Samantha Ruth Prabhu Strict Diet Plan : अनेक अभिनेता आणि अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मुलाखतीदरम्यान अगदी उघडपणे सांगताना दिसतात. या मुलाखतीतील अनेकदा प्रेम, करिअर, आरोग्य, जीवनशैली याबद्दल चर्चा होते. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही सेलिब्रिटी न्यूट्रिशन कोच रायन फर्नांडो यांच्याशी गप्पा मारताना दिसली. त्यादरम्यान तिने ‘मायोसिटिस’ या ऑटोइम्युन आजारावर उपचार घेत असल्याचे सांगितले आहे. मायोसायटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. यामध्ये स्नायूंना सूज येते. स्नायू दुखावल्यामुळे प्रचंड थकवा सुद्धा येतो.

त्यामुळे आता समांथा रुथ प्रभू पूर्वीपेक्षा कठोरपणे तिचे डाएट फॉलो करते. समांथा खवैय्या आहे. जंक फूड म्हणजे तिचे आयुष्य होते. तिला वाटायचे आपण तरुण आहोत आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. त्यातच आधीपासून बारीक असल्यामुळे काहीही खाल्लं तरीही आपले वजन वाढणार नाही असे ती गृहीत धरून चालली होती. पण, नंतर तिच्या लक्षात आले की, जंक फूडने फक्त वजनच वाढलेय, असे नाही; तर त्यामुळे शरीराची सूजही वाढत गेलीय, जी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागलीय. अनेकांना वाटते की, जंक फूडमुळे फक्त वजन वाढते; पण जंक फूड इतर अनेक गोष्टींसाठीही कारणीभूत ठरू शकते, असे ती आवर्जून सांगितले आहे.

आता समंथा शरीराची सूज कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी डाएट करतेय. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “सध्या अशा प्रकारचे डाएट अनेक जण करतात. पण, हा डाएट फॉलो करताना तुमच्या शरीराला कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाहीत ते ओळखून डाएटमधून त्या पूर्णपणे वर्ज्य कराव्या लागतात. तसेच कोणताही ‘चिट डे’ न ठेवता, अगदी काटेकोरपणे त्या डाएटचे पालन करावे लागते. दररोज एकसारखेच अन्न खावे लागते. आहाराबद्दल अनेक जण सहानुभूती दाखवतात; पण ही आपली जीवनशैली आहे हे लक्षात घेऊन ते आवडीने खावे लागते. त्यामुळे काय खायचे हे ठरवायला फारसा विचार करावा लागत नाही. तिचे ‘बायोमार्कर्स’ खूप चांगले आहेत, असे तिने स्पष्ट केले आहे.

तसेच अभिनेत्रींच्या स्वयंपाकघरात ब्रोकोली व ब्रुसेल्स स्प्राउट्ससारख्या भाज्या आणि सेलेरी, अकाई बेरी, हळद, तूप, कोल्ड-प्रेस्ड तेल आदी अनेक पदार्थ आढळून येतील. त्यामध्ये खूप चांगली आरोग्यदायी चरबी असते. काही कारणास्तव पालक आणि केल (Kale) यांचा आहारात समावेश करण्याची तिला परवानगी नाही, असे तिने म्हटले खरे; पण त्याचे कारण सांगितले नाही.

अभिनेत्रीने याआधी असा कोणताही स्ट्रिक्ट डाएट यापूर्वी करून पाहिलेला नाही. पण, आता पूर्वीसारखं तिला जंक फूडचं क्रेव्हिंग होत नाही. गोड खावेसं वाटले, तर ती ग्लुटेन-फ्री आणि साखरमुक्त पदार्थ खाणे पसंत करते आणि भरपूर पाणीसुद्धा पिते. त्याचप्रमाणे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करून त्याची ताकद वाढवते आणि आपल्या शरीराचे एकूणच आरोग्य नीट समजून घेते.

तिने असेही सांगितले की, तिला सेंद्रिय अन्न खरेदी करण्याची विशेष आवड आहे (सेंद्रिय अन्न म्हणजे जे नैसर्गिक आणि रसायनमुक्त असते).
दर आठवड्याला ती संपूर्ण यादी तयार करते. तिच्याकडे शेफ नाहीत; पण तिच्याकडे एक सहायक आहे, जो तिला जेवण बनवून देतो. तिच्या पहिल्या चित्रपटापासून तो तिच्याबरोबरच आहे. त्याला कॉफी कशी बनवायची हेदेखील माहीत नव्हते आणि आता तो कमी वेळात जेवणही बनवू शकतो, असे तिने सांगितले आहे.

पालक आणि केल सगळ्यांसाठी योग्य का नाही?

पालक आणि केल सगळ्यांसाठी योग्य का नाहीत याबद्दलची माहिती घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, इतर भाज्यांच्या तुलनेत पालक आणि केलमध्ये ऑक्झॅलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. या ॲसिडमुळे पचनसंस्थेला नॉन-हेम आयर्न (Non-heme iron) शरीरात शोषून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात.

पालक आणि केलमध्ये लक्षणीय प्रमाणात ऑक्झॅलिक ॲसिड असते, त्यातील हे नैसर्गिक रसायन शरीरातील कॅल्शियमसोबत अशी संयुगे तयार करते की, जी शरीराला शक्यतो पचवता येत नाहीत. त्यामुळे शरीरात खनिजांचे शोषण कमी होते. संवेदनशील व्यक्तींकडून ऑक्झलेटचे जास्त प्रमाणात केले गेलेले सेवन हे मूत्रपिंडात खडे तयार होण्याचे कारण ठरू शकते, विशेषतः जेव्हा मूत्रात ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याव्यतिरिक्त या दोन्ही हिरव्या भाज्यांमध्ये ऑक्झलेट्स आणि फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या भाज्या कच्च्या स्वरूपात खाल्ल्याने काही व्यक्तींच्या बाबतीत पोटफुगी, गॅस, आम्लता यांसारख्या पचनाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. त्याउलट तुम्ही या भाज्या उकळून, वाफवून किंवा गरम पाण्यात शिजवून खाल्ल्या, तर त्यातील ऑक्झॅलेटची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते; ज्यामुळे पोषक घटकांची उपलब्धता वाढते आणि पचनालाही त्रास होत नाही. म्हणून असहिष्णुता किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी पोषक घटक मिळवण्यासाठी आणि ऑक्झॅलेट्सशी संबंधित संभाव्य धोके कमी करण्यासाठी पालक आणि केल हलक्या प्रमाणात शिजवणे वैज्ञानिकदृष्ट्या उचित ठरेल, असे कनिक्का मल्होत्रा यांनी सांगितले आहे.