गेल्या काही वर्षांपासून भारतात उच्च रक्तदाबासह मधुमेहाचा सामना करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, ज्यात वेळीअवेळी जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे हे आजार बळावताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्येही उच्च रक्तदाब आणि मधुमेहासंबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. अशा परिस्थितीत रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मॅक्स हेल्थ केअरमधील एंडोक्रिनॉलॉजी आणि डायबेटिसचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. मिथल यांनी उच्च रक्तदाबासह मधुमेहाचा सामना करणाऱ्या एका रुग्णाच्या आरोग्याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. मिथल म्हणाले की, माझ्या क्लिनिकमध्ये असा एक रुग्ण आला, ज्याला ब्लड शूगर (रक्तातील साखर) नियंत्रणात असल्याने फार आनंद झाला होता. ज्याची HbA1c लेव्हल (तीन महिन्यांत रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण) ६.८ टक्के होती. रुग्णाला मी फक्त दुसऱ्यांदा पाहिले तेव्हा त्याच्या ब्लड शूगरच्या प्रमाणात बरीच सुधारणा दिसून आली. यात त्याचे वजनही कमी झाले आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात होते. त्यादिवशी रुग्णातील रक्तदाबाचे प्रमाण (ब्लड प्रेशर) मात्र १४५/९६ होते. यापूर्वी त्याचे रक्तदाबाचे हेच प्रमाण १४०/९० होते. यावेळी जाणवले की, या रुग्णास निदान न झालेल्या उच्च रक्तदाबाचा धोका आहे, ज्यामुळे त्याला मधुमेह होण्याचाही धोका वाढतोय. कारण हे दोन्ही आजार एकमेकांशी संबंधित आहेत. अशावेळी खराब जीवनशैली दोन्ही आजारांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.

डॉ. मिथल पुढे म्हणाले की, रुग्णास उच्च रक्तदाबाचा (हाय ब्लड प्रेशरचा) कोणताही त्रास कधी होत होता का अशी विचारणा केली, तेव्हा त्याने नाही असे म्हटले. पण, तपासणीत सर्व गोष्टी उघड झाल्या. यानंतर रुग्णाने कबूल केले की, कधीकधी त्याच्या ब्लड प्रेशरचे प्रमाणे १६०/१०० पर्यंत पोहोचते, अशावेळी तो SOS नावाच्या औषधी गोळीचे सेवन करतो. यावर डॉक्टरांनी रुग्णास उच्च रक्तदाबाचा धोका असल्याचे सांगितले, पण त्याने ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी संबंधित रुग्णास नियमित तपासणीयोग्य औषधं घेणे का आवश्यक आहे हे पटवून सांगितले. पण, असे अनेक रुग्ण आहेत जे रक्तदाबासह मधुमेह असतानाही योग्य औषधे आणि नियमित चाचणी करत नाहीत.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह

हायपरटेन्शनसह (उच्च रक्तदाब), मधुमेह असलेले काही रुग्ण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, यामुळे अनेकदा परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशावेळी आरोग्यस्थिती अनियंत्रित झाल्यास मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, किडनी निकामी होऊ शकते किंवा दृष्टी खराब होऊ शकते. याशिवाय डोकेदुखी आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या INDIAB च्या अहवालानुसार (२०२३), मधुमेह असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण जवळपास ७० टक्के इतके आहे.

अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे विशेषत: हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये बहुतेकदा एखाद्या अवयवावर गंभीर परिणाम होत नाही तोपर्यंत त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बऱ्याचदा लोक बरं वाटतय म्हणून औषधे घेणे टाळतात. परिणामी, यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण अनेकदा अनियंत्रित होते.

तुम्ही नियमित उच्च रक्तदाबाची तपासणी करत आहात का?

डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर्सच्या (बीपी मापन उपकरणे) मदतीने तुम्ही उच्च रक्तदाबाचे प्रमाण योग्य प्रकारे समजून घेऊ शकता. पण, ही तपासणी करण्यापूर्वी 30 मिनिटे आधी चहा/कॉफी/कॅफिनयुक्त पेये/स्मोक्‍ड किंवा व्यायाम करू नये. तुम्ही किमान पाच मिनिटे शांत आराम करा. ब्लड प्रेशर मोजताना बोलणे टाळा.

ब्लड प्रेशर मोजण्याच्या मशीनचा पट्टा हातावर नीट फिट करा. यानंतर एका मिनिटाच्या अंतराने दोन वेळा रिडिंग घ्या आणि आलेले प्रमाण नोंद करून ठेवा. तुम्हाला अनेक वर्षांपासून जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर आठवड्यातून किमान दोनदा रक्तदाबाची तपासणी करून घ्या आणि सतत रक्तदाब वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.

एम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग (एबीपीएम) मशीन, जी २४ तासात दर २० मिनिटांनी रक्तदाबाचे प्रमाण मोजते. अशावेळी जर हे प्रमाण खूप जास्त नोंदवले गेले, तर रुग्णास उपचारांची आवश्यकता असल्याचे समोर येते.

औषधोपचार कधी सुरू करावा?

जर तुमच्या रक्तदाबाचे प्रमाण <१५०/९५ असेल आणि तुम्हाला मधुमेह किंवा इतर कोणताही आजार नसेल, तर तुमचे डॉक्टर औषधोपचार सुरू करण्यापूर्वी काही आठवडे तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत चांगले बदल करण्याचा सल्ला देऊ शकतात. पण, हे आठवडे काही महिन्यांत किंवा वर्षांपर्यंत पोहचणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, यासाठी तुम्हाला वेळोवेळी डॉक्टरांकडे जावे लागेल.

यात उच्च रक्तदाब असलेल्या बहुतेक लोकांना नियमित औषधांची गरज असते. यामुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित आहे म्हणून औषधे खाणे थांबवणे चुकीचे आहे. कारण या औषधांमुळेच तुमच्या रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रणात राहिले आहे.

सर्व औषधांप्रमाणे अँटीहाइपरटेन्सिव्हसह औषधांचे काही साइड इफेक्ट्सही असतात. उदाहरणार्थ, ACEi (एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर, किंवा -सार्टन्स) मुळे खोकला होऊ शकतो किंवा CCBs (कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स, किंवा -डिपाइन्स) मुळे पाय सुजू शकतात. हे साइड इफेक्ट्स कमी प्रमाणात दिसतात.

पण, बरीच औषधे योग्य प्रमाणात सेवन केल्यास हृदय आणि मूत्रपिंडांचे संरक्षण केले जाऊ शकते. यामुळे औषधे तुमच्या अवयवांचे नुकसान करत नाहीत, उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होते. अशात औषधे घेऊनही तुमचे ब्लड प्रेशरचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहण्यामागे काही दुसरेही कारण असू शकते.

त्यामुळे मधुमेहाचा सामना करताना केवळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्वाचे नसते, तर रुग्णांनी इतर आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे.