Sleep Apnea : बिघडत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत, तर त्यांना अनेक आजारांनाही बळी पडावे लागले आहे. ताणतणाव हे निद्रानाशाचे एक प्रमुख कारण आहे आणि स्लीप अ‍ॅप्निया हा झोपेचा एक गंभीर विकार म्हणून उदयास आला आहे.

स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे काय?

जयपूर येथील नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्लीप स्पेशालिस्ट डॉ. शिवानी स्वामी यांच्या मते, स्लीप अ‍ॅप्निया हा एक विकार आहे, ज्यामध्ये झोपताना श्वास घेणे सामान्य नसते. ते थांबते आणि सुरू होते, ज्यामुळे घोरणे सुरू होते. ही समस्या केवळ त्या व्यक्तीलाच त्रास देत नाही, तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्रासदायक ठरते. स्लीप अ‍ॅप्नि याने ग्रस् असलेल्या लोकांना सहसा पुरेशी झोप मिळत नाही, ज्यामुळे त्या व्यक्तीला दिवसा थकवा आणि झोप येते.

ऑक्सिजनची पातळी कमी होते

डॉ. शिवानी स्वामी यांनी पुढे स्पष्ट केले की, घोरण्यामुळे ऑक्सिजनची पातळीदेखील कमी होते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे आणि हृदयाचे नुकसान यांसारख्या इतर गंभीर समस्या उद्भवतात. झोपेच्या विकारांनी ग्रस्त असलेले रुग्णही रुग्णालयांमध्ये पोहोचू लागले आहेत ही चिंतेची बाब आहे.

कारण ओळखणे

जर कोणी घोरत असेल, तर त्याचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. खरं तर, आजकाल चरबीयुक्त पदार्थ आणि बाहेरील अन्न खाल्ल्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. खाण्यापिण्याच्या अशा निष्काळजीपणामुळे वाढणाऱ्या आजारांपैकी एक म्हणजे स्लीप अ‍ॅप्निया म्हणजेच घोरण्याची समस्या.

स्लीप अ‍ॅप्निया कधीही ठरू शकतो घातक

डॉ. शिवानी स्वामी पुढे स्पष्ट करतात की, यामुळे केवळ व्यक्तीची झोपच जात नाही, तर शरीरातील ऑक्सिजनची पातळीदेखील कमी होते. हे कधी कधी प्राणघातक ठरू शकते. घोरण्यामुळे उच्च रक्तदाबदेखील होऊ शकतो. सर्वांत मोठी चिंता अशी आहे की, ही किरकोळ दिसणारी स्थिती हृदयरोगास कारणीभूत ठरू शकते. धूम्रपान करणाऱ्यांनाही या विकाराचा धोका असतो. आनुवंशिक घटकदेखील या समस्येला कारणीभूत ठरू शकतात.

मोठ्या आवाजात घोरण्यामुळे झोपेचा अभाव यांसह अनेक समस्या उदभवू शकतात. तर दुसरीकडे जे लोक घोरत नाहीत, ते या विकारापासून मुक्त आहेत, असं नाही. जर एखाद्या व्यक्तीला आठ तास झोपल्यानंतरही दिवसा आळस किंवा थकवा जाणवत असेल, तर तोदेखील या विकाराने ग्रस्त असू शकतो.

लक्षणांचा परिणाम

जे लोक घोरतात, त्यांना झोपेच्या वेळी अधूनमधून श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे झोप कमी लागते. अशा व्यक्ती दिवसा लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. स्लीप अ‍ॅप्निया असलेल्या रुग्णांना दिवसभर झोपेची समस्या जाणवते. तो सकाळी डोकेदुखी, घसा खवखवण्याची तक्रार करतो. गाडी चालवतानाही त्यांना अनेकदा झोप येते. जेव्हा घोरणे सुरू होते, तेव्हा ते हृदयापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी धमन्यांना अधिक काम करावे लागत असल्याचे लक्षण असते. कधी कधी लोकांना ते घोरत आहेत हे कळतही नाही. जर घोरणे खूप त्रासदायक झाले, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

स्लीप अ‍ॅप्निया उपचार

  • घोरण्याचा त्रास असलेल्यांनी प्रथम वजन कमी करावे.
  • सायनसच्या रुग्णांनी झोपण्यापूर्वी स्टीम बाथ घ्यावा.
  • दारू आणि धूम्रपान ताबडतोब बंद करावे.
  • झोपेच्या गोळ्या घेण्याऐवजी दिवसा कठोर परिश्रम करणे चांगले आहे, जेणेकरून थकव्यामुळे रात्री आपोआप झोप येईल.
  • कुशीवर झोपा. कधीही पाठीवर किंवा पोटावर झोपू नका.
  • नियमित व्यायाम करा
  • रात्री साधे आणि सहज पचणारे अन्न खा

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध आणि चिमूटभर हळद प्यायल्याने घोरण्यापासून आराम मिळतो. दिवसभर भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे एक ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून पिणेदेखील फायदेशीर आहे.