Healthy drinks in the morning: सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. दिवस सुरू होण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी असो किंवा नैसर्गिक घटकांपासून बनविलेले डिटॉक्स ड्रिंक असो; सकाळच्या दिनचर्येमुळे आपला दिवस कसा जाणार हे ठरते. असेच एक पेय आहे, ज्याचे तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सेवन करू शकता. पारंपरिक भारतीय आरोग्यावर आधारित आणि आधुनिक विज्ञानाने समर्थित शेवग्याच्या पानांची पावडर आणि ताज्या आवळ्याच्या रसाचे एक प्रभावी मिश्रण असलेले हे पेय आहे.

शेवग्याच्या पानांची पावडर आणि ताज्या आवळ्याचा रस यांचे मिश्रण असलेले पेय खूपच आरोग्यदायी आहे. हे पेय अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध, पचनसंस्थेसाठी सौम्य व नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकार शक्तीला समर्थन देण्यासाठी ओळखले जाते.

या लेखात, आपण शेवग्याच्या पानांची पावडर आणि ताज्या आवळ्याचा रस इतके शक्तिशाली मिश्रण कसे बनते ते पाहू.

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे : आवळा हे पोषक घटकांनी भरलेले एक लहान हिरवे फळ आहे. नवी दिल्लीतील एससीआय इंटरनॅशनल हॉस्पिटलमधील पोषणतज्ज्ञ डॉ. कोमल भदौरिया सांगतात की, आवळा दररोज शिफारस केलेल्या व्हिटॅमिन सीच्या सेवनाच्या ४६ टक्के पर्यंत पुरवठा करू शकतो. खरे तर, १०० ग्रॅम पेयामध्ये ३०० मिलिग्रॅमपर्यंत व्हिटॅमिन सी असू शकते. आवळा व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर यांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते आयुर्वेदिक पोषणातील सर्वांत पौष्टिक फळांपैकी एक आहे.

शेवग्याच्या पानांच्या पावडरचे आरोग्यदायी फायदे : शेवग्याचे झाड, ज्याला बहुतेकदा ‘ड्रमस्टिक ट्री’ म्हणून संबोधले जाते, ते विविध प्रकारचे आरोग्यदायी फायदे प्रदान करते. या वनस्पतीचा प्रत्येक भाग खाण्यायोग्य आणि पोषक घटकांनी समृद्ध आहे. वसंत कुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. मनोज के. आहुजा स्पष्ट करतात, “शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह व आवश्यक अमिनो आम्ले असतात. हे पोषक घटक एकूण आरोग्याला चालना देण्यासाठी आणि आतून आपले पोषण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. “शेवग्याच्या पानांची पावडर विशेषतः त्याच्या दाहकविरोधी, अँटिऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकार शक्तीला चालना देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते.

आवळा रस आणि शेवग्याच्या पानांच्या पावडरचे का करावे एकत्रित सेवन? या पेयाचे पाच अविश्वसनीय फायदे

१. लोहाच्या शोषण क्षमतेत वाढ – आवळा व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे, जे शरीराला लोह अधिक कार्यक्षमतेने शोषण्यास मदत करते. अ‍ॅनल्स ऑफ द न्यू यॉर्क अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एस्कॉर्बिक अॅसिड लोहाचे शोषण वाढवते, ज्यामुळे लोहाची पातळी कमी असलेल्या किंवा लोहाची कमतरता असलेल्या अशक्त व्यक्तींसाठी या मिश्रणाचे पेय फायदेशीर ठरते.

२. पचनास मदत – आवळा आणि शेवग्याच्या पानांची पावडर या दोन्हींचे दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंटयुक्त गुणधर्म पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने आम्लता कमी होऊ शकते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, ज्यामुळे ते पोटफुगी, अपचन आणि आम्ल रिफ्लक्ससाठी उपयुक्त नैसर्गिक उपाय बनते.

३. त्वचा आणि केसांच्या आरोग्यात सुधारणा – आवळा आणि शेवग्याच्या पानांची पावडर रक्त शुद्ध करण्याच्या क्षमतेसाठी, त्वचेत आणि केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्वचा स्वच्छ अन् केस मजबूत होऊन, केसगळती कमी होऊ शकते. शेवग्यामधले व्हिटॅमिन ए आणि आवळ्यातील व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनास समर्थन देते, जे त्वचेची लवचिकता आणि दुरुस्तीमध्ये योगदान देते

४. शरीरांतर्गत पीएचचे संतुलन – आवळा हा आम्लयुक्त म्हणून; तर शेवगा त्याच्या क्षारीकरणाच्या प्रभावासाठी ओळखला जातो. या दोघांचे एकत्रित सेवन केल्यामुळे शरीरातील पीएच संतुलित राखण्यास मदत मिळू शकते; जे हाडांचे आरोग्य, जळजळ कमी करणे व आतड्यांतील मायक्रोबायोटा संतुलन सुधारणे यांसाठी आवश्यक आहे.

५. रक्तशर्करा नियंत्रणास समर्थन – मॅक्रोबायोटिक पोषणतज्ज्ञ व आरोग्य प्रशिक्षक शिल्पा अरोरा आवळ्याचे इन्सुलिन संवेदनशीलतेच्या दृष्टीने समर्थन करतात आणि त्यामुळे विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते यावर प्रकाश टाकतात. शेवग्यामध्ये समृद्ध प्रमाणात जस्त असल्याने रक्तशर्करेचे नियमन करण्यास हातभार लागतो. या उपयुक्त बाबीमुळे टाईप २ मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या किंवा जेवणानंतर रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने असलेल्यांना फायदा होऊ शकतो.

आवळा-शेवग्याच्या पानांच्या पावडरचा रस

आवळा-शेवग्याच्या पानांच्या पावडरचा रस बनवण्यासाठी पोषणतज्ज्ञ व वजन कमी करण्याच्या प्रशिक्षक लीमा महाजन यांनी शिफारस केलेली एक सोपी, पौष्टिक रेसिपी.

साहित्य : दोन चिरलेले आवळे, शेवग्याची मूठभर ताजी व स्वच्छ पाने, पुदिन्याची मूठभर ताजी स्वच्छ पाने, १/२ इंच कच्ची हळद, १/२ इंच गूळ, १/२ इंच ताजे आले, १/४ टीस्पून जिरे (जिरा) पावडर, १/४ टीस्पून काळी मिरी पावडर, १/४ टीस्पून काळे मीठ.

पद्धत : सर्व घटक थोड्याशा पाण्यात मिसळा. एका ग्लासमध्ये गाळून न घेता, लगेच त्याचे सेवन करा.

लक्षात ठेवाव्यात अशा तज्ज्ञांच्या सूचना –

जर शेवग्याची ताजी पाने उपलब्ध नसतील, तर त्याऐवजी एक चमचा शेवग्याच्या पानांची पावडर वापरता येईल. या पर्यायामुळे अजूनही प्रमुख पौष्टिक फायदे मिळतात. लीमा महाजन गर्भधारणेदरम्यान शेवगा टाळण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनाचा धोका वाढू शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा थायरॉईड विकारांसाठी औषधे घेणाऱ्यांनी त्यांच्या आहारात शेवगा समाविष्ट करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा किंवा प्रमाणित पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागड्या वेलनेस ड्रिंक्स आणि सिंथेटिक सप्लिमेंट्सनी भरलेल्या बाजारपेठेत हे आरोग्यदायी पेय फायदेशीर ठरते. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत हे पेय समाविष्ट केल्याने आतड्यांचे आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती आणि एकूणच ऊर्जेची पातळी वाढू शकते.