Sexual Health : बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कामाचा ताण अशा अनेक कारणांमुळे हल्ली अनेक महिला आणि मुलींना पीसीओडी व पीसीओएसचा सामना करावा लागतोय, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याही परिणाम होतोय. PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. हे हार्मोनसंबंधित आजार आहेत, जे हार्मोन्स बिघडल्यामुळे होतात. त्यामुळे एकूण शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यात हे आजार प्रजनन क्षमता आणि चयापचयाशी संबंधित असल्याने त्यांचा विशेषत: लैंगिक संबंध आणि शारीरिक जवळीकतेवर मोठा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत महिलांना नेमका काय त्रास होतो आणि त्यावर काय उपाय आहेत? याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

पीसीओएसमुळे महिला आणि तरुणींच्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये त्यांच्या लैंगिक आरोग्य आणि शारीरिक जवळीकता यांचा समावेश आहे. हार्मोन्स असंतुलनामुळे शरीरात अनेक बदल जाणवू शकतात. या बदलांचा परिणाम महिलेच्या आत्मसन्मान, कामवासना व भावनिक गोष्टींवरही होतो.

पीसीओएस किंवा पीसीओडीमुळे शरीरात नेमके कोणते बदल होतात, ते समजून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या बदलांचा नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर होणारा परिणाम व्यवस्थापित करणेही तितकेच महत्वाचे आहे.

पीसीओडीमुळे लैंगिक आरोग्यावर कोणता परिणाम होतो?

पीसीओडीमुळे सामान्य हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी, हाय अ‍ॅन्ड्रोजन (पुरुष संप्रेरक) आणि डिम्ब ग्रंथी सिस्ट विकसित होणे यांसारखी लक्षणे उद्भवतात.

त्यावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या संचालिका डॉ. चेतना जैन यांनी अधोरेखित केले की, पीसीओडी किंवा पीसीओएसचा लैंगिक आरोग्यावर होणारा सर्वांत महत्त्वाचा परिणाम म्हणजे एंड्रोजनची पातळी वाढणे, ज्यामुळे मुरमे, चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागात अचानक केसांची वाढ (हर्सुटिझम) आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या शारीरिक लक्षणांमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. वजन वाढल्याने शरीर बेढब होते, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि मग त्यातून अस्वस्थता वाढते.

हार्मोनल असंतुलन आणि लैंगिक संबंध

पीसीओएस किंवा पीसीओडीमुळे हार्मोनल स्थिती बिघडते, तसेच अनेकदा इन्सुलिन रेझिस्टन्स होते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी कमी होऊन, मूड खराब होतो आणि लैंगिक संबंधाची इच्छा होत नाही. त्यातून खूप दिवस थकवा, चिंता व नैराश्य येते. पीसीओएसवर औषधोपचारांदरम्यान अनेकदा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते, ज्यामुळे तणाव वाढू शकतो,. हाय एंड्रोजन पातळीमुळेही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात, असे डॉ. जैन सांगतात.

PCOD मुळे महिलांच्या लैगिंक आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम; काय काळजी घ्यावी? डॉक्टरांनी सांगितले उपाय

शारीरिक लक्षणे आणि इतर समस्या

वजन वाढणे आणि रूपात होणारे बदल यांसारखी सामान्य लक्षणे पीसीओएस आजारादरम्यान दिसू लागतात. त्याचा महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच योनीत कोरडेपणा निर्माण होणे ही पीसीओशी संबंधित आणखी एक समस्या आहे. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना अस्वस्थ किंवा वेदना जाणवू शकतात. अशा परिस्थितीत अनेकदा लैंगिक संबंध टाळले जातात, ज्यामुळे नातेसंबंधात ताण निर्माण होऊ शकतो.

भावनिक ताणतणाव

पीसीओएसमुळे अनेक महिला व तरुणींना भावनिक ताणतणावांचा सामना करावा लागतो. या दीर्घकालीन आजारावर उपचार सुरू असताना चिंता आणि नैराश्य जाणवू शकते. डॉ. जैन स्पष्ट करतात की, पीसीओएसमुळे वंध्यत्व येऊ शकते, या भीतीमुळे भावनिक ताण वाढतो, जो लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि संतुष्टतेवर परिणाम करू शकतो. पीसीओएसशी संबंधित लैंगिक समस्यांना तोंड देण्यासाठी त्या स्त्रीला वैद्यकीय उपचार, जीवनशैलीत बदल व भावनिक आधार या गोष्टींची फार गरज असते, असे डॉ. जैन म्हणाले.

वैद्यकीय उपचार आणि हार्मोन्स व्यवस्थापन

हार्मोनल असंतुलन व्यवस्थापित करण्यासाठी योग्य अशा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्भनिरोधक गोळ्या किंवा अँटी-अँड्रोजन औषधे यांसारख्या उपचारांमुळे हार्मोन्सची पातळी नियंत्रित होण्यास, मुरमे व जास्त केसांची वाढ कमी होण्यास आणि कधी कधी कामवासना सुधारण्यास मदत होऊ शकते. मेटफॉर्मिनसारखी इन्सुलिन-रेझिस्टन्ससंबंधित औषधांमुळे चयापचयाचे आरोग्य सुधारते.

जीवनशैलीत बदल

नियमित व्यायाम आणि संतुलित पोषण यांसह निरोगी जीवनशैलीमुळे पीसीओएस आजारावर उपचार करणे सहज सोपे होऊ शकते. या गोष्टींमुळे वजन नियंत्रणात ठेवता येते; तसेच हार्मोन्स नियंत्रित करण्यास आणि इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढू शकते आणि पुन्हा आत्मसन्मान वाढू शकतो. व्यायाम, योगा किंवा चालणं अशा शारीरिक हालचालींमुळे चिंता, ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. अशाने आरामदायी वाटून, आत्मविश्वास वाढतो, असे डॉ. जैन म्हणाले.

CBT थेरपी

सीबीटीसारख्या थेरपीमुळे पीसीओएससंबंधित भावनिक ताणतणाव, चिंता, अस्वस्थता दूर होऊ शकते. डॉ. जैन सल्ला देतात की, पीसीओएस समस्येशी सामना केलेल्या लोकांच्या मार्गदर्शनाचाही फायदा होऊ शकतो. कारण- त्या महिला कशा प्रकारे यातून बाहेर पडल्या हे त्या सध्या पीसीओएसचा सामना करणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे सांगू शकतात. त्या त्यांचा त्रास समजून घेत, त्यांच्यासाठी एक आरामदायी वातावरण तयार करू शकतात.

योनीमार्गाचे आरोग्य आणि आराम

पीसीओएसचा सामना करताना योनीमार्गात कोरडेपणा जाणवत असल्यास ल्युब्रिकंट्स वापरणे किंवा आहारात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. तसेच वेळोवेळी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांदरम्यान जाणवणारी अस्वस्थता कमी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोडीदाराशी मोकळा संवाद

डॉ. जैन यांनी सांगितले की, जोडीदाराशी मोकळा संवाद आवश्यक आहे. पीसीओएसमुळे लैंगिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केल्याने दोघांमधील गैरसमज दूर होऊ शकतात. मग दोघे त्याबाबत एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा जवळीकता निर्माण होऊ शकते. यावेळी समुपदेशनदेखील उपयुक्त ठरू शकते.