Old Pressure Cooker Lead Poisoning अलीकडेच मुंबईतील एका व्यक्तीला शिशाची विषबाधा (lead poisoning) झाली. त्याने जे अन्न खाल्ले होते, ते २० वर्षे जुना प्रेशर कुकर वापरून शिजवले गेले होते.
मागच्या वर्षी तमिळनाडूमध्येही अधिकाऱ्यांनी वसतिगृह, भोजन समारंभादरम्यान (meal programmes) यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न शिजविण्यासाठी वापरले जाणारे प्रेशर कुकर तपासले असता, त्यातही शिशाचे अंश आढळले.
प्रेशर कुकर मजबूत असल्याने लोक ते अनेक दशके वापरतात. पण संशोधनानुसार, जुने अॅल्युमिनियम प्रेशर कुकर— विशेषतः तपासणी न झालेल्या (निकृष्ट/अनियमित) धातूपासून बनवलेले असतील, तर त्यात अन्न शिजविताना शिसे मिसळण्याचा धोका वाढतो.
कुकरमध्ये अन्न शिजवताना शिसे कसे मिसळते? (How does lead contamination happen?)
अॅल्युमिनियममध्ये नैसर्गिकरीत्या शिसे नसते. दूषितीकरण तेव्हा होतं जेव्हा शिसे असलेलं रीसायकल केलेलं स्क्रॅप अॅल्युमिनियम वापरलं जातं. सॉल्डरिंग किंवा कोटिंगमध्ये शिसे असू शकते. तसेच उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इतर धातूंमुळेही बाह्य दूषितीकरण (External contamination) होऊ शकतं.
तज्ज्ञांचा इशारा
तज्ज्ञ सांगतात, “शिसे थोड्या प्रमाणात असले तरी जर रोजच्या अन्नातून ते शरीरात गेले, तर दीर्घकाळानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये. इतर देशांतील अभ्यासांमध्येही असेच निष्कर्ष समोर आले आहेत. काही परदेशांत तपासलेल्या प्रेशर कुकरमधून मुलांसाठी ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त शिसे आढळले आहे.
अशा प्रकारची भांडी रोजच्या वापरात अनेक वर्षं वापरली, तर शरीरात हळूहळू शिसे साठत जाऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
शिसे आरोग्यावर कसं परिणाम करतं?(How does lead affect your health?)
शिसे शरीरातून लवकर बाहेर पडत नाही. ते ऊतींमध्ये (tissues) दीर्घकाळ साठून राहिल्यानंतरच त्याचे परिणाम दिसू लागतात. दीर्घकाळ शिशाच्या संपर्कात राहिल्यास मेंदूच्या कार्यात अडथळे, मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणे आणि हाडांच्या आरोग्यात बदल होणे, असे त्रास उदभवू शकतात.
मुलांमध्ये शिकण्याचा वेग कमी होणे आणि वर्तनातील बदल दिसू शकतात; तर प्रौढांना विस्मरण (memory lapses) आणि इतर दीर्घकालीन आजार होऊ शकतात. गर्भवती महिलांच्या शरीरातले शिसे थेट गर्भापर्यंत पोहोचून, त्याच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते.
ही लक्षणे त्वरित दिसून येत नाहीत; परंतु कालांतराने अशी काही लक्षणे दिसतात, जी इतर आजारांशीदेखील जुळतात. काहींना पोटात पिळवटल्यासारखे वाटून तीव्र वेदना होणे, शिकणे आणि वर्तनातील बदल( learning and behavioural changes), मळमळ, थकवा, वंध्यत्व व मूत्रपिंडाच्या समस्या यांसारखा त्रास होऊ शकतो
जास्तीचे शिसे कसे काढून टाकायचे?
लोह, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील शिशाचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यांच्या आहारात पोषक व संतुलित अन्न असते, त्यांच्या शरीरात शिसे कमी प्रमाणात शोषले जातं. पण ज्यांचा आहार नीट नसतो, त्यांच्यात शिसे जास्त प्रमाणात शोषलं जाऊ शकतं.” जर शिशाचे प्रमाण खूप जास्त असेल, तर तुम्हाला धातू-विघटक किंवा धातू काढून टाकणारी औषधे (chelating medicines) घ्यावी लागतील, जी शरीरात साचलेले शिसे (lead) किंवा इतर जड धातू स्वतःला बांधून घेतात आणि मग मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करतात.
दूषितता कशी होते? (How does contamination happen?)
अॅसिड आणि धातू यांच्यातील प्रतिक्रिया हा दूषिततेमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. चिंच किंवा टोमॅटोसारखे पदार्थ जास्त काळ शिजवल्यास कुकरचे किंवा अॅ ल्युमिनिअमच्या पृष्ठभागाचे विघटन जलद होते, ज्यामुळे धातूचे कण बाहेर पडतात. विसंगत उत्पादन मानकांमुळे आणि आधीच अस्तित्वात असलेल्या दूषिततेमुळे रिसायकल केलेल्या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या वस्तू आणखी धोकादायक असू शकतात.
अॅल्युमिनिअमचे भांडे कधी बदलावे लागतील? (When do you need to replace your cookware?)
जोखीम कमी करण्यासाठी, ओरखडे, गंजलेले किंवा टवके उडालेले भांडे बदला. स्टेनलेस स्टील किंवा उच्च-गुणवत्तेचे हार्ड-अॅनोडाइज्ड अॅल्युमिनियमचे गुळगुळीत पृष्ठभाग असलेले भांडे निवडल्याने शिसेगळतीची शक्यता कमी होते. आम्लयुक्त पदार्थ साठवणुकीसाठी धातू नसलेल्या कंटेनरमध्ये साठवले पाहिजेत आणि जुन्या भांड्यांमध्ये जास्त वेळ शिजवणे टाळले पाहिजे.
मोठ्या प्रमाणात अन्न तयार करणाऱ्या सुविधांसाठी, भांड्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. एक्स-रे फ्लुरोसेन्ससारख्या स्क्रीनिंग टूल्समुळे दूषित वस्तू शोधता येतात. भारतीय मानक ब्यूरो आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उत्पादकांकडून भांडी खरेदी करणे हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
((वरील लेख डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ते नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन आणि ट्रॉमा विभागाचे प्रमुख आहेत.)