काही लोकांना बराच वेळ झोपले किंवा बसल्यानंतर उभे राहिले तर चक्कर येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, “ही हलकी डोकेदुखी किंवा अंधुक दृष्टी जाणवणे हे रक्तदाब कमी होण्याचे लक्षण आहे, ज्याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन (orthostatic hypotension) किंवा पोश्चरल हायपोटेन्शन (postural hypotension) देखील म्हणतात. “गुरुत्वाकर्षणामुळे पायांमध्ये रक्त साचते. जेव्हा एखादी व्यक्ती उभी राहते, तेव्हा ते हृदयाकडे परतणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी करते; म्हणून रक्तप्रवाहात अचानक घट झाल्यामुळे रक्तदाब क्षणार्धात कमी होऊ शकतो, ही स्थिती ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणून ओळखली जाते,” असे मुंबईच्या परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले.
जेव्हा तुमच्या शरीराला रक्तदाब अचानक कमी झाल्याचे आढळते (ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनमुळे), तेव्हा ते भरपाई करण्याचा प्रयत्न करते. रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी हृदयाची ठोक्यांची गती वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नारंदर सिंगला (Dr Narander Singla) यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “पण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनच्या बाबतीत ही प्रतिक्रिया उशिरा येते किंवा अपुरी पडते, ज्यामुळे रक्तदाब तात्पुरता कमी होतो.”
“हे सामान्यतः वृद्ध प्रौढांमध्ये, डिहायड्रेटेड लोकांमध्ये किंवा काही विशिष्ट औषधे घेणाऱ्यांमध्ये दिसून येते,” असे डॉ. अग्रवाल पुढे सांगतात.
डोकेदुखी आणि अंधुक दृष्टी याशिवाय इतर लक्षणांमध्ये अशक्तपणा जाणवणे किंवा अगदी बेशुद्ध होणे यांचा समावेश आहे. “जेव्हा रक्तदाब अचानक कमी होतो तेव्हा मेंदूला कमी रक्त आणि ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे अनेक लक्षणे दिसतात. व्यक्तींना चक्कर येणे किंवा डोकेदुखी, अंधुक दृष्टी, सामान्य अशक्तपणा किंवा थकवा, मळमळ आणि अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, बेशुद्ध होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. ही लक्षणे सामान्यतः उभे राहिल्यानंतर लगेचच दिसून येतात आणि व्यक्ती बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर बरी होऊ शकतात,” असे डॉ. सिंगला सांगतात.
तथापि, बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये मेंदूला रक्तपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदय गती वाढवून शरीर लवकर परिस्थितीशी जुळवून घेते, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसला ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सचे अंतर्गत औषध सल्लागार डॉ. अनिकेत मुळे यांनी दिली.
जर एखाद्याला वारंवार असा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी असे प्रसंग बराच काळ विश्रांती किंवा शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे उद्भवू शकते. परंतु तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन हे सहसा दुसर्या आरोग्य समस्येचे लक्षण असते, म्हणून उपचार वैयक्तिकरित्या करावे लागतात. “काही सेकंदांसाठीही बेशुद्ध पडणे गंभीर आहे आणि त्याची त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे,” असे डॉ. अग्रवाल सांगतात.
पुरेसे पाणी पिणे आणि हळूहळू उभे राहून रक्तदाबामध्ये अचानक होणारी ही घट टाळता येते, असे डॉ. अग्रवाल सांगतात; याला डॉ. मुळे यांनी सहमती दर्शविली आणि सांगितले की, क्लिनिकल मार्गदर्शनाखाली मूळ कारणे निश्चित केल्याने रक्तदाबात अचानक होणारी घट टाळता येते.
डॉ. सिंगला सांगतात की, स्टॉकिंग्ज किंवा स्लीव्हजसारखे कॉम्प्रेशन गारमेंट्स घातल्याने पायांमध्ये रक्त साचण्यापासून रोखता येते. “आहारात बदल करणे, जसे की थोड्या थोडया वेळाने काहीतरी खाणे, आणि पचण्यास जड जेवण टाळणे, हे देखील मदत करू शकते. शेवटी, नियमित व्यायामामुळे एकूण रक्ताभिसरण आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्य सुधारते, कालांतराने लक्षणांची तीव्रता कमी होते,” असे डॉ. सिंगला म्हणाले.