24 January 2021

News Flash

राशिभविष्य : दि. २५ ते ३१ डिसेंबर २०२०

बुध आणि हर्षल या दोन बुद्धिवादी ग्रहांच्या नवपंचम योगामुळे संशोधनात्मक कार्यात गती येईल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध आणि हर्षल या दोन बुद्धिवादी ग्रहांच्या नवपंचम योगामुळे संशोधनात्मक कार्यात गती येईल. युक्तिवादाने  समोरच्याला नामोहरम कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. आपल्या क्षेत्रात नव्या ओळखी होतील. सहकारी वर्गाची विशेष मदत मिळेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर मात करताना आपल्या आधाराची गरज भासेल. कुटुंबातील ताण कमी कराल. पोट, आतडी यांचे विकार बळावतील.

वृषभ चंद्र आणि शुक्र या भावनाप्रधान ग्रहांच्या समसप्तम योगामुळे हाती घेतलेल्या कामाचे आयोजन, नियोजन उत्तम प्रकारे कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या आदेशानुसार कामातील बदल लाभदायक ठरतील. सहकारी वर्गाच्या साहाय्याने नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. त्याची स्थिती समजून घ्याल. मुलांचे प्रश्न प्रेमाने सोडवाल. लघवीचे विकार सतावतील. काळजी घ्यावी लागेल.

मिथुन चंद्र व नेपच्यून या भावनाशील ग्रहांच्या लाभ योगामुळे एकंदरीत उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रभावी सादरीकरण कराल. वरिष्ठांच्या सूचना जाचक वाटतील. त्यांना योग्य शब्दांत स्पष्टीकरण द्यावे. वाईटपणा घेऊ नका. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव येईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी पार पाडेल. त्याच्या कामाचे कौतुक होईल. थंडीमुळे उत्सर्जन संस्थेला कोरडेपणाचा त्रास होईल.

कर्क गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे कामाला गती मिळेल. तसेच योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक घटना घडतील. प्रयत्न सोडू नका. तंत्रज्ञानाची साथ मिळेल. सहकारी वर्गाकडून अनपेक्षित मदत मिळाल्याने महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल, परंतु त्याची खूप दमणूक होईल. मुलांच्या गुणांना प्रोत्साहन द्याल. चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे असा त्रास होईल.

सिंह रवी-हर्षलच्या नवपंचम योगामुळे मानमरातब, यश, कीर्ती संपादन कराल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाव कमवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेताना दोन वेळा विचार करून अंतिम निर्णय जाहीर करावा. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. त्यांना आपला आधार वाटेल. जोडीदाराच्या मतांशी सहमत नसलात तरी जोरदार विरोध न नोंदवता सौम्य शब्दांत आपले मत मांडावे लागेल. रक्तदाब वर-खाली होईल.

कन्या मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या समसप्तम योगामुळे भावना आणि विचार यांच्यात समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात आपल्या चांगल्या स्मरणशक्तीचा योग्य उपयोग होईल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. सहकारी वर्ग आपले म्हणणे मान्य करेल. जोडीदारासह चांगले सूर  जुळतील. एकमेकांतील उणिवा भरून काढाल. मणक्याची काळजी घ्यावी. योग्य आहार, व्यायाम यांसह विश्रांतीचीही गरज आहे याची जाणीव होईल.

तूळ चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे चंद्राची कृतिशीलता, हर्षलची संशोधक वृत्ती एकमेकांना पूरक ठरतील. सर्वापेक्षा वेगळा विचार सभेत सविस्तरपणे मांडाल. नोकरी- व्यवसायात मतमतांतरांना सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गावर आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव पाडाल. जोडीदाराचे स्वतंत्र विचार स्वीकारणे जड जाईल. वाद टाळावेत. कौटुंबिक वातावरण साधारण राहील. जबाबदाऱ्या वाढतील. फोड, पुटकुळी,  गळू, गाठ यांची तपासणी करून घ्यावी. पथ्य पाळावे.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे नव्या जबाबदाऱ्या पेलण्याची तयारी दाखवाल. भावनेच्या आहारी न जाता आपले मनोधैर्य वाढेल. नोकरी-व्यवसायातील नवीन ओळखींमुळे आर्थिक लाभ होण्याच्या शक्यता!  सहकारी वर्गाकडून कामाची पूर्तता करून घ्याल. आपल्या प्रेमळ आणि करारी स्वभावाची झलक दाखवाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवेल. नियमांचे पालन करून नातेवाईकांच्या भेटीगाठी  होतील.  पित्त नियंत्रणात ठेवा.

धनू चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे उत्साह आणि आनंद निर्माण कराल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सद्य:स्थितीवर मात कराल. नोकरी-व्यवसायात प्रगतीकडे वाटचाल कराल. ज्येष्ठ वरिष्ठांचा सल्ला लाभकारक ठरेल. सहकारी वर्गाच्या समस्यांवर तोडगा काढाल. जोडीदाराला चांगली साथ द्याल. त्याच्या कामातील व्यस्ततेतून तो कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण! नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. जननेंद्रियांचे त्रास सतावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे ज्येष्ठ वरिष्ठांचा मान राखाल. जुन्या संपर्कातील लोक नव्याने भेटतील. नोकरी-व्यवसायात आपल्या गुणांची कदर केली जाईल. सहकारी वर्गाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. नवे तंत्र आत्मसात कराल. आपल्या स्वभावातील एखाद्या लहानशा बदलामुळे समोरच्या व्यक्तीत मोठा बदल झालेला जाणवेल. कुटुंबासाठीचे नियम कणखर कराल. जोडीदाराचे पाठबळ मिळेल. खांदे आणि फुप्फुसे यांचे आरोग्य सांभाळा.

कुंभ चंद्र आणि नेपच्यून या जलतत्त्व ग्रहांच्या नवपंचम योगामुळे भावनांना भरते येईल. प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी अन्यथा भावनांवर ताबा ठेवणे कठीण जाईल. शब्द जपून वापरा. नोकरी-व्यवसायात आपल्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सहकारी वर्गाकडून विशेष साहाय्य मिळेल. जोडीदाराचे कर्तृत्व उजळून निघेल. दोघे मिळून कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घ्याल आणि योग्यरीत्या पार पाडाल. दंड, खांदे भरून येतील. हलका व्यायाम आवश्यक!

मीन शुक्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे संगीत, कला, साहित्य यात उत्स्फूर्तता दिसून येईल. नोकरी-व्यवसायात आपली कार्यपद्धती योग्यरीत्या अमलात आणाल. त्याचा सर्वानाच लाभ होईल. सहकारी वर्गाला सांभाळून घ्यावे लागेल. जोडीदार त्याच्या कामातील अडचणीतून मार्ग काढेल. आपल्या कामाच्या व्यापातून डोक्याला विश्रांती देण्याची गरज भासेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 7:48 am

Web Title: astrology from 25th to 31 december rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १८ ते २४ डिसेंबर २०२०
2 राशिभविष्य : दि. ११ ते १७ डिसेंबर २०२०
3 राशिभविष्य : दि. ४ ते १० डिसेंबर २०२०
Just Now!
X