आसाममध्ये नुकतेच जपानी एन्सीफॅलिटिस या रोगाची लागण झालेले रुग्ण आढळल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या निर्देशांनुसार रविवारी आसाममधील आरोग्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके रवाना करण्यात आली.
या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आसाम सरकारला सर्व प्रकारे मदत आणि सहकार्य करण्याचे निर्देश हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य विभागाला दिले आहेत. याविषयी हर्षवर्धन म्हणाले की, ‘आसाममधील परिस्थितीवर मी सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यात जपानी एन्सीफॅलिटिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक आणि व्यवस्थापकीय उपाययोजनांबाबत आसाम सरकारशी समन्वय साधला जात आहे.’ या रोगाला योग्यप्रकारे प्रतिबंध करण्यासाठी पाहणी तसेच रोगनिदान संचांचा पुरवठा यांसह सर्व प्रकारचे नियोजनात्मक आणि तांत्रिक साह्य़ केंद्राकडून राज्य सरकारला केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जपानी एन्सीफॅलिटिस हा कीटकजन्य एन्सीफॅलिटिसचा प्रकार असून क्युलेक्स गटातील डासांद्वारे त्याचा प्रसार होतो. हे डास प्रामुख्याने भातखाचरांमध्ये आणि जलसृष्टी संपन्न अशा मोठय़ा जलाशयांमध्ये वाढतात. त्याचबरोबर स्थलांतर करणारे पक्षी आणि डुकरे हे हा रोग एका भागातून दुसऱ्या भागात प्रसारित होण्यास कारणीभूत ठरतात.
केंद्राची पथके रविवारी सायंकाळी आसाममध्ये पोहोचणे अपेक्षित होते. राज्याच्या सर्व २७ जिल्ह्य़ांमध्ये जपानी एन्सीफॅलिटिस प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. तेथे नियमित लसीकरणाबरोबरच एक ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना जपानी एन्सीफॅलिटिस प्रतिबंधक लस देण्यात आली होती, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. रोगाची लागण झालेल्यांवर उपचारांसाठी दिब्रुगड वैद्यकीय महाविद्यालय आणि गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष उभारण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे.