अबंतिका घोष – response.lokprabha@expressindia.com

करोना व्हायरसच्या संदर्भात जगभरात सगळीकडेच प्रयोग, चाचण्या सुरू आहेत. काही ठिकाणी त्या खासगी पातळीवर आहेत; तर काही ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेच्या पातळीवर सुरू आहेत. भारतात करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन प्रतिकारशक्तीत सुधारणा होऊ शकते का, यावर अभ्यास सुरू आहे. या प्रकाराला कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी असं म्हटलं जातं. यापूर्वी तिचा काही आजारांमध्ये वापर करण्यात आला आहे.

कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

या उपचार पद्धतीला अलीकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही प्रयोग- पाहणीच्या तत्त्वावर मान्यता दिली आहे. यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.

कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी पॅसिव्ह इम्युनिटी या जुन्या संकल्पनेनुसारच काम करते. उदाहरणार्थ काही आजारांच्या अ‍ॅण्टिबॉडीज घोडय़ामध्ये विकसित केल्या गेल्या आणि नंतर त्या माणसाला टोचण्यात आल्या. तर बीसीजी लस हे अ‍ॅक्टिव्ह इम्युनिटीचं उदाहरण आहे. ती शरीरात टोचून अपेक्षित प्रतिकारशक्ती वाढवली जाते. ग्युटन आणि हॉल यांच्या वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांतील उल्लेखानुसार कोणतेही अँटीजेन न टोचता माणसामध्ये तात्पुरती प्रतिकारशक्ती निर्माण करता येऊ शकते. अ‍ॅण्टिबॉडीज देणं, टी सेल कार्यरत करणं किंवा अन्य व्यक्तीच्या रक्तातून या दोन्ही घटकांचा पुरवठा करणं किंवा ज्या प्राण्याच्या शरीरात अ‍ॅण्टीजेन घातलेले आहेत त्याच्याकडून या गोष्टी मिळवणं यातून प्रतिकारशक्ती वाढवता येते. या अ‍ॅण्टिबॉडीज रुग्णाच्या शरीरात दोन ते तीन आठवडे टिकून राहू शकतात. त्या काळात त्या रुग्णाचे त्या रोगापासून संरक्षण होते. दुसऱ्या माणसाच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही आठवडे; तर प्राण्याच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही तास ते काही दिवस टिकून राहू शकतात. या प्रकाराच्या रक्तप्रदानाला पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. टी सेल्स या रक्तपेशींची प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका असते.

कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीच्या संदर्भात भारत काय करणार आहे?

करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर करून करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) काही नियम तयार करत आहे.

या थेरपीची सध्या फक्त क्लिनिकल ट्रायल घेतली जाईल. म्हणजे कृत्रिम श्वसनावर असलेल्या, गंभीर रुग्णांसाठीच या थेरपीचा वापर केला जाईल. आम्ही आता कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीसाठी काही नियम तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. त्यानंतर आम्हाला औषध नियंत्रक यंत्रणेकडून त्याला मान्यता मिळवावी लागेल. या पद्धतीचा सगळ्या रुग्णांमध्ये वापर करता येणार नाही. ती प्रयोगाच्या पातळीवर वापरायची आहे. परदेशात त्याबाबत प्रयोग झाले असून ते यशस्वी ठरले आहेत. इथे आपण ते कृत्रिम श्वसनावर असलेल्या तसंच अतिगंभीर रुग्णांवर करून बघू, असं आयसीएमआरच्या साथींच्या आजारांसंदर्भातल्या विभागाचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर सांगतात.

राज्य सरकारने कोविड-१९ संदर्भात सल्ला देण्यासाठी नेमल्या गेलेल्या समितीवर असलेले केरळमधले डॉ. अनुप कुमार सांगतात की, करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांशी त्यांचे बोलणे झाले आहे आणि प्लाझ्मा थेरपीच्या प्रयोगात सहभागी व्हायला या रुग्णांची हरकत नाही. अर्थात हा प्रयोग सुरू करण्यासाठी केरळला औषध नियंत्रक मंडळाची परवानगी घ्यावी लागेल.

अर्थात करोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मामधील अ‍ॅण्टिबॉडीची पातळी तपासण्यासाठीची किट्स केरळकडे उपलब्ध नसली तरी ही रक्तसंक्रमणाची प्रक्रिया तशी फारशी गुंतागुंतीची नाही. त्यासाठी यंत्राच्या साहाय्याने रक्तातून प्लाझ्मा वेगळा करायचा असतो आणि नंतर तो द्यायचा असतो. अ‍ॅण्टिबॉडीची पातळी तपासणारं किट भारतात उपलब्ध नाही, ते जर्मनीहून आणावं लागणार आहे.

या थेरपीच्या बाबतीत इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे?

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या सार्वजनिक आरोग्यातील आणीबाणीच्या काळात आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना, संशोधकांना कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीचा अभ्यास तसंच व्यवस्थापनासंदर्भात काही सूचना, शिफारशी केल्या आहेत. या थेरपीला तिथे अन्न आणि औषध प्रशासनाची फक्त प्रायोगिक पातळीवरच मान्यता आहे. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथे काम करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञांनी गेल्या महिन्यात १० रुग्णांवर या थेरपीचा वापर केला. या सगळ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. शिवाय कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही.

या थेरपीचा यापूर्वी कधी वापर झाला आहे?

तिचा यापूर्वी इबोलामध्ये वापर झाला आहे. इबोलावर कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते, तेव्हा या थेरपीच्या वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शत तत्त्वे घालून दिली होती.

‘द इंडियन एक्स्प्रेस’मधून साभार

(अनुवाद- वैशाली चिटणीस)