मान्सूनच्या पावसामुळे आराम मिळू शकतो, परंतु त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गासह अनेक पायाभूत आणि आरोग्यविषयक आव्हाने निर्माण होऊ शकतात. पण, या समस्या इथेच संपत नाहीत; कारण पावसाळ्यात टोमॅटोसारख्या भाज्यांवरही अळीचा प्रादुर्भाव वाढतो. अलीकडे इन्स्टाग्रामवर इवान खन्ना आणि मम (Ivaan Khanna & Mum) यांच्याकडे एका मम्मी ब्लॉगरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव झालेला टोमॅटो दिसत आहे. “टोमॅटोमध्ये लहान, पांढरे किडे आहेत, कृपया भाज्या कापताना हुशारीने तपासा,” असे तिने सांगितले. या दाव्यामध्ये काही तथ्य आहे का, याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे, ते जाणून घेऊ या.

टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहारातील भाग आहे. कधी सलाड म्हणून तर कधी भाजीमध्ये आपण टोमॅटो रोज वापरतो. सहसा भाज्या आपण धुवून, स्वच्छ करून मगच वापरतो; पण पावसाळ्यात एवढे करणे पुरेसे नाही. टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये अळी असू शकते. अशा वेळी तुम्ही टोमॅटो न तपासता वापरले तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे टोमॅटो वापरण्यापूर्वी काय विचारात घ्यावे हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

पावसाळ्यात टोमटोमध्ये होऊ शकतात अळ्या

पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे टोमॅटोमध्ये अळ्या होऊ शकतात, जे कीटक आणि जंतांच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण तयार करतात, असे हैदराबादच्या ग्लेनेगल हॉस्पिटल्समध्ये वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत डॉ. हरिचरण जी यांनी सांगितले.

हेही वाचा – पोटभर जेवल्यानंतर लगेच झोपू नका! पाठदुखी टाळण्यासाठी सदगुरुनी दिला सल्ला, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात?

अळ्यांचा प्रादुर्भाव झालेले टोमॅटो खाल्यास आरोग्याला धोका निर्माण होईल का?

डॉ. हरिचरण सांगतात की, टोमॅटोच्या झाडांना प्रभावित करणारी मुख्य समस्या ही टोमॅटोमधील अळी आहे, कारण ही अळी टोमॅटोच्या झाडावर अंडी घालते. जेव्हा अंडी उबतात तेव्हा टोमॅटोमध्ये किडे शिरतात, यामुळे टोमॅटोचे अंतर्गत नुकसान होते. जसे की, टोमॅटो कुजण्यास सुरुवात होते. टोमॅटोला जीवाणू किंवा इतर हानिकारक पदार्थांचा संसर्ग होतो.

अळीचा प्रादुर्भाव असलेल्या टोमॅटोचे सेवन केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. “टोमॅटो धुण्यामुळे बाहेरील घाण आणि रसायने निघून जाऊ शकतात, तरीही अंतर्गत दूषितता आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. अळी असलेले टोमॅटोचे सेवन केल्यास पाचन समस्या उद्भवू शकतात. अळी आणि त्यांच्या कचऱ्यामुळे हानिकारक जीवाणू किंवा विषारी पदार्थ आहारत येऊ शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन किंवा अन्नजन्य आजार होऊ शकतात,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.

हेही वाचा – पॉप सिंगर झेन मलिक पराठा खाऊ शकतो मग तुम्ही का नाही? पराठा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

टोमॅटो वापरण्यापूर्वी काय तपासावे?

पावसाळ्यात टोमॅटोचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी, टोमॅटोचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. टोमॅटो वापरण्यापूर्वी त्याला लहान छिद्रे किंवा गडद ठिपके यांसारखी नुकसानीची चिन्हे आहेत का ते पाहा. “टोमॅटो नीट धुवा. तसेच त्याची साल काढणे किंवा शिजवणे यामुळे हानिकारक रोगजनकांचे सेवन होण्याचा धोका कमी होतो. टोमॅटो चिरताना एकदा व्यवस्थित अळी आहे का नाही ते तपासा. याव्यतिरिक्त, विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच टोमॅटो खरेदी करा जे योग्यरित्य टोमॅटो साठवतात. योग्यरित्या टोमॅटो साठवल्यास त्यात अळी आणि कीटकांचा संपर्क कमी होऊ शकतो,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पद्धतींचा समावेश केल्याने पावसाळ्यातही टोमॅटो तुमच्या आहाराचा निरोगी आणि पौष्टिक भाग राहतील, याची खात्री होते.