scorecardresearch

राशिभविष्य : दि. १४ ते २० मे २०२१

चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे नव्या संकल्पना राबवाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला हर्षलच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात नव्या संशोधनाला पूरक स्थिती प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी करून बघण्याकडे आपला कल राहील. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या कामाला गती येईल. कौटुंबिक निर्णय सर्वानुमते घ्यावेत. मुलांना सत्य परिस्थितीचे भान द्यावे. श्वसन मार्ग आणि डोळ्यांचे आरोग्य जपावे. वैद्यकीय सल्ला लाभदायक ठरेल.

वृषभ चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे आप्तजनांना भावनिक आधार द्याल. त्याच्या मदतीला धावून जाल. नोकरी-व्यवसायातील काही मुद्दय़ांवर फेरविचार कराल. वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे आपले कर्तव्य समजाल. सहकारी वर्गाच्या साथीने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या परीक्षेचे दिवस आहेत. एकमेकांना समजून घ्यावे लागेल. मुलांच्या समयसूचकतेचे कौतुक कराल. कफ आणि पित्त विकार बळावल्यास दुर्लक्ष नको. पथ्य आणि औषधे सुरू करावी लागतील.

मिथुन चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे घरातील किंवा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या अनुभवातून लाभ होईल. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने नुकसान टळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. जोडीदाराचा सल्ला घेऊन पुढे जावे. मुलांच्या आत्मविश्वासाला योग्य वळण द्याल. कौटुंबिक  वातावरण संमिश्र राहील. शिरा , स्नायू आखडण्याची शक्यता आहे. दुखणे अंगावर काढू नका. योग्य उपचाराची गरज भासेल.

कर्क रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे उत्साहवर्धक घटना घडतील. अंदाज खरे ठरतील. नोकरी-व्यवसायात रखडलेली कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. सरकारी कामे मात्र लांबणीवर पडतील. सहकारी वर्गाकडून चांगली मदत मिळेल. आपले मत मुद्देसूद मांडल्याने ते प्रभावी ठरेल. जोडीदाराच्या कामकाजात अनपेक्षित अडथळे येतील. त्याची चिडचिड वाढेल. मुलांसाठी अधिक खर्च करावा लागेल. अतिदमणुकीमुळे पोटऱ्यांमध्ये गोळे येतील. विश्रांतीची गरज भासेल.

सिंह रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे रवीची ऊर्जा आणि चंद्राची कृतिशीलता, कुतूहल यांच्या समन्वयामुळे कामामध्ये नावीन्य निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाचा विशिष्ट ठसा उमटवाल. व्यावहारिक बाजू उत्तमरीत्या सांभाळाल.  तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. मुलांचा भावनिक तोल सांभाळून घ्याल. पाठीचा मणका आणि इतर सांधे यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ताणामुळे डोकं जड होईल.

कन्या चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे नव्या संकल्पना राबवाल. आर्थिक स्थिती स्थिरावेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला आस्थापनेच्या हिताचा ठरेल. सहकारी वर्गाचे प्रश्न व्यवस्थापकांपुढे मांडाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर मात करणे कठीण जाईल. मुलांना शिस्तीचे धडे द्याल. त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना मोबदला मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. अंत:स्रावी ग्रंथींचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी औषधे घ्यावीत.

तूळ चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे भावना आणि विचार यांच्यात समतोल राखाल. परिस्थितीला धीराने सामोरे जाल. नोकरी-व्यवसायात सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करून अपेक्षित यशाकडे वाटचाल कराल. वरिष्ठांच्या प्रश्नांना विचारपूर्वक उत्तरे द्याल. सहकारी वर्गाची साथ उल्लेखनीय ठरेल. मुलांना त्यांच्या समस्यांची उत्तरे शोधण्याची संधी द्याल. कौटुंबिक वातावरणातील गांभीर्य हलके कराल. पोटदुखीवर वैद्यकीय सल्ला आणि औषध घ्यावे लागेल. डोकं जड होईल.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे आपल्यातील कला गुणांची नव्याने जोपासना कराल. हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग कराल. नोकरी-व्यवसायातील अडचणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने दूर होतील. सहकारी वर्ग कोंडीत सापडेल. जोडीदाराच्या प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने त्याचा त्रास  वाढेल. त्याला आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी धावपळ कराल. पित्त-कफ विकार बळावतील. आहारातील पथ्य काटेकोरपणे पाळा.

धनू चंद्र-मंगळाच्या युतियोगामुळे धीराने परिस्थितीला तोंड द्याल. इतरांचा उत्साह वाढवाल. गरजवंतांना भावनिक आधार द्याल. नोकरी-व्यवसायात कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांच्या शिस्तीचा बडगा सहन करावा लागेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे पूर्ण करून घेताना दमणूक होईल. जोडीदाराला ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मुलांना धाक आणि शिस्त दाखवावी लागेल. डोळे लाल होणे, जळजळणे असे त्रास उद्भवतील. काळजी घ्यावी.

मकर चंद्र-शनीच्या प्रतियोगामुळे मेहनतीला फळ येईल. चर्चेने प्रश्न सोडवाल. नोकरी-व्यवसायात कठीण प्रसंगातून बाहेर पडाल. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडाल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. काही बाबतीत आपला मुद्दा ताणून धरावा लागेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. मुलांमधील चांगले गुण ओळखून त्यांना वाव द्याल. उष्णतेच्या समस्या आणि वातविकार बळावतील. औषधोपचार आवश्यक!

कुंभ गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे गुरूच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग होईल. वैचारिक पातळी उंचावेल. नोकरी-व्यवसायात एखाद्या प्रकल्पाचा अभ्यासात्मक विचार कराल. वरिष्ठांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरेल. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. जोडीदाराच्या कामकाजातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतील. मुलांच्या कामाला वा अभ्यासाला नवे वळण मिळेल. मनावरील ताण कमी करण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये मन रमवाल. अपचन व पित्तविकार बळावतील.

मीन चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे अपेक्षित बातमी येईल. समाजोपयोगी कामात हिरीरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात बाहेरगावच्या किंवा परदेशातील कामासंबंधित बाबी प्रगतिकारक ठरतील. सहकारी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक जबाबदाऱ्या यथायोग्य पार पाडाल. मुलांच्या मताशी सहमती दर्शवाल. आपले निर्णय विचारपूर्वक मांडाल. डोळे लाल होणे, कान दुखणे आणि खांदे भरून येणे असे त्रास जाणवतील. व्यायाम व विश्रांती आवश्यक!

मराठीतील सर्व भविष्य ( Bhavishya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology from 14 to 20 may 2021 rashibhavishya dd

ताज्या बातम्या