पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण घराबाहेर जाताना, प्रवास करतानाही पाणी बरोबर ठेवतो किंवा बाहेरून विकत घेऊन पितो. पण, अनेक जण प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. पाणी प्यायल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण आपल्या कारमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तशाच ठेवतात आणि नंतर गरज लागेल त्याप्रमाणे त्यातील पाणी पितात. पण, सामान्य असलेली ही सवय तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते आणि त्यामुळेच ती ‘धोकादायक’ही आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तापलेल्या कारमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून रासायनिक गळती होऊ शकते, जी आरोग्यास हानी पोहोचवू शकते.विशेषतः जेव्हा प्लास्टिक उच्च तापमानाच्या संपर्कात असते.

आरोग्य धोके (Health risks)

“कडक उन्हात तापलेल्या कारमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या ठेवणे ही एक सामान्य सवय आहे; पण ती धोकादायक असू शकते. प्रामुख्याने बंद वाहनांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या जेव्हा उच्च तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा त्या पाण्यात बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि अँटीमोनीसारख्या हानिकारक रसायनांची गळती होते. हे पदार्थ हार्मोनल असंतुलन निर्माण करतात आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढवतात,” असे ग्लेनेगल्स हॉस्पिटल (परळ मुंबई)च्या अंतर्गत औषध विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

“बहुतेक प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीईटी) असते, जे उष्णतेच्या ताणाखाली अँटीमनी आणि बिस्फेनॉल ए (बीपीए)सारखी धोकादायक रसायने पाण्यात सोडतात,” असे मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या अंतर्गत औषध डॉ. ऋतुजा उगलमुगले यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

“डॉ. उगलमुगले सावधानतेचा इशारा देतात, “जर या रसायनांच्या थोड्या प्रमाणात जरी वारंवार संपर्क आला, तर कालांतराने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.” “BPA हे एक उदाहरण आहे, जो एक अंतःस्रावी व्यत्यय आणणारा पदार्थ जो संप्रेरक(हॉर्मोनल) कार्याशी तडजोड करण्याची क्षमता ठेवतो, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या स्थितीवर परिणाम करू शकतो आणि इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका वाढवू शकतो. अँटीमनी जो एक धातूचा घटक तो गॅस्ट्रोइंटेस्टायनल दाहकता, तसेच दीर्घकालीन संपर्कात अवयवांमध्ये विषारीपणा निर्माण करतो, असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे,” असेही डॉ. उगलमुगले सांगतात.

त्याशिवाय प्लास्टिकची बाटली उन्हात तापल्यामुळे त्यातून मायक्रोप्लास्टिक्सदेखील बाहेर पडू शकतात, जे शरीरात प्रवेश करू शकतात आणि अवयवांमध्ये जमा होऊ शकतात, ज्यामुळे दाहकता किंवा इतर दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात, असे डॉ. अग्रवाल म्हणाल्या.

काय लक्षात घ्यावे?

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, बहुतेक प्लास्टिकच्या बाटल्या एकदाच वापरण्यासारख्या असतात आणि त्या वारंवार उष्णतेच्या संपर्कात राहण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या नसतात.

“म्हणून तुमच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी उष्ण वातावरणात सोडलेल्या बाटल्यांमधून पाणी पिणे टाळा आणि प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा. हा सुरक्षित पर्याय आहे आणि तो पर्यावरण व तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे टाळण्यासाठी घरून बाटली घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. काळजी घ्या आणि प्लास्टिकचा वापर टाळा,” असे डॉ. अग्रवाल सांगतात.