|| डॉ. अद्वैत पाध्ये

बिल विल्सन हा एक शेअर ब्रोकर होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या पत्नीला मात्र ते आवडत नव्हते. त्यामुळे तो लपून दारू प्यायचा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत मंदीची लाट आली होती, त्यात बिलची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे तो दारू अधिक लपवून पण जपून प्यायला लागला. आपल्या पत्नीसमोर दारू सोडण्यासाठी अनेक वेळा शपथ घेतली. दारू पिण्यासाठी इतर सर्व अल्कोहोलिक्सप्रमाणे तो पण दु्सऱ्यांनाच जबाबदार धरायचा.

१९३४ मध्ये एका रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याला त्या स्थितीचा (दारूशिवायचा) वेगळाच अनुभव आला. जो त्याला सुखाच्या, आनंदाच्या स्थितीसारखा होता. त्यामुळे तो आमूलाग्र बदलला. मी जर हे करू शकतो तर इतर का नाही करू शकणार म्हणून तो इतर मद्यपी लोकांशी बोलायला लागला यामुळे बाकीचे किती बदलले ते माहीत नाही पण बिल व्यसनापासून दूर राहिला.

त्यानंतर तो अ‍ॅर्कोन गावात व्यवसायानिमित्त गेला. तिथे व्यवसायासंबंधीची बोलणी फिस्कटली आणि त्याला दारूची खूपच आठवण येऊ  लागली. त्यामुळे त्याला कोणा तरी मद्यपीशी बोलावे वाटू लागले. तिथे त्याला बॉब स्मिथ या सर्जनचा पत्ता मिळाला. तो सर्जन असला तरी मद्यपी म्हणूनच प्रसिद्ध होता. त्या आधी पण बिल आणि बॉब ऑक्सफोर्ड ग्रुप या आध्यात्मिक ग्रुपशी संबंधित होते. या ग्रुपचे डॉ. सॅम्युएल शूमाकर आणि मित्र एबी यांच्या मदतीने आणि न्यूयॉर्कमधल्या रुग्णालयाचे डॉ. सिल्कवर्थ यांच्या मार्गदर्शनाने बिल व्यसनांपासून दूर झाला, पण त्याच ग्रुपमध्ये असूनही बॉबला ते जमले नव्हते.

पण जेव्हा ते समोरासमोर आले, बॉबला बरे वाटले. बिलने त्याला सांगितले की मद्यव्यसन हा मनाचा, भावनांचा आणि शरीराचा एकत्रित विकार आहे. बॉबला आतापर्यंत व्यसन हा मनोविकार आहे हे माहीतच नव्हते, जरी तो डॉक्टर होता तरी. पण बिलशी बोलल्यावर त्याला ते पटले, त्याने व्यसन सोडले, पुन्हा न पिण्यासाठी. हीच त्याची जगप्रसिद्ध अल्कोहोल अ‍ॅनॉनिमसची पहिली बैठक. पहिल्या स्वमदत गटाचा जन्म अशा प्रकारे झाला होता. त्यानंतर बॉब पुढील १५ वष्रे (मृत्यूपर्यंत) व्यसनमुक्त राहिला. आज अल्कोहोल अ‍ॅनॉनिमसचे अस्तित्व एकूण १४० हून जास्त देशांमध्ये आहे.

स्वमदत गट हा मानसोपचाराचाच एक भाग आहे. फक्त तो नेतृत्वाशिवाय एकत्र आलेल्या लोकांचा गट असतो. तिथे सर्व एकाच अनुभवातून पोळलेले/ विकारातून पोळलेले लोक त्यातून बाहेर येण्यासाठी एकत्र येतात. तो अगदी मानसोपचार असा म्हणता आला नाही तरी अनेक अनुभव तिथे वाटून घेतले जातात आणि त्याचा परिणाम त्या विकारातून बरे होण्यात आणि राहण्यात होतो. अल्कोहोल अ‍ॅनॉनिमससारखेत गॅम्बलर्स अ‍ॅनॉनिमस अ‍ॅल अ‍ॅनॉन (मद्यपींच्या पत्नी), एकल पालकांचा स्वमदत गट, कॅन्सर व विविध आजारांचे स्वमदत गट त्यात येतात.

मध्यंतरी एका रुग्णाचे नातेवाईक माझ्याशी बोलत होते. त्यांच्या रुग्णाला स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यासाठी तो उपचार घेत होता. पण त्या दिवशी त्याचे आई-वडील मला भेटायला आले होते, रुग्णाला न आणता. ते खूपच चिंतीत दिसत होते. वडील म्हणाले, ‘खरेच त्याला स्किझोफ्रेनिया झाला आहे का, त्याला आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार का, त्याला शिक्षण पूर्ण करता येणार नाही का, नोकरी तरी करू शकेल का, त्याचे लग्न होईल का,’ अशा नानाविध प्रश्नांनी त्याच्यासमोर ‘आ’ वासला होता. पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न होता की आमच्याच मुलाला कसा झाला हा आजार, का झाला आजार, आम्हा एकटय़ाच्या नशिबी हे असं का, कसे आम्ही झेलणार एकटेच हे सर्व, असे अनेक प्रश्न होते.

त्यांना आजाराविषयी खूपच गैरसमज, अज्ञान होतेच पण त्याहीपेक्षा आम्ही एकटेच असे आहोत,  या समाजामुळे अधिक चिंता निर्माण झाली होती. त्यांना स्वमदत गटात जाण्याचा सल्ला मी दिला. स्वमदत गट हा नातेवाईकांचा स्वमदत गट होता. त्या गटात ते नातेवाईक एकमेकांशी आपले अनुभव वाटायचे. ‘सुख वाटल्याने वाढते, दु:ख वाटल्याने कमी होते,’ तसा अनुभव सर्वाना मिळायचा. त्याचबरोबर एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मिळायचे. या गटांमध्ये वेगवेगळे समुपदेशक व तज्ज्ञ यांचे आजाराचे विविध पैलू, हाताळणी, स्वत:ला कसे सक्षम ठेवायचे याविषयी मार्गदर्शन करायचे किंवा त्यांच्यासाठी करमणुकीचे आणि इतर कार्यक्रम असायचे. ज्यामुळे या गटात येणाऱ्या या सर्व नातेवाईकांची सक्षमता वाढली होती. स्वत:साठी काही काळ काढण्याने त्यांना वेगळी ऊर्जा मिळत होती, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण चांगला परिणाम दिसत होता.

Adwaitpadhye1972@gmail.com