Kitchen Jugaad: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, तसाच एखादा पदार्थ बनवायला आणि मग नंतर पसारा आवरायला जीवाची दमछाक होते. किचन स्वच्छ करणे हा नित्यक्रम जरी आपण रोज पाळत असाल तरी अनेकदा किचनमधील एका गोष्टीच्या स्वच्छतेकडे आपले लक्ष जात नाही ती म्हणजे किचनच्या खिडक्यांची दारं. मराठी घरात डाळ- भाज्यांच्या काय अगदी सॅलेड सारख्या रेसिपी सुद्धा फोडणीशिवाय पूर्ण होत नाहीत. अशावेळी फोडणीच्या तेलाचे डाग पडून, धुरामुळे किचनच्या खिडक्या अगदी कळकट्ट होतात. किचनमध्ये गुदमरायला होऊ नये म्हणून या खिडक्या सहसा गॅसच्या मागील बाजूला असतात त्यामुळे हे डाग थेट खिडक्यांवर जाऊन चिकटून बसतात.
वेळच्या वेळी स्वच्छता केली नाही तर हे डाग चिवट होऊ लागतात. तुम्हालाही तुमच्या किचनला फ्रेश लुक द्यायचा असेल तर आज फक्त पाच मिनिटांचा वेळ काढून घरगुती पद्धतीने किचनच्या खिडक्यांची स्वच्छता करायला शिकूया. यासाठी आपल्याला किचनमध्ये असणाऱ्याच वस्तू वापरायच्या आहेत, चला तर मग पाहूया…
किचनच्या खिडकीला करा चकचकीत
१) बेकिंग सोडा आणि लिंबू
असंख्य डागांवर हे एक सोल्युशन रामबाण उपाय ठरू शकते. आपल्याला ही पेस्ट एखाद्या खराब टूथब्रशच्या मदतीने किचनच्या खिडकीला लावून घ्यायची आहे. साधारण पाच मिनिटांतच तुम्हाला चिवट डाग कमी होताना दिसेल. मग त्याच टूथब्रशने अगदी हलक्या हाताने घासून तुम्ही खिडकी घासून पुसून लक्ख करू शकता.
२) कॉर्नस्टार्च व्हिनेगर
अनेकदा आपण कुकर उघडतो तेव्हा भाताची वाफ सुद्धा स्टार्च रूपात खिडकीच्या दारावर चिकटून बसते. हेच पांढरे डाग काढण्यासाठी आपण कॉर्नस्टार्च आणि व्हिनेगरची पेस्ट वापरू शकता. एखादा सुकलेला लिंबू असल्यास त्याने ही पेस्ट खिडकीवर लावा जेणेकरून लिंबातील ऍसिडिक गुण सुद्धा चिकट डाग कमी करायला मदत करतील. व्हिनेगरमुळे जंतू सुद्धा नष्ट व्हायला मदत होते.
३) चिकटपट्टी
तुम्ही खिडकी स्वच्छ केली तरी ती काहीशी ओलसर असल्याने त्यावर पटकन धुळीचे कण बसू शकतात. अशावेळी काहीजण पेपरचा वापर करतात पण कागदाचे कणही खिडकीवर चिकटून राहू शकतात. अशा त्रासासाठी बाजारात लिंट रोलर उपलब्ध आहेत. तुम्ही अगदी घरीच एखाद्या रोलरला चिकटपट्टी लावून सुद्धा खिडकीवर फिरवू शकता ज्यामुळे हे लहान धुळीचे कण त्यावर चिकटतील आणि खिडक्या मात्र स्वच्छ राहतील.
हे ही वाचा<< Conjunctivitis Signs: डोळे येण्याचे प्रमाण वाढले! सुरुवातीची लक्षणे व घरगुती उपाय पाहा, आयड्रॉप कसा वापरावा?
हे सगळं करत असताना गॅसच्या शेगडीवर एखादे प्लास्टिक किंवा जाड कापड टाकून ठेवा. शक्य झाल्यास शेगडी दुसरीकडे हलवल्यास उत्तम अन्यथा पाणी पडून बर्नर खराब होऊ शकतात. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून कळवा.