Mira Kapoor on Shahid Kapoor Bad Habit: मीरा आणि शाहिद कपूर हे बॉलीवूडचं खूप लोकप्रिय कपल आहे. शाहिद आणि मीरा यांचं २०१५ मध्ये लग्न झालं आणि त्यांना दोन मुलं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, शाहिदने मीराशी लग्न केल्यावर त्याने त्याची एक अत्यंत वाईट सवय सोडली?
‘कॉफी विथ करण’ सीझन ५ मध्ये करण जोहरने जेव्हा मीराला याबद्दल विचारले, तेव्हा मीरा म्हणाली, “त्याच्या म्हणण्यानुसार त्याने खूप काही गोष्टी माझ्यासाठी सोडल्या आहेत. पण मला असं वाटतं की, त्याने माझ्यासाठी धूम्रपान सोडलं.” यावर करण म्हणाला, “हे चांगलं आहे, तसंही ते आरोग्यासाठी घातक असतं.”
धूम्रपान सोडल्यासारखे सकारात्मक बदल नात्यांवर कसे परिणाम करतात?
डॉ. संतोष बंगर, (सीनियर सायकॅट्रिस्ट, ग्लेनिगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई) यांनी सांगितले की, “जेव्हा एखादा जोडीदार रिलेशनशिप किंवा लग्नानंतर धूम्रपान, दारू पिणं किंवा रागावण्याच्या सवयी सोडतो, तेव्हा तो त्याची नात्याबद्दलची समर्पण भावना, प्रामाणिकपणा आणि नव्याने सुरुवात करण्याची तयारी दाखवतो. तो हे दाखवतो की तो जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला महत्त्व देतो, त्याचा आदर करतो आणि तो बदलायला तयार आहे,” असं डॉ. बंगर म्हणाले.
“अशा बदलांसाठी असं वातावरण असावं लागतं, जिथे कोणी दोष देत नाही, फक्त प्रोत्साहन दिलं जातं. दबाव न देता, समजून घेतलं जातं. जेव्हा असे बदल होतात, तेव्हा विश्वास आणि भावनिक नातं मजबूत होतं आणि नातं अजून चांगलं होतं. हे मॅच्युरिटीचं आणि एकमेकांबद्दल आदराचं लक्षण असतं. जोडीदार एक आरोग्यदायी, स्थिर आयुष्य एकत्र घडवू इच्छितो आणि उज्ज्वल भविष्य पाहतो हे यावरून समजतं,” असं डॉ. बंगर यांनी सांगितलं.
मात्र, डॉ. बंगर यांनी सांगितलं की, “हा बदल फक्त दुसऱ्याला खूश करण्यासाठी नसून, स्वतःच्या मनापासून व्हायला हवा. जेव्हा हा बदल आपल्या इच्छेने केला जातो, तेव्हा तो टिकून राहतो, अर्थपूर्ण असतो आणि दोघांनाही आनंद देतो. फक्त जोडीदाराला इंप्रेस करण्यासाठी किंवा तो/ती आपल्याला सोडून जाईल या भीतीने सवय सोडू नये. जबाबदारीने विचार करा आणि आरोग्य लक्षात घेऊन निर्णय घ्या. शेवटी परिपूर्ण होणं महत्त्वाचं नाही, तर नातं चांगलं ठेवण्यासाठी स्वतःला चांगलं बनवत जाणं महत्त्वाचं आहे,” असं डॉ. बंगर म्हणाले.