थंड हवामान छान, आल्हाददायक वाटू शकते, मात्र या ऋतूमध्ये आजारांचा धोकाही सर्वात जास्त वाढतो. थंड वारे, शरीराचे तापमान कमी होणे, वाढते प्रदूषण, कमी सूर्यप्रकाश आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे बऱ्याचदा आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. अशा परिस्थितीत आरोग्य राखण्यासाठी या ऋतूमध्ये पौष्टिक आणि निरोगी आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. या ऋतूमध्ये काही भाज्यांचा रस आजारांवर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. थंड हवामानात लोक सर्दी आणि खोकल्याच्या भीतीने अनेकदा रस पित नाहीत, मात्र जर तुम्हाला थंड हवामानात तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही गाजराचा रस पिऊ शकता. गाजराचा रस त्वचेपासून डोळ्यांपर्यंत आणि हृदय ते किडनीपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे.

फिसिको डाएट अँड अॅस्थेटिक क्लिनिकमधील आहारतज्ज्ञ डॉ. विधी चावला यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हिवाळ्यात गाजराचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजराचा रस डोळे, त्वचा, हृदय आणि लिव्हर निरोगी ठेवतो. त्यातील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला विषमुक्त करतात. हिवाळ्याच्या उन्हात निरोगी पेय म्हणून गाजराचा रस हा उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात मिळणारे लाल गाजर तुमच्या सॅलड प्लेटमध्ये फक्त उठून दिसत नाही, तर आरोग्यासाठीदेखील उत्तम आहे.

गाजरांमध्ये कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, पॉलीएसिटिलीन्स, जीवनसत्त्वे आण खनिजे असतात, जे शरीराला असंख्य फायदे देतात त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी संयुगे शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हिवाळ्यात गाजराचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

त्वचा निरोगी होते

गाजरातील बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते, जे त्वचेच्या पेशी सुधारते, सुरकुत्या कमी करते आणि नैसर्गिक कोलेजन उत्पादन वाढवते. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि रंगद्रव्य कमी होते. गाजराचा रस मोठ्या प्रमाणात प्यायल्याने नैसर्गिकरित्या त्वचा उजळण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत

गाजरातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या स्नायूंवरील दाब कमी करतात आणि रक्तवाहिन्यांना आराम देतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गाजराचा रस सिस्टोलिक रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. असं असतानाही किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच गाजराचे सेवन करावे.

दृष्टीस उपायकारक

गाजरांमध्ये जीवनसत्त्वे ए, के, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, कॅरोटीनॉइड्स जे डोळ्यांना तेजस्वी सूर्यप्रकाश आणि हानिकारक प्रकाशापासून वाचवतात. दररोज या रसाचे सेवन केल्याने तुमचा चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होऊ शकते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद मिळते. हिवाळ्यात आजार टाळण्यास हा रस मदत करतो.

लिव्हर विषमुक्त आणि पचनास गुणकारी

गाजरातील कॅरोटीनॉइड्स मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून लिव्हरच्या पेशींचे नुकसान होणय्पासून संरक्षण करतात आणि पित्त प्रवाहाला चालना देतात. त्यामुळे चरबीचे विघटन आणि विषारी पदार्थ काढून टाकणे सुधारते. त्यांच्यातील फायबर पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

हृदयासाठी फायदेशीर

गाजरातील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. बीटा-कॅरोटीन हृदयाच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते आणि जळजळ कमी करते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.