Is it OK to turn off Wi-Fi router when not In Use : केस कधी धुवायचे, नखे कोणत्या दिवशी कापायची, अगदी नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाताना काय करावे, याबद्दल सोशल मीडियावर रील्स आणि फोटोद्वारे अनेक माहिती शेअर होताना दिसतात. तसेच आपण माहिती वाचल्यावर लगेचच त्यावर विश्वास ठेवतो आणि इतरांना शेअर करून मोकळे होतो. या सगळ्या विषयांमध्ये रात्री झोपताना वाय-फाय राउटर बंद करून झोपावे याबद्दलही तुम्ही नक्कीच वाचले असणार. पण, यामागे काही विज्ञान आहे का? तर याचबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आणि वाय-फाय राउटर बंद केल्यावर शरीरात काय बदल होतो हे जाणून घेतले.
हैदराबादमधील लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर हिरन एस. रेड्डी म्हणाले की, एका आठवड्यासाठी रात्री वायफाय राउटर बंद केल्याने व्यक्तींमध्ये शारीरिक बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.
वायफाय उपकरणे लो लेव्हल (low-level), नॉन-आयोनायझिंग रेडिएशन उत्सर्जित करतात, जे वैज्ञानिक एकमतानुसार दररोजच्या संपर्कासाठी सुरक्षित आहेत. पण, ज्या लोकांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स (EMFs) बद्दल संवेदनशीलता असल्याचे आढळले आहे त्यांच्यासाठी, हा बदल डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा मानसिक थकवा यासारख्या लक्षणांपासून आराम देऊ शकतो. असे असले तरीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक अतिसंवेदनशीलतेचे समर्थन करणारे क्लिनिकल पुरावे अनिर्णित आहेत, असे डॉक्टर हिरन एस. रेड्डी म्हणाले आहेत.
हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार म्हणाले की, याबद्दलचे बहुतेक अभ्यास प्राण्यांवर करण्यात आले आहेत आहेत. त्यामुळे वाय-फाय राउटर पाइनल ग्रंथीमधून मेलाटोनिन उत्पादनात व्यत्यय आणतात किंवा माणसांना झोपण्यात व्यत्यय आणतात याचा कोणताही पुरावा नाही. डॉक्टर सुधीर कुमार यांच्या मते, वाय-फाय राउटर 2.4 GHz किंवा 5 GHz फ्रिक्वेन्सी बँडमध्ये नॉन-आयोनायझिंग रेडिएशन उत्सर्जित करतात; जे खूप कमी-ऊर्जेचे ईएमएफ आहेत आणि जे मोबाईल फोन डोक्याजवळ धरल्यावर उत्सर्जित होणाऱ्या किरणांपेक्षा खूपच कमी आहेत.
घरामध्ये १ ते २ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर असताना, या EMFs ची तीव्रता झपाट्याने कमी होते. त्यामुळे, एक सामान्य वायफाय राउटर मेलाटोनिन या झोपेस मदत करणाऱ्या संप्रेरकाच्या निर्मितीवर परिणाम करतो किंवा पीनियल ग्रंथीचं (pineal gland) काम बिघडवतो, ही शक्यता खूपच कमी आहे. दुसरीकडे, ब्लू लाईट पाइनल ग्रंथीच्या कार्यात व्यत्यय आणून झोपेच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर प्रतिकूल परिणाम करतो ; असे डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.
याव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी डिजिटल एंगेजमेंट कमी केल्याने मेलाटोनिनचे उत्पादन चांगले होऊ शकते, जे झोपण्याच्या आणि उठण्याच्या चक्राचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहेत. तसेच रात्री वायफाय बंद करण्याचा झोपेच्या गुणवत्तेवर अप्रत्यक्षपणे फायदे होतो. म्हणजेच वायफायचा वापर दीर्घकाळ स्क्रीन एक्सपोजरशी संबंधित असतो. त्यामुळे वायफाय बंद केल्याने रात्रीचा स्क्रीन वापर मर्यादित होऊ शकतो, शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते. तसेच संज्ञानात्मक कार्य, रोगप्रतिकारक प्रतिसाद आणि एकूण आरोग्यामध्ये दर्जेदार झोपची भूमिका बजावते ; असे डॉक्टर रेड्डी म्हणाले आहेत.
सलग सात दिवस वाय-फाय बंद केल्याने थेट जैविक परिणाम होत नसले तरी, चांगल्या झोपला समर्थन देऊ शकतात – जे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी महत्वपूर्ण योगदान देतात.