तोंड गोड केल्याशिवाय कोणताही सण हा पूर्णपणे साजरा होत नाही. सहसा आपण सणासुदीच्या काळात बाजारात बनवलेल्या मिठाई घरी आणतो. अशा अनेक मिठाई आहेत जे खाण्यास अतिशय चवदार असतात आणि घरीही बनवता येतात. परंतु मिठाई कशी बनवायची याची योग्य माहिती नसल्यामुळे आपण भेसळयुक्त असलेली मिठाई बाजारातून विकत घेतो. मात्र तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बाजारातून आणलेली मिठाई बनवू शकता. ती मिठाई म्हणजे मिल्क केक मिठाई आहे. ही मिठाई खायला खूप स्वादिष्ट लागते. ही गोड मिठाई प्रत्येकाच्या घरांची पहिली आवडती मिठाई असते. जर तुम्हालाही मिल्क केक ही मिठाई आवडत असेल तर तुम्ही देखील या दसरा सणांनिमित्त घरी बनवू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. चला तर मग जाणून घेऊयात झटपट आणि स्वादिष्ट मिल्क केक मिठाई कशी बनवायची?
मिल्क केक मिठाई बनवण्याचे साहित्य
दूध – २ लिटर
साखर – २ कप
तूप – २ टेस्पून
तुरटी बारीक वाटलेली – २ चिमूटभर
मिल्क केक मिठाई बनवण्याची पद्धत
मिल्क केक बनवण्यासाठी आधी एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. या दरम्यान गॅस हाय फ्लेमवर चालू ठेवा. यानंतर दुध उकळल्यावर त्यात दोन चिमूटभर तुरटी घाला.तुरटी टाकल्यानंतर काही वेळाने दूध फाटेल आणि दाणेदार होईल. यानंतर दूध उकळत ठेवा आणि ते घट्ट होईपर्यंत शिजवा. दूध चांगले घट्ट झाल्यावर त्यात दोन कप साखर घाला. आता चमच्याच्या साहाय्याने दुधात साखर चांगली मिसळा आणि शिजू द्या.
जेव्हा दूध १० मिनिटे व्यवस्थित शिजेल तेव्हा त्यात तूप घाला. लक्षात ठेवा की दुध मध्ये मध्ये ढवळत रहा. हे संपूर्ण मिश्रण जाड होईपर्यंत शिजत ठेवा. जेंव्हा मिश्रण चांगले शिजेल तेव्हा त्याचा रंगही बदलेल. मिश्रणाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा. आता एक खोल ताट घेऊन त्यात पातेल्यातील मिश्रण बाहेर काढा आणि अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासानंतर मिश्रण व्यवस्थित थंड झाला आहे की नाही ते तपासा, जर ते नीट सेट केले नसेल तर हे मिश्रण आणखी काही वेळ थंड होऊ द्या आणि हे मिश्रण चांगले सेट झाल्यावर तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या. अशा प्रकारे तुमचा मिल्क केक मिठाई पूर्णपणे तयार आहे. या दसऱ्याला घरी येणाऱ्या पाहुण्यांना या मिल्क केक मिठाईने त्यांच तोंड गोड करा.