. म्हणून या गोळ्या खाण्याआधी एकदा हा लेख वाचाच.

Indianexpress.com ने तज्ज्ञांशी संवाद साधून मुरूम आणि मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्यांमधील नेमका संबंध शोधून काढला आहे; चला तर मग जाणून घेऊयात.

हेही वाचा… ‘या’ साखरेच्या वापराने शरीरातील उष्णता होईल कमी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

“मासिक पाळीला विलंब करणाऱ्या गोळ्यांमध्ये नोरेथिस्टेरॉनसारखेच सिंथेटिक होर्मोन्स असतात, ज्यामुळे काही स्त्रियांना मुरुम येऊ शकतात. अशा वेळेस मुरुम येण्याचं कारण म्हणजे सिंथेटिक होर्मोन्स शरीरातील एंड्रोजन (मेल हार्मोन्स)चे प्रमाण वाढवू शकतात, ज्यामुळे सीबम उत्पादनात वाढ होते आणि त्वचेवरील छिद्र बंद होण्याची शक्यता असते; तथापि मुरुम (Acne) येऊ शकतात”, असे डॉ. एम रजनी, सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ, केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद यांनी सांगितले.

यात काही आरोग्य धोके आहेत का? (Period delaying pills effects on the body)

“मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्यांमुळे काही दुष्परिणामांनाही सामोरं जावं लागतं. या गोळ्यांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या (blood clots) होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते,” असे डॉ. मानसी शर्मा, सल्लागार- प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी यांनी सांगितले.

“नॉरथिस्टेरॉनसारख्या मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्या घेतल्याने हार्मोनल पातळीत चढउतार होतो आणि त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. या गोळ्या घेतल्याने मासिक पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखल्याचे आणि रक्तस्त्राव वाढल्याचेही समोर आले आहे. ज्या स्त्रियांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आहेत किंवा स्ट्रोकचा त्रास आहे किंवा ज्या धूम्रपान करतात, त्यांनी तोंडावाटे गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत,” असे डॉ. शरीफा चाऊस, त्वचाविज्ञानी आणि कॉस्मेटोलॉजिस्ट, शरीफा स्किन केअर क्लिनिक यांनी सांगितले.

हेही वाचा… Cancer Risk: उपवास केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर

या गोळ्यांमुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे नैसर्गिक हार्मोनल चक्रात व्यत्यय येतो. तसेच मूड बदलणे, वजन वाढणे किंवा गोळ्या बंद केल्यावर अनियमित मासिक पाळी येणे अशा दुष्परिणामांबाबत डॉ. एम. रजनी यांनी सांगितले. या गोळ्यांमुळे रक्ताच्या गुठळ्यांचा त्रास आधीपासून असलेल्या किंवा धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका किंचित वाढला आहे. कॉमन साईड इफेक्ट्समध्ये स्तनाची कोमलता आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो, याशिवाय दीर्घकालीन वापरामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो.

या गोळ्या सुरू ठेवत असताना मुरुम येणं थांबवू शकतो का?

जर एखाद्याला मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्या वापरणे सुरू ठेवावे लागत असेल, तर त्वचा एक्सफोलिएट आणि क्लीन करण्यासह मॉइश्चरायझरचा नियमित वापर करावा लागेल, असं मॉइश्चरायझर डॉ. शर्मा सुचवतात. छिद्र ब्लॉकेज आणि ब्रेकआउटची शक्यता कमी करण्यासाठी नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने निवडा.

तर पिंपल्स रोखण्यासाठी डॉ. रजनी यांनी दुग्धजन्य पदार्थ टाळण्यास सांगितले. “तुम्ही बेंझॉयल पेरोक्साइड किंवा सॅलिसिलिक ॲसिड असलेल्या क्रिम्स चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांसाठी एक उपचार पद्धत म्हणून वापरू शकता. मुरुम कायम राहिल्यास, डरमॅटोलॉजिस्ट औषधे किंवा हार्मोनल ट्रीटमेट लिहून देऊ शकतात.”

या गोळ्या खाण्यास कोणी टाळाव्यात?

“रक्ताच्या गुठळ्या किंवा थ्रोम्बोफिलिया, यकृत रोग किंवा यकृत इन्फेक्शन, मायग्रेनसारखे हार्मोनल साईड इफेक्ट्स असणाऱ्या महिलांनी या गोळ्या खाण्यास टाळ्याव्यात,” असा इशारा डॉ. एम. रजनी यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच स्तनाचा कर्करोग किंवा इतर कर्करोग आणि धूम्रपान करणाऱ्यांनी, विशेषत: ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी या गोळ्यांचा वापर करणे टाळावे. कारण धूम्रपानामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी दुष्परिणामांचा धोका वाढतो, असंही डॉ. एम. रजनी म्हणाल्या.