Drinking Warm Water Benefits: निरोगी आयुष्य जगण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय जीवन नाही असे म्हटले जाते. पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणे आरोग्यदायी ठरते. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांपासून लांब राहू शकतो, त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पण, गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी आणखी चांगले आहे. रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. नीतिका कोहली यांनी गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

डॉ. नीतिका कोहली सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून पुरेसे पाणी पिणे हे अत्यंत आवश्यक आहे हे सांगायला नको. शरीराचे चयापचय आणि आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सुमारे आठ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी स्वतःच तुम्हाला निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते, परंतु गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरासाठी फायदे आणखी वाढतात! तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने तुमच्या एकूण आरोग्यासाठी अविश्वसनीय फायदे होऊ शकतात.” चला तर जाणून घेऊया, गरम पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत.

१. बद्धकोष्ठतेत आराम

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, अशा लोकांनी गरम पाण्याचे सेवन केले तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.

२. चोंदलेल्या नाकापासून सुटका

गरम पाणी पिताना त्यातून जी वाफ मिळते, त्यामुळे चोंदलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते.

३. केसांचे आरोग्य सुधारते

गरम पाणी केसांची मुळं सक्रिय करते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि ते अधिक मजबूत होतात.

४. मासिक पाळीच्या वेदना कमी होतात

तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या मासिक पाळीच्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. गरम पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

५. त्वचा निरोगी आणि चमकदार

गरम पाणी प्यायल्याने त्वचा शरीराच्या आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.

६. पचन सुधारते

गरम पाण्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या कमी होते.

७. शरीराला विषमुक्त करते

सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते.