मॅगी, सँडविच, पास्ता, डोसा आणि बऱ्याच काही पदार्थांची चव वाढविण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी ‘चीज’ आवर्जून घातले जाते. किराणाच्या दुकानात जाऊन आपण चीज क्यूब किंवा स्लाइस सांगितलं की, दुकानदारही त्याच्या दुकानातील फ्रिजमधून चीजचा मोठा बॉक्स काढून देतो.पण, तुम्हाला माहीत आहे का? चीज आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण- यात फॅट्स, सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारणपणे आठवड्यातून फक्त एकदाच चीज खाणे सुरक्षित मानले जाते.

पण, डिजिटल क्रिएटर डॉक्टर एरिक बर्ग म्हणतात की, दररोज चीजच्या सेवनाचेही महत्त्वपूर्ण फायदे आहेत. विशेषत: जी व्यक्ती त्यांच्या दैनंदिन आहारात प्रथिनसमृद्ध व आतडे निरोगी राहण्यासाठी पदार्थांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे उत्तम ठरेल. दररोज चीजचे का सेवन करावे आणि डॉक्टरसुद्धा दररोज चीजचे का सेवन करतात याबद्दलची माहिती डॉक्टरांनी इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे दिली आहे.

प्रक्रिया केलेले चीज न खाता, शेळी आणि मेंढीच्या चीजच्या (goat and sheep cheese) सेवनाबद्दल ते सांगताना दिसत आहेत. डॉक्टर म्हणतात की, बकरी आणि मेंढी यांच्या दुधापासून तयार केले जाणारे चीज हे सर्वोत्कृष्ट चीज आहे. मेंढी आणि शेळीच्या चीजमध्ये A2 केसीन असते. या प्रथिनांमुळे तुमच्या पचनसंस्थेत कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जगातील काही वृद्ध लोक मेंढ्या आणि बकरीचे चीज खातात. सर्वसाधारणपणे गाईच्या दुधात सुमारे ३.८ ते ४ टक्के लॅक्टोज असतात; तर मॉझरेला चीज किंवा कॉटेज चीजमध्ये ४% लॅक्टोज असतात. पण, शेळी किंवा मेंढीच्या चीजमध्ये ०.५ टक्का लॅक्टोज असतात.

हेही वाचा…अपुऱ्या मिठाच्या सेवनाचा तुमच्या झोपेवर होतो थेट परिणाम? रोज आहारात किती मीठ असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेसने’ DHEE सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ शुभा रमेश एल. यांच्याशी संवाद साधला. शेळीचे चीज आणि मेंढीचे चीज हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत; जे गाईच्या दुधापासून किंवा इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या मांसाच्या प्रथिनांशी तुलना करतात. हे चीज सामान्यत: संपूर्ण प्रोटीन प्रोफाइल म्हणून ओळखले जाते; ज्यामध्ये शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व ॲमिनो ॲसिडचा समावेश असतो. त्याव्यतिरिक्त हे चीज शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते; ज्यामुळे तो स्नायूंच्या दुरुस्ती आणि मजबुतीसाठी दैनंदिन आहाराचा एक फायदेशीर घटक ठरतो. पण, त्यांनी हेदेखील सांगितले की, शेळी आणि मेंढीच्या चीजचा संतुलित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. पण, त्यांच्यातील चरबी आणि सोडियमचे प्रमाण लक्षात घेऊन, ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे

चीज खाण्याचे फायदे –

शुभा रमेश एल. यांच्या मते, शेळी आणि मेंढीच्या चीजव्यतिरिक्त अनेक चीज प्रकारांमध्ये विशेषत: आंबलेल्या पदार्थांमध्ये जिवंत प्रो-बायोटिक्स असतात; जे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकतात. प्रोबायोटिक सूक्ष्म जीवाणू हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्म जीवाणू आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्म जीवाणूंचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. हे उपयुक्त जीवाणू पचनास मदत, आतड्यांचे आरोग्य सुधारणे व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यांसाठी उपयुक्त ठरतात. दररोज कमी प्रमाणात चीजचे सेवन केल्याने आतड्यांतील सूक्ष्म पोषक घटकांची पातळी संतुलित राहू शकते. मात्र, त्यात चीज प्रो-बायोटिक्सचा स्रोत असणे आवश्यक आहे.

शेळी-मेंढीचे चीज हाडांसाठी फायदेशीर –

शेळी आणि मेंढीच्या चीजमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे A व B2 (रिबोफ्लेविन) भरपूर असतात. गाईच्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या चीजच्या तुलनेत शेळी आणि मेंढीच्या चीजमध्ये हे घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ते हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या चीजमध्ये गाईच्या चीजपेक्षा फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते; जे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास योगदान देऊ शकते.

रोज चीजच्या सेवनाचे काही तोटे –

चीजमध्ये कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट्समध्ये असतात; जे जास्त प्रमाणात सेवन न केल्यास वजन वाढण्यास आणि हृदयविकाराचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

चीजमध्ये सामान्यत: सोडियमचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या उदभवू शकतात.

दुधामधील पोषक घटक (दुग्धशर्करा) कमी असूनही शेळी आणि मेंढी यांच्या चीजचे दररोज सेवन केल्याने पुरळ येण्यासारख्या समस्या उदभवू शकतात.