‘प्रचारभान’ या रवि आमले यांच्या सदरातील ‘बहिरा हेर आणि इतर कथा’ हा लेख (८ मे) वाचत असताना प्रसिद्ध विचारवंत बट्र्राड रसेल यांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. स्वत:च्या विवेकाला स्मरून रसेल यांनी पहिल्या महायुद्धातल्या ब्रिटनच्या युद्धखोरीला विरोध केला होता. ब्रिटनमधल्या गार्डियन दैनिकात मार्च १९१७ च्या एका अंकात युद्धाच्या योग्य-अयोग्यतेविषयी एक चर्चा झाली होती. तिच्यात कोणीतरी एक टोपणनाव घेऊन रसेल यांच्या भूमिकेबद्दल टीका करण्यासाठी म्हटलं होतं : विवेकबुद्धीला स्मरून अशा तऱ्हेने युद्धाला विरोध करणारा माणूस – जाणतेपणी वा अजाणतेने – आत्यंतिक व्यक्तिवादी असला पाहिजे आणि माणूसजातीला आपली जी बांधिलकी असायला हवी तिचा अशा माणसामध्ये पूर्ण अभाव असला पाहिजे.
रसेल यांनी ‘गार्डियन’ या दैनिकात एक पत्र लिहून यावर आपले म्हणणे मांडले. ते म्हणतात : विवेकाला स्मरून युद्धाला विरोध करण्याची अनेक कारणे असू शकतात; पण आपली माणूसजातीशी बांधिलकी असायला हवी, याच कारणासाठी माझासुद्धा विरोध आहे. वर ज्या कुणी ही विधाने केली त्याच्या ‘माणूसजाती’त फक्त दोस्तराष्ट्रातल्या माणसांचा समावेश होतो. पण जर्मन लोकसुद्धा माणसंच आहेत आणि त्यांचाही माणूसजातीच्या सदस्यांत समावेश होतो. हिंसा ही हिंसेवर उतारा आहे आणि लष्करबाजीने लष्करबाजीच्या भुताला गाडून टाकता येतं यावर माझा विश्वास नाही. विवेकाला स्मरून जे युद्धविरोध करतात त्यांची बांधिलकी फक्त ‘आपल्या’ माणसांशी नसते तर ‘शत्रू’च्या माणसांशीही असते. आणि आक्रमक साम्राज्यवादाला जर विरोध करायचा असेल तर अशी बांधिलकीची भावना ‘आपल्यात’ आणि ‘शत्रुपक्षात’ मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली पाहिजे. असे झाले तर जे काम लष्कर करील त्याच्या अनेकपटीने मोठे काम ही अशा बांधिलकीची भावना करू शकते.
रसेल यांच्या युद्धविरोधी भूमिकेमुळे ट्रिनिटी कॉलेजच्या नोकरीतून त्यांची हकालपट्टी झाली. जून १९१७ मध्ये रसेल यांनी लीड्समध्ये एका युद्धविरोधी अधिवेशनात भाग घेतला. ही ब्रिटनच्या इतिहासातली महत्त्वाची घटना होती. ब्रिटनमधला स्वतंत्र मजूर पक्ष, समाजवादी पक्ष अशा विविध पक्षांतून सुमारे एक हजार प्रतिनिधी या अधिवेशनाला हजार होते. रॅम्से मॅकडोनाल्ड (ज्यांच्याविषयी रवि आमले यांचा लेख आहे) हेसुद्धा या अधिवेशनाला हजर होते. युद्धविरोधासाठी आपली लेखणी चालवल्यामुळे पुढे १९१८ मध्ये रसेलना सहा महिने कैदेची शिक्षा झाली. ती त्यांनी शांतपणे भोगली आणि या कैदेच्या काळात गणिताविषयी लेखन केले.
पाकिस्तानबरोबर युद्ध करण्यासाठी आज वातावरण तापवले जात आहे; चर्चेचे सर्व रस्ते बंद करून काश्मीरमध्ये कठोर लष्करी कारवायांवर विसंबून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; त्यांसाठी आज जनमत तयार करण्यात येत आहे. अशा वेळी बट्र्राड रसेल यांचे विचार आपला विवेक जागा करणारे आहेत.
– अशोक राजवाडे, मुंबई
संस्कृत आणि ‘उच्चवर्णीय प्रवृत्ती’चा संबंध
लंडनमध्ये संस्कृत विद्यालय स्थापन झाल्याबद्दल संतोष व्यक्त करतानाच ‘भारतात अशा उपक्रमाला भगवेकरण म्हटले गेले असते’ असा विषाद व्यक्त करणारे पत्र (लोकमानस, ८ मे) वाचनात आले. परदेशात प्राचीन संस्कृतचा प्रसार होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे हे नि:संशय. पण भारतात ही भाषा सर्वमान्य न होण्यामागे इथली जात व धर्माधारित वर्णव्यवस्था कारण आहे ही बाब दुर्लक्षित केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायला नकार देताना ही भाषा शिकण्या-बोलण्याचा अधिकार (?) केवळ उच्चवर्णीयांनाच आहे ही अहंकारी वृत्ती त्यामागे होती, हा इतिहास विसरून चालणार नाही.
अजूनही ही प्रवृत्ती पूर्णत: नष्ट झालेली नाही हे वंचितांवर अधूनमधून होणारे अत्याचार पाहता म्हणता येईल. जागतिकीकरणाचे सर्व लाभ लुटणारे अभिजन आपल्या संस्कृतीचा परदेशात प्रसार होत असल्याचा आनंद व्यक्त करताना परदेशी संस्कृतीच्या नावे मात्र नाके मुरडतात व इथल्या अधोगतीला तीच जबाबदार असल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.
– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)
हा घटनाद्रोह नाही का?
संजय काकडे यांच्या कन्येचा शाही विवाह आणि याआधीही झालेले अनेक शाही विवाह पाहता हा काही शेवटचाच असेल असा काही कोणी समज करून घेऊ नये. अशा शाही विवाहांवर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च एका बाजूला आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, हुंडय़ासाठी पैसे नाहीत म्हणून होणाऱ्या आत्महत्या दुसऱ्या बाजूला, याविषयी ऊहापोह होत राहातील. विवाह कसा करावा हा ज्याच्या-त्याच्या वकूब, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक गरज यांवर ठरत असावे. एरवीही सर्वसामान्य व्यक्ती कर्ज काढून, हातउसनवारी करून लग्नखर्च करीतच असतात, तो प्रत्येकाचा खासगी आणि वैयक्तिक प्रश्न आहे.
पण विशेष प्रकर्षांने जाणवणारी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते ती ही की, आपले लोकप्रतिनिधी आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय तसेच आर्थिक विषमता (वैयक्तिक कर्तृत्व) असताना थाटात विवाह लावत नाहीत तर सजातीयच विवाह लावतात (काही अपवाद असतील.. पण अपवादच). मात्र जाती-भेद, धर्म-भेद, आर्थिक विषमता यावर जोरदार भाषणबाजी करताना आढळतात. तसेच सगळे विवाह रीती/ परंपरा, मुहूर्त इत्यादींच्या चौकटीत राहूनच केले जात असतात आणि परत जनतेला ‘विज्ञानवाद’ जोपासा (घटनेतसुद्धा विज्ञानवाद जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे नमूद केले आहे आणि लोकप्रतिनिधी तर घटनेप्रमाणे वागण्याची शपथ घेतात) असा कंठघोष करीत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यात आणि प्रत्यक्षातील कृतीमध्ये किती अंतर असते, हे जनता बघत असते आणि वेळप्रसंगी नोंदही घेत असते. लोकप्रतिनिधींनीचे असे विसंगत वागणे हा एक प्रकारचा ‘घटनाद्रोह’ नाही का?
– बाळकृष्ण शिंदे, पुणे
फडणवीस यांच्या वागण्यातील विसंगती
भाजपच्या काकडे व देशमुख घराण्यांच्या लग्न सोहळ्यातील खर्चावरील बातमीत मुख्यमंत्र्यांच्या पुढील वक्तव्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘पक्षात बडेजावाची संस्कृती आणू नका व भाजपच्या सत्तेने उन्मत्त होऊ नका’ असा सल्ला स्वपक्षीयांना दिला. हा सल्ला सामाजिक जाणीव असल्याचे द्योतक आहे असे म्हणावे लागेल.
परंतु मुख्यमंत्र्यांना खरोखर ती आहे का? तर त्याचे उत्तर नकारार्थी आहे असे म्हणावे लागेल. तसे नसते तर मुख्यमंत्र्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली नसती.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हे राजकारण्यांच्या उक्ती आणि कृतीमधील विसंगती अधोरेखित करते. टाळ्या मिळविण्यासाठी तसेच जनमानसात प्रतिमा उजळ करण्यासाठी एक बोलायचे आणि खासगीत त्यास हरताळ फासायचा हे सर्वाना माहीत झाले आहे आणि म्हणूनच असे सल्ले स्वपक्षीय मनावर घेत नाहीत व असे शाही थाटात विवाह सोहळे ‘संपन्न’ होतात.
– चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे
लग्नांची ‘व्हीआयपी संस्कृती’
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुसरीकडे सत्ताधारी आमदार वा मंत्र्यांकडील लग्नांचा असा शाही थाट भाजपला शोभतो का?
रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाचा खर्च तर चक्क सरकारच्या माथ्यावर मारण्यात आला असे ऐकण्यात आले. ते कसे? आमदार संतोष दानवे यांच्या लग्नाच्या आदल्या दिवसापासून संपूर्ण मंत्रिमंडळ औरंगाबादेत दाखल झाले होते. विमानतळावरील पार्किंगचे भाडे हे काही कोटीमध्ये झाले. सर्व मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये आले ते लग्नासाठी नव्हे तर सरकारी कामांसाठी आले असल्याचे भरवण्यात आले. कधी नव्हे तेवढी उद्घाटने त्या दिवशी शहरात करण्यात आली! राज्य नियोजन आयोगाची बैठक घेण्यात आली(अशा चर्चा सुरू आहेत) आणि आता सुभाष देशमुखांच्या मुलाचा लग्नसोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागेची परवानगी लग्नासाठी मिळते का, हा प्रश्न आहे.
नरेंद्र मोदींनी आत्ताच ‘व्हीआयपी’ संस्कृती बंद करण्यासाठी लाल दिवे बंद केले. पण आता किमान आपल्या सहकाऱ्यांकडील लग्नांवरील वारेमाप खर्चाला पायबंददेखील घालावा.
– प्रशांत हंसराज अहिरराव, सिल्लोड (जि. औरंगाबाद)
‘व्यक्तिवेध’मधील चूकभूल
न्यायमूर्ती लीला सेठ यांचे ‘वुई दि चिल्ड्रन ऑफ इंडिया’ हे पुस्तक ‘शक्तिमान’ मालिकेचा ‘समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित’ आहे, असे जे ८ मेच्या ‘व्यक्तिवेध’ सदरात म्हटले आहे ते चूक आहे. लहान मुलांना बालसुलभ भाषेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची (प्रिअॅम्बल) ओळख करून देण्यासाठी सेठ यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
– चैतन्य धारूरकर, औरंगाबाद.
बारकाईने पाहिल्यावर पडलेला प्रश्न..
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या दक्षिण कराड मतदारसंघातील वानरवाडी या गावच्या पाणीटंचाईची पाहणी करण्यासाठी दुचाकीवरून गेले, याचे छायाचित्र ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीत (८ मे) आहे. चव्हाण हे सध्या आमदार आहेत. सारा लवाजमा बाजूला ठेवून केवळ दुचाकीवर बसून रणरणत्या उन्हात जाणे कौतुकास्पदच- म्हणजे सामान्यपणे प्रथमदर्शनी तरी तसे वाटते.
पण छायाचित्र बारकाईने पाहिल्यावर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे लवाजमा नसला तरी दुचाकीच्या दुतर्फा हातात पाण्याची बाटली घेऊन कडक उन्हात पाळणारे सुरक्षारक्षक आहेतच. त्यांची अशी होलपट करण्यात कसला आलाय साधेपणा? शिवाय ज्या वानरवाडी गावच्या पाणी प्रश्नासाठी त्यांची ही उठाठेव चालली आहे, तो प्रश्न ते मुख्यमंत्री असताना का सुटला नाही ?
– प्रा. रघुनाथ आपटे, चाकण.