लोक पर्यटन : व्रोस्लाव : बुटक्यांच्या दुनियेची  सफर

पश्चिम पोलंडमध्ये ओडर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले व्रोस्लाव हे शहर

Dwarfs attractions
दुसऱ्या महायुद्धानंतर व्रोस्लाव पोलंडचा भाग झाले.

ख्रिसमस मार्केटने फुलून गेलेला जुना गावभाग, सगळीकडे सजावट आणि रोषणाई. इमारतींचे रंगीत, आकर्षक दर्शनी भाग. त्यातच नजर एका कोपऱ्यात जाते आणि लॅपटॉप हातात घेऊन खुर्चीवर बसलेला एक बुटका दिसतो. हे काय आहे असा विचार करत असतानाच अजून काही पावले चालल्यावर एक मोठ्ठा दगड ढकलणारे दोन बुटके पाहायला मिळतात. उत्सुकता वाढतच जाते. थोडे पुढे गेल्यावर मोटरसायकल चालवणारा एक बुटका दिसतो आणि मग असे बुटक्यांचे पुतळे सततच नजरेला पडतात. व्रोस्लावची हीच मजा आहे आणि ती अनुभवायला व्रोस्लावलाच जायला हवे.

पश्चिम पोलंडमध्ये ओडर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले व्रोस्लाव हे शहर मध्य युरोपच्या सिलेशिया नावाने ऐतिहासिक काळापासून परिचित असलेल्या प्रांताचा एक भाग आहे. युरोपातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेल्या या शहराला पूर्वीपासूनच विशेष महत्त्व प्राप्त झाले. व्रोस्लावला फार जुना इतिहास तर आहेच, पण बोहेमिअन, पोलिश, हॅब्सबुर्ग, प्रशियन अशा विविध साम्राज्यांचा भाग असल्याने बहुसांस्कृतिक संगम इथे पाहायला मिळतो. १९ व्या शतकात एक औद्योगिक शहर म्हणून व्रोस्लावची भरभराट झाली. १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते दुसरे महायुद्ध संपेपर्यंत आधी प्रशियन आणि मग नाझी राजवटीखाली असल्याने शहरावर काहीशी जर्मन छाप पाहायला मिळते. विशेषत मॅक्स बेर्ग या जर्मन आर्किटेक्टने १९११-१३ या काळात बांधलेला सेंटेनिअल हॉल आधुनिक स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे, आणि त्यासाठीच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश केला गेला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर व्रोस्लाव पोलंडचा भाग झाले. दुसऱ्या महायुद्धात व्रोस्लावचा मध्यवर्ती भाग बराच बेचिराख झाला होता, हळूहळू त्याची पुनर्बाधणी सुरू झाली. पण या काळात या शहराला अनेक राजकीय आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. पोलंडच्या सोविएत राजवटीचा विरोध करणाऱ्या अनेक भूमिगत चळवळींची स्थापना व्रोस्लावमध्ये झाली. ऑरेंज अल्टन्रेटिव्हही अशीच एक चळवळ. ऑरेंज अल्टन्रेटिव्ह चळवळीचे ड्वार्फ म्हणजेच बुटके हे चिन्ह होते. या चळवळीचे प्रतीक म्हणून २००१ मध्ये एक स्मारक इथल्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आले. पुढे २००५ मध्ये तोमास मोसझेक याने तयार केलेले ५ छोटे बुटके पुतळे व्रोस्लावच्या रस्त्यांवर अवतरले आणि त्यांची संख्या वाढत राहिली. आत्ता शहरात जवळपास १५० पेक्षा जास्त असे बुटके आहेत. काही ठिकाणी ३०० पेक्षा जास्त बुटक्यांची नोंद आहे. ब्राँझचे हे पुतळे साधारणत २० ते ३० सेंटिमीटर उंचीचे आहेत आणि ठिकाणानुसार त्यांनी वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. त्यांना त्यांच्या कामानुसार नावेसुद्धा आहेत. त्यांना शोधण्यासाठी खास वेबसाइट, नकाशे, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स, वॉकिंग टूर्स अस्तित्वात आहेत. दरवर्षी सप्टेंबरमध्ये शहरात ड्वार्फ फेस्टिव्हलदेखील होतो.

पण केवळ हे बुटकेच नाहीत तर शहरात अशी अनेकविध शिल्पे पाहायला मिळतात. अजून एक विशेष शिल्प म्हणजे अनानॉमस पेडेस्ट्रियन. १९७७ साली जेरझी कालिनाने बनवलेल्या शिल्पाची ही प्रतिकृती व्रोस्लावच्या एका मुख्य रस्त्याजवळ पाहायला मिळते. १४ पांथस्थ भूमिगत होऊन परत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अवतरत आहेत असे हे दृश्य. १९७०-८० च्या दशकातील कम्युनिस्ट काळातील परिस्थितीवरचे हे भाष्य आहे असे मानले जाते. तसेच व्रोस्लावमधील ऐतिहासिक घटना दाखवणारा पदपथ, प्रेमाचे प्रतीक असणारा लव-लॉक तुम्स्की ब्रिज, जुन्या खाटीकखान्याची आठवण करून देणारे प्राण्यांचे शिल्प.. अशा गोष्टींची यादी मोठी आहे.

या शहरात बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ओस्ट्रोव तुम्स्की हा शहराचा जुना भाग एका बेटावर वसला आहे, जिथे मोठी चच्रेस आहेत. त्याचबरोबर टाऊन हॉल, मार्केट स्क्वेअर, युनिव्हर्सिटी, ऑपेरा, मेन रेल्वे स्टेशन, सेंटेनिअल हॉल ही ठिकाणे लक्ष वेधून घेतात. शहरात म्युझियम्सची रेलचेल आहे. त्याचबरोबर प्राणिसंग्रहालय, मिनिएचर पार्क, हायड्रोपोलीस (वॉटर मल्टिमीडिया म्युझियम), स्काय टॉवर यांसारखी आधुनिक आकर्षणेदेखील इथे आहेत. संगीत, नाटय़, ऑपेरा यासाठीही व्रोस्लाव प्रसिद्ध आहे. शहराच्या याच विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे २०१६चा ‘युरोपियन कॅपिटल ऑफ कल्चर’चा मान या शहराला मिळाला.

व्रोस्लाव हे पश्चिम पोलंडमधील सर्वात मोठे शहर आणि लोकसंख्येचा विचार करता पोलंडमधील चौथे मोठे शहर. अर्थातच रेल्वे, बस आणि विमानसेवेने हे शहर जोडले गेले आहे. व्रोस्लावला जाण्याचा अजून एक मार्ग म्हणजे गेल्या वर्षी सुरू झालेली बíलन-व्रोस्लाव ही विशेष सेवा. युरोपियन कॅपिटल ऑफ कल्चरचे निमित्त साधून २०१६ मध्ये सुरू झालेल्या या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे २०१८ पर्यंत ही सेवा वाढवण्यात आली. दर शनिवारी आणि रविवारी ही ट्रेन सकाळी बर्लिनहून व्रोस्लावच्या दिशेने धावते आणि संध्याकाळी परत बíलनला येते. आणि एक विशेष म्हणजे या ट्रेनच्या तिकिटामुळे व्रोस्लावमध्ये इतर सार्वजनिक वाहतूक त्या दिवसापुरती मोफत वापरता येतेच, पण त्याशिवाय काही ठरावीक हॉटेल्सच्या किमतीत सवलतदेखील मिळते. विविध प्रदर्शने, पुस्तक वाचन, क्विझ यासारखे कार्यक्रम, एक छोटी लायब्ररी तसेच घरगुती आणि इतर खाद्यपदार्थाची एक छोटेखानी सोय अशा माध्यमातून जर्मनी,पोलंडविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न होतो. ही ट्रेन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये दुवा साधण्याचे काम करते.

श्रद्धा भाटवडेकर shraddha6886@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dwarfs attractions in wroclaw

ताज्या बातम्या