रिलायन्स जिओने मागील काही वर्षात टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. रिलायन्सच्या दमदार पदार्पणामुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. रिलायन्सने मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंगची सुविधा दिल्यानंतर आपला फिचर फोन बाजारात दाखल केला. या फोनला अतिशय कमी कालावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. अखेर कंपनीला फोनचे बुकींग बंद करावे लागले. यानंतर कंपनीने पुन्हा आपल्या या फोनचे पुढचे मॉडेलही लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनी स्मार्टफोनची निर्मिती करणार असल्याचे समजते आहे. हा स्मार्टफोन मोठ्या स्क्रीनचा असेल असे बोलले जात आहे. त्यामुळे काही दिवसांत जिओचा मोठ्या स्क्रीनचा स्मार्टफोन बाजारात आला तर आश्चर्यचकीत होण्याचे कारण नाही.

आम्ही ठराविक काळाने ग्राहकांना काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो, त्याचाच हा एक भाग आहे असे कंपनीच्या सेल्स विभागाचे प्रमुख सुनील दत्त म्हणाले. रिलायन्स जिओ काही कंपन्यांशी बोलणे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता फिचर फोन वापरणाऱ्यांना स्मार्टफोनकडे वळवायचे असल्यास त्याची किंमत कमी असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चांगला भागीदार शोधण्यासाठी रिलायन्स तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अमेकिरेच्या फ्लेक्स या कंपनीशी सध्या बोलणी सुरु असून ती यशस्वी झाल्यास पुढील चित्र स्पष्ट होईल. मात्र यामुळे ज्यांना आता स्मार्टफोन घेणे परवडत नाही त्यांच्या तो आवाक्यात येण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोनला मोठी स्क्रीन देण्यात येणार असून यामध्ये युट्यूब, म्युझिक, व्हॉट्सअॅप, फेसबुक अशी इतर स्मार्टफोनप्रमाणे सर्व फिचर्स देण्यात येणार आहेत असे दत्त यांनी स्पष्ट केले. मात्र नेमकी या फोनची निर्मिती कधी होईल आणि त्याची किंमत काय असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.