01sulakshanविश्वचषक सामने सुरू होण्याआधी आपल्या कामगिरीबद्दल अनेक तर्ककुतर्क केले जात होते. पण धोनीसेनेने सलग विजय मिळवून तडाखेबंद उत्तर दिलं आहे. त्यामुळेच क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील फलंदाजीची क्रमवारी, गोलंदाजांमधील बदल, व्यूहरचना आदीबाबत प्रयोग करण्याची वेळ आता संपली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या प्रत्येक संघापुढे व त्यांच्या खेळाडूंपुढे कसोटीचेच क्षण आले आहेत. साखळी गटातील सामन्यांबाबत असलेली उत्सुकता संपली आहे आणि त्याची जागा बाद फेरीतील निर्णायक लढतींबाबत असलेल्या उत्कंठेने घेतली आहे. विश्वचषकाचे दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व भारत यांच्याबरोबरच श्रीलंका व बांगलादेश यांनीही बाद फेरी निश्चित केली आहे.
साखळी सामने सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. विशेषत: त्यांच्या गोलंदाजांबाबत साशंकता निर्माण झाली होती. तथापि या स्पर्धेआधी झालेल्या कसोटी मालिका व तीन देशांच्या स्पर्धेतील कामगिरीच्या तुलनेत आपल्या गोलंदाजांनी खूपच प्रभावी कामगिरी केली आहे. १९७५ पासूनच्या विश्वचषक स्पर्धाची तुलना केली तर असे आपण छातीठोकपणे सांगता येईल की, यंदाच्या स्पर्धेत भारताने सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. साखळी गटातील सर्व सामन्यांमध्ये आपल्या संघाने विजय मिळविताना थेट विश्वचषकाचाच दावा केला आहे. फलंदाजी, गोलंदाजी व नेतृत्वशैली या तीनही आघाडय़ांवर आपल्या संघाने प्रभावी यश मिळविले आहे. साखळी सामन्यांमधील सर्व सामने जिंकून दरारा निर्माण केला आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा सिंहाचा वाटा आहे. एकदिवसीय सामने व ट्वेन्टी२० सामन्यांमध्ये सहकाऱ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात तो वाकबगार आहे हे त्याने सतत सिद्ध केले आहे. धोनी हा उत्तम नेता व कर्णधार आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. आता तुम्ही म्हणाल की, नेता व कर्णधार यांत काय फरक आहे. प्रत्यक्ष मैदानावर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आदीबाबत जो निर्णय घेतो तो कर्णधार असतो मात्र एरवी मैदानाबाहेर आपल्या संघातील खेळाडूंमधील गुणवत्ता व क्षमता ओळखून त्यांच्यामागे जो आत्मविश्वासाने व खंबीरपणे उभा राहतो त्याला नेता म्हणतात. धोनीकडे या दोन्हीही शैली आहेत. कसोटी मालिकेपूर्वी शिखर धवन व रविचंद्रन अश्विन यांच्या क्षमतेविषयी सातत्याने टीका होत होती मात्र धोनीने या दोन्ही खेळाडूंची पाठराखण केली. त्याचा हा निर्णय किती योग्य होता हे साखळी सामन्यांमधील कामगिरीद्वारे सिद्ध झाले आहे. धवन याने सातत्यपूर्ण कामगिरी करीत आपण ‘मॅचविनर’ होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. अश्विन यानेही जलदगती गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रभावी यश मिळविले आहे. नेता हा अनेक चांगले कार्यकर्ते घडवीत असतो. त्याप्रमाणेच धोनी याने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चांगले खेळाडू घडविले होते. सौरव गांगुली याच्याप्रमाणेच तो उत्तम नेता व कर्णधार आहे. गांगुली याने हरभजनसिंग, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग आदी अनेक खेळाडू घडविले होते. त्याचीच आठवण मला धोनीच्या कामगिरीवरून झाली.
धोनीने वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वेविरुद्ध संघास पराभवाच्या उंबरठय़ावरून वाचविताना संयमाचा पुतळा असल्याचे दाखवून दिले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सुरेश रैना व धोनी यांनी संघास अत्यंत कठीण परिस्थितीतून विजयश्री मिळवून दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ते खेळत असताना षटकामागे दहा ते बारा धावांचे आव्हान होते. पॉवरप्लेमधील एका षटकात आपल्याला दोन धावादेखील मिळाल्या नव्हत्या. त्या वेळी त्यांच्या जागी अन्य दुसरे फलंदाज असते तर त्यांचा संयम केव्हाच संपला असता. मात्र रैना व धोनी यांनी अत्यंत स्थितप्रज्ञ राहत सर्वच आक्रमणे थोपविली. धोनी याने आपण पुन्हा ‘मॅच फिनिशर’ असल्याचे दाखवून दिले आहे. हा सामना मी पाहत असताना माझ्या इमारतीमधील एक मुलगा मला म्हणाला, आज आपण सामना गमावणार, कारण शंभर धावांपूर्वीच आपले चार फलंदाज तंबूत गेले आहेत. मी त्याला म्हटले, आपण सामना नक्कीच जिंकणार, कारण अजूनही धोनी मैदानावर आहे. माझा हा मुद्दा धोनी याने सिद्ध केला आहे. धावांचे लक्ष्य समोर असताना त्याचा पाठलाग कसा करायचा याचा वास्तुपाठ धोनी व रैना यांनी दाखवून दिला आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध आपल्या महंमद शमी, मोहित शर्मा व उमेश यादव या तीनही द्रुतगती गोलंदाजांनी अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र आता बाद फेरीत त्यांची कसोटी ठरणार आहे. विशेषत: मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आदी गोलंदाजांच्या भेदकतेच्या तुलनेत त्यांचा प्रभाव फिका पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याइतके अव्वल दर्जाचे द्रुतगती गोलंदाज आपल्याकडे नाहीत याची खंत मला सतत जाणवत असते. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे आपले गोलंदाज कमकुवत ठरण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा हा धोनीने लाडावलेला खेळाडू आहे. बांगलादेशपुढे त्याच्या मर्यादा स्पष्ट होतील. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल पाहिजे. बाद फेरीत रोहित शर्माऐवजी अजिंक्य रहाणे हा सलामीस योग्य ठरेल. कारण त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. रोहित शर्मा याचे पाय अजूनही हलत नाहीत. एकेरीदुहेरी धावा काढण्याबाबत त्याच्या मर्यादा वारंवार सिद्ध होत आहेत. मधल्या फळीतच रोहित योग्य होईल. साखळी सामन्यांमधील चुका आता बाद फेरीत झाल्या तर त्या भारतीय संघास मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रँडन टेलर याला मानाचा मुजरा आहे. कारकिर्दीतील अखेरच्या वनडे सामन्यात त्याने मारलेले शतक खरोखरीच अप्रतिम व संस्मरणीय खेळी होती. त्याला गोलंदाजांनी साथ दिली असती तर कदाचित त्याच्या कारकिर्दीची सांगता विजयाने झाली असती. संघातील काही सहकारी असे असतात की आपल्या कर्णधाराला कसे मूर्खात काढले जाईल अशीच कामगिरी ते करीत असतात. कर्णधार टेलर याने गोलंदाजीच्या वेळी लावलेल्या व्यूहरचनेऐवजी त्यास मारक होईल अशीच गोलंदाजी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी केली. त्यामुळे टेलरच्या विजयाच्या आशांवर त्यांनी सपशेल पाणी फिरविले. टेलरच्या फलंदाजीवरून मला त्या देशाचा माजी खेळाडू अँडी फ्लॉवर याच्या फलंदाजीची आठवण झाली. त्याच्यासारखीच दिमाखदार फलंदाजी टेलरने केली.
श्रीलंकेचा कुमार संगकारा याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. क्रिकेटचे कोणतेही स्वरूप असो, तो प्रत्येक स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजी व यष्टीमागे यशस्वी कामगिरी करीत आहे. आपले तंत्र कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेटला योग्य आहे हे त्याने दाखवून दिले आहे. पारंपरिक फलंदाज असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलास अनुरूप शैली करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे हे त्याने दाखवून दिले आहे. डावाची बांधणी करताना शतक कसे टोलवायचे हे त्याच्याकडूनच शिकण्यासारखे आहे. या डावखुऱ्या खेळाडूकडे मैदानाच्या सर्व बाजूंना फटके मारण्याची शैली आहे.
बांगलादेशच्या खेळाडूंनी खूप कमाल केली आहे. त्यांनी इंग्लंडला मायदेशी पाठविलेच, पण न्यूझीलंडसारख्या मातब्बर संघास विजय मिळविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करायला लावला. महंमदुल्ला याने लागोपाठ दोन शतके टोलवीत अतुलनीय कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवातदेखील त्यांनी देशात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले. चाहत्यांना निखळ आनंद त्यांनी मिळवून दिला आहे.
इंग्लंडने स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात विजय मिळवीत सांगता केली असली तरी साहेबांना खूप काही शिकण्याची गरज आहे. मला खूप आश्चर्य वाटते की, फुटबॉल व क्रिकेट या दोन्ही खेळांमधील अव्वल दर्जाच्या लीग स्पर्धा त्यांच्या देशात आयोजित केल्या जातात. त्यामध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होतात. मात्र त्यांच्याकडून काहीही बोध व शिकवणी इंग्लिश खेळाडू घेत नसावेत, असे मला वाटत आहे. वर्षांनुवर्षे ते केवळ प्रयोगच करीत आहेत. ते स्वत:ला अतिशहाणे समजतात व स्वत:वर हसू येण्याची कामगिरी करतात.
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. आपण विजेतेपदाचे दावेदार आहोत हे त्यांच्या कामगिरीवरून जाणवत आहे. आर्यलड, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांच्यासारख्या संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अधिकाधिक संधी दिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय मानांकनातील संघांच्या कामगिरीचा दरवर्षी आढावा घेतला पाहिजे. खराब कामगिरी करणाऱ्या देशांना खालच्या श्रेणीत ढकलले पाहिजे व खालच्या श्रेणीतील एक-दोन संघांना बढती दिली, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये अधिकाधिक रंगत येईल. भारतात होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धामध्ये त्यांना संधी मिळाली, तर त्यांची गुणवत्ता वाढेल व आपल्या देशातील युवा खेळाडूंनाही अनुभव मिळू शकेल. १६ व १९ वर्षांखालील संघांतील खेळाडूंबरोबर त्यांचे सामने घेतले गेले, तर सहयोगी संघांच्या खेळाडूंमध्ये व्यावसायिक गुणवत्ता वाढेल. सहयोगी संघांच्या दर्जात सुधारणा झाली तर आपोआपच विश्वचषक स्पर्धेतील उत्कंठा वाढेल व प्रस्थापित संघांनाही प्रत्येक सामन्यात संघर्ष करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक सामन्यात चुरस पाहावयास मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा आहे.
सुलक्षण कुलकर्णी