नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये MRI विषयी भिती निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण या MRI बाबत आपल्याकडे पुरेशी जागरुकता नसल्याने त्याबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे. MRI (Magnetic resonance imaging) मध्ये चुंबकाचा वापर करुन रुग्णाच्या शरीराचा अभ्यास केला जातो. या चुंबकाची शक्ती खूप जास्त असते. यातील चुंबकीय लहरींच्या शरीरावर पडणाऱ्या प्रभावाने विशिष्ट चित्र तयार केले जाते. यामध्ये येणाऱ्या त्रिमितीय (३ डी) प्रतिमांचा शरीराचा अभ्यास करण्यासाठी चांगला उपयोग होतो. मात्र या मशीनबाबत काही गोष्टींची सामान्य नागरिकांनाही माहिती असणे आवश्यक असते. काय आहेत या गोष्टी पाहूया…

१. MRI मशीनमध्ये चुंबकाचा वापर केलेला असल्याने या खोलीत कोणतीही लोखंडी वस्तू, दागिने, मोबाईल, क्रेडिट कार्ड नेऊ नये.

२. शरीरात कृत्रिम मशीन किंवा कोणता कृत्रिम अवयव बसवलेला असल्यास त्या व्यक्तीचा MRI घेता येत नाही. याबाबत सध्या जगभरात संशोधन सुरु असून लवकरच त्याविषयी काही काम होईल असा अंदाज आहे. परंतु सध्या अशा व्यक्तींनी MRI च्या खोलीत जाणे धोक्याचे आहे.

३. गर्भवती स्त्रीला MRI खोलीत शक्यतो नेणे टाळावे.

४. कोणतीही चुंबकीय वस्तू MRI च्या जवळपास नेणे टाळलेलेच बरे. अन्यथा ती वस्तू खेचली जाऊन अपघात होऊ शकतो.

५. परदेशात MRI बाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले असते. त्याचे योग्य पद्धतीने पालनही केले जाते. मात्र आपल्याकडे या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात नसल्याने अपघात घडतात.

६. या खोलीत वापरण्यात येणारी सर्व वैद्यकीय साधने अचुंबकीय पदार्थांच्या बनलेल्या असतात.

७. दातांना कॅप बसवली असेल तर MRI घेता येतो.

८. MRI हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त असून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केल्यास रुग्णाचे निदान करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरतो.

डॉ. प्रियांका साखवळकर