सायकल टुरिंग हा प्रकार केवळ स्वत:ची फिरण्याची हौस भागवण्यासाठी नसून त्यातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत असतात. गेल्या काही वर्षांत सायकल टुरिंगकडे बघण्याचा आणि लोकांनी लांब पल्ल्याचं सायकल टुरिंग करण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेक जण सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठीही सायकल टुरिंग करीत आहेत. समाजातील अनेक समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी, इतिहासजमा झालेल्या गोष्टी पुनरुज्जीवित करण्यासाठी, नवीन वाटा शोधण्यासाठी आणि लोकांना माहीत नसलेली ठिकाणे उजेडात आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता तर अनेक पर्यटक पर्यटनाला जाताना सायकल टुरिंग केलेल्या लोकांचे ब्लॉग, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचतात, व्हिडीओ पाहतात, एवढेच नाही तर सोशल मीडियावर  त्यांना फॉलो करीत असतात.  म्हणूनच टुरिंग करणाऱ्या भटक्यांनी आपल्या सफरीचं योग्य ते दस्तावेजीकरण करणं खूप गरजेचं आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहिती लिहून ठेवणं किंवा साठवणं खूप सोप्पं झालं आहे. महिनोन्महिने किंवा वर्षभर टुरिंग करताना रोजची माहिती साठवण्यासाठी तुम्ही अनेक ऑनलाइन टूल आणि प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. वजनाला आणि आकाराला हलक्या अशा अधिक साठवण क्षमतेच्या हार्डडिस्कचा वापर फोटो आणि व्हिडीओ साठवण्यासाठी होऊ शकतो. किंडल किंवा टॅबलेटमुळे पुस्तकं किंवा नकाशे स्वत:सोबत बाळगायची आवश्यकता नाही. फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी तर हल्ली मोबाइलचाच मोठय़ा प्रमाणावर वापर होत असला तरीही गोप्रोसारख्या कॅमेऱ्यांना अनेकांची पसंती असते, जे वापरायला आणि हाताळायला सोपे आहेत. ऑडिओ रेकॉर्डर हे गॅजेटही सायकल टुरिंग करताना फार उपयोगी पडते. अनेक ब्लॉग आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुमची माहितीची भूक भागवतील, तरीही काही महत्त्वाच्या पुस्तकाचं वाचन करणं महत्त्वाचं आहे.

  • द बायसिकल टुरिंग ब्लूपिट्र : एकटय़ाला सायकल टुरिंग करायचं असेल तर काय करावं आणि काय करू नये याबाबतची इत्थंभूत माहिती देणारं हे तब्बल ४१२ पानांचं पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
  • द इसेंशियल गाइड टू टुरिंग बायसिकल्स : पहिल्यांदाच सायकल टुरिंग करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकल टुरिंगसाठी सध्या बाजारात कोणत्या सायकली उपलब्ध आहेत आणि त्यांची उपयुक्तता काय आहे याची विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
  • स्ट्रेचिंग फॉर सायकलिस्ट : सायकल सफरीवर असताना शारीरिक इजांपासून कसं दूर राहावं आणि झाल्याच तर काळजी घेण्याची माहिती देणारं पुस्तक.
  • विंटर सायकलिंग : वर्षभर सायकलिंग करण्याची तुमची इच्छा असेल तर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला मदत करेल. थंडी, पाऊस आणि बर्फाळ प्रदेशातूनही जगात कुठल्याही भागात सायकिलग करताना काय काळजी घ्यावी याचा दस्तावेज या पुस्तकात आहे.
  • बाइक कॅम्प कूक : टुरिंग करताना खाण्यासाठी तुम्ही हॉटेल किंवा इतर कुणावरही अवलंबून राहणार नसाल आणि स्वत: जेवण बनवणार असाल तर हे अतिशय वेगळं पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल.
  • अ‍ॅडव्हेंचर सायकल टुरिंग हँडबुक : जगात कुठेही अ‍ॅडव्हेचर सायकिलग करायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.

 

– प्रशांत ननावरे

prashant.nanaware@expressindia.com