Redmi Note 7 Pro मध्ये आग लागण्याच्या घटनेनंतर Xiaomi कंपनी आता डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या युजरच्या फोनला आग लागली होती त्या युजरला कंपनीने नवीन ‘रेडमी नोट 7 प्रो’ स्मार्टफोन पाठवल्याचं वृत्त आहे. कंपनीने युजरला नवीन बॅगही (Mi Backpack) देण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या आठवड्यात 91mobiles ने सर्वप्रथम ‘रेडमी नोट 7 प्रो’मध्ये आग लागल्याचं वृत्त दिलं होतं. गुरुग्रामच्या विकेश कुमार या तरुणाच्या  फोनला आग लागल्याची घटना घडली होती. कुमारने एका ऑनलाइन पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली. सुरूवातीला कंपनीने या युजरला नवीन स्मार्टफोन देण्यास नकार दिला होता, नंतर सर्व्हिस सेंटरमध्ये युजरला 50 टक्के कमी किंमतीत नवीन फोन ऑफर करण्यात आला होता.

(छायाचित्र सौजन्य : 91mobiles.com आणि globalnewshut.com )

पण,  हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर कंपनीने त्याला नवीन फोन देण्याचा निर्णय घेतला. विकेश कुमारने केलेल्या आरोपानुसार, ‘त्याच्या रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला आणि आग लागली. काही समजण्याच्या आत फोनच्या आगीमुळे त्यांच्या बॅगलाही आग लागली. त्यामुळे फोन आणि बॅग दोन्हींचं नुकसान झालं’. फोनला लागलेल्या आगीत सुदैवाने विकेशला जखम झाली नाही. यानंतर विकेश फोन घेवून सर्व्हिस सेंटरमध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी विकेश कुमार याचीच चूक असल्याचे सांगितले, तसेच रिप्लेसमेंट युनिटसाठी पैशांची मागणीही केली होती. नंतर प्रकरण वाढत असल्याचं पाहून शाओमीने आम्हाला खरोखर ग्राहकांची चिंता असून त्यांना सर्व प्रकारची आम्ही मदत करतो असं म्हणत ते प्रकरण मिटवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शाओमीने डॅमेज कंट्रोल म्हणून नवीन रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन आणि नवीन बॅगही (Mi Backpack) पाठवली आहे.