किवी हे सर्वांत जास्त चर्चेत असलेल्या फळांपैकी एक आहे. किवी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही चार आठवडे दररोज झोपण्यापूर्वी दोन किवी खाल्ले, तर काय होईल २०२३ मध्ये आयर्लंडमधील अटलांटिक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डोनेगल येथे केलेल्या एका अभ्यासात १५ एलिट अॅथलीट्स [ज्यांचे वय २६ वर्ष आहे असे धावपटू आणि खलाशी (sailors)] सहभागी झाले होते, ज्यांनी चार आठवडे झोपण्यापूर्वी एक तास आधी दोन हिरवे किवी खायला दिले. रात्री झोपण्यापूर्वी किवी खाण्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले.

सुरुवातीला झोपी गेल्यानंतर जागे होण्याच्या वेळेत ४७ टक्के घट झाली.
रात्री जागरणाचे प्रमाण २७ टक्के कमी झाले.
एकूण झोपेची वेळ तासाभराने वाढली
सकाळच्या वेळी सतर्कता वाढते आणि कमी थकवा जाणवतो
झोपेच्या कार्यक्षमतेत ८६ टक्क्यांवरून ९३ टक्क्यांपर्यंत सुधारणा.

किवीमुळे झोप का सुधारते (Why kiwi might improve sleep)

पोषण तज्ज्ञ गरिमा गोयल यांनी किवीला ‘Miracle Sleep Fruit’ म्हटले आहे. कारण- त्यात झोपेच्या नियमनात भूमिका बजावणारे अनेक पोषक घटक आहेत :

उच्च सेरोटोनिन घटक (High serotonin content)

किवी हे सेरोटोनिन समृद्ध असलेल्या काही फळांपैकी एक आहे. सेरोटोनिन जे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे, जे मूड, विश्रांती व झोपेच्या चक्रांचे नियमन करते. “सेरोटोनिन हे मेलाटोनिनचे पूर्वसूचकदेखील आहे, जे झोपेसाठी जबाबदार संप्रेरक(हॉर्मोन्स) आहे. कमी सेरोटोनिनची पातळी निद्रानाश, झोप लागत नाही व झोपेची गुणवत्ता खराब होते,” असे गोयल यांनी सांगितले

किवी नैसर्गिकरीत्या सेरोटोनिनची पातळी वाढवून शरीराच्या अंतर्गत चक्राचे नियमन करण्यास मदत करू शकते.

अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant properties))

किवीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. विशेषतः व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉल असते, जे ऑक्सिडेटिव्ह ताण व दाहकता यांचा सामना करण्यास मदत करतात. “अभ्यासातून असे दिसून आले आहे, “ऑक्सिडेटिव्ह ताण झोपेच्या पद्धतींवर नकारात्मक परिणाम करू शकतो, ज्यामुळे झोप कमी होते आणि निद्रानाश होतो. किवीमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट्स घटकांमुळे एकूण झोपेची गुणवत्ता चांगली होऊ शकते,” असे गोयल सांगतात.

फोलेट आणि झोपेचे नियमन (Folate and sleep regulation)

किवी हा फोलेटचा एक चांगला स्रोत आहे. फोलेट हे बी व्हिटॅमिन आहे, जे मेंदूच्या कार्यात आणि न्यूरोट्रान्समीटर कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. “फोलेटच्या कमतरतेमुळे निद्रानाश, रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम (Restless Leg Syndrome) व झोप टिकवून ठेवण्यास अडचण होते. किवीसारखे फोलेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने झोपेचा त्रास टाळता येतो,” असे गोयल यांनी सांगितले.

किवी हे पौष्टिक, कमी कॅलरीज असलेले फळ आहे, ज्यामध्ये झोप वाढवण्याचे गुणधर्म आहेत.

पण झोपेच्या समस्यांसाठी हा एक स्वतंत्र उपाय मानला जाऊ नये. जर तुम्हाला झोपेची समस्येचा त्रास जाणवत असेल, तर तुमच्या संध्याकाळच्या दिनचर्येत किवीचा समावेश करून पाहणे फायदेशीर ठरू शकते, असे गोयल सुचवतात.

परंतु, चांगल्या झोपेसाठी आणखी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, जसे की :

झोपेचे वेळापत्रक पाळण्यात सातत्य राहील असे पाहा.
झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा.
रात्री कॅफिन आणि जड जेवण टाळा.
झोपण्याच्या वेळी आरामदायी दिनचर्या तयार करा.

ज्यांना झोपेचा त्रास होतो, त्यांनी त्यांच्या आहारात किवीचा समावेश केल्यास तो संतुलित होऊन, सुरक्षित आणि पौष्टिक ठरू शकतो.परंतु, दीर्घकालीन निद्रानाश किंवा झोपेचे विकार असलेल्या व्यक्तींनी योग्य त्या उपचारासाठी त्यांच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा.