Which side to Sleep Left or Right: आरामदायी पोजिशन आपल्या झोपेवर परिणाम करते. म्हणूनच जेव्हा आम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की, उजव्या बाजूने झोपणे हृदयासाठी वाईट आहे का, तेव्हा आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला. KIMS हॉस्पिटल, ठाणे येथील हृदयविज्ञान विभागाचे संचालक व विभागप्रमुख डॉ. बी. सी. कालमाथ यांच्या मते, झोपेची पोजिशन फरक करू शकते, विशेषत: जर तुम्हाला आधीच हृदयाची समस्या असेल.

“सर्वसामान्य आरोग्यदृष्ट्या निरोगी लोकांनी उजव्या बाजूने झोपण्यात काहीही हानिकारक नाही. पण जर तुम्हाला कधी कधी श्वास घेण्यास त्रास होत असेल, हृदय धडधडत असेल किंवा इतर हृदयाचे त्रास असतील, तर तुमची झोपण्याची बाजू तुमच्या आरामावर परिणाम करू शकते,” असे डॉ. कालमाथ म्हणाले.

जर तुम्ही उजव्या बाजूने झोपलात, तर काय होते?

जेव्हा तुम्ही उजव्या बाजूने झोपता, तेव्हा तुमचे हृदय छातीमध्ये थोडे वर राहते, त्यामुळे हृदयावर दाब कमी वाटतो आणि श्वास घेणे सोपे होते. “म्हणूनच अनेक जण ज्यांना हृदयाशी संबंधित त्रास असतो, त्यांना उजव्या बाजूने झोपल्यावर अधिक आरामदायी वाटते,” असे डॉ. कालमाथ म्हणाले.

याचे काही तोटे आहेत का?

अधिकांश लोकांसाठी याचे काही तोटे नाहीत. “सर्वसामान्य निरोगी लोकांसाठी डाव्या किंवा उजव्या बाजूने झोपणे सुरक्षित आहे. बहुतांशी लोकांनी उजव्या बाजूने झोपणे हृदयासाठी हानिकारक नाही. खरं तर, हृदयविकार असलेल्या लोकांसाठी उजव्या बाजूने झोपणे अधिक आरामदायी आणि शरीरासाठी चांगले असू शकते,” असे डॉ. सुधीर कुमार (अपोलो हॉस्पिटल्स, हैदराबाद) यांनी सांगितले.

डाव्या बाजूने झोपल्यावर हृदय छातीच्या भिंतीजवळ येते आणि त्यामुळे धडधड जास्त जाणवू शकते. हे घातक नाही; पण काही लोकांना त्यामुळे चिंता किंवा बेचैनी वाटू शकते, असे डॉ. कालमाथ यांनी सांगितले.

मग कोणती बाजू चांगली?

ज्या बाजूने तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागते तीच बाजू सर्वोत्तम आहे. “जर उजव्या बाजूने झोपल्यावर आराम वाटत असेल आणि सकाळी उठताना जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत नसेल, तर तसेच झोपा. तसेच झोपताना जर डाव्या बाजूने तुमच्या शरीराला जास्त आरामदायी वाटत असेल, तर तेही योग्य आहे. खरा उद्देश म्हणजे गाढ आणि आरामदायी झोप घेणे. कारण- त्यानेच हृदय निरोगी राहते,” असे डॉ. कालमाथ म्हणाले.

जर तुम्हाला हृदयाचा त्रास किंवा झोपेची समस्या असेल, तर काय?

दोन्ही बाजूंनी झोपून बघा, ज्या बाजूने छाती हलकी वाटते आणि आराम मिळतो ती बाजू निवडा. जास्त आरामासाठी उशी वापरू शकता.

उजव्या बाजूने झोपणे हृदयासाठी वाईट नाही. ज्या स्थितीत तुम्हाला नैसर्गिक आणि शांत झोप लागते तीच स्थिती झोपेसाठी निवडा. चांगली झोप घेणे हे कोणत्या बाजूने झोपतो यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण- त्यामुळे हृदय, मन आणि शरीर निरोगी राहते.